ओमिक्रॉन विषाणूला सौम्य समजण्याची चूक करू नका; WHO’कडून चिंताजनक आवाहन
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडल्याचे दिसून येत आहे. अशात कोरोना संकटाबाबत अद्याप निष्कर्ष सिद्ध न झाल्यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO’ने कोणतेही विधान केले नव्हते. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेचे डीजी टेड्रोस अधानोम यांनी चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, आम्ही बूस्टर डोसच्या विरोधात नाही. मात्र आमची मुख्य चिंता सर्वत्र लोकांचे प्राण वाचवणं आहे. ओमिक्रॉननंतर, अनेक देशांनी कोविड- १९ बूस्टर प्रोग्राम सुरू केला आहे. परंतु या बूस्टर डोसचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनवर काहीही परिणाम होत असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. त्यामुळे तूर्तास काहीही निष्कर्ष लावण्याला अर्थ नाही.
याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले कि, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा प्रसार हा सुरुवातीपासून अवलंबलेल्या सर्व उपायांनी थांबवला जाऊ शकतो. यामुळे त्या सर्व उपाययोजनांची लवकरच गांभीर्याने अंमलबजावणी व्हायला हवी. एकट्या लसीने कोणताही देश या संकटातून बाहेर पडूच शकणार नाही. रिपोर्टनुसार, आतापर्यंत ७७ देशांनी कोरोनाच्या नव्या व्हायरस व्हेरियंटची अर्थात ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्ग प्रकरणांची पुष्टी केली आहे. मात्र सत्यता पडताळून पाहता ओमिक्रॉन यापेक्षा अधिक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. केवळ याची अधिकृत माहिती मिळत नाही.
आरोग्य संघटनेच्या अन्य काही अधिकाऱ्यांनी सांगितले कि, ४१ देश अजूनही त्यांच्या लोकसंख्येच्या १०% लोकांवर लसीकरण करू शकलेले नाहीत. त्याच वेळी, ९८ देश ४०% पर्यंतही पोहोचलेले नाहीत. याशिवाय महत्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीस कोणताही गंभीर आजार असेल वा अन्य व्यक्तीस मृत्यूचा कमी धोका असेल तरीही बूस्टर डोस दिल्याने या लोकांचं जीवन धोक्यात येऊ शकत. याबाबत डीजी म्हणाले की, लोक ओमायक्रॉनला सौम्य विषाणू म्हणून कमी समजत आहेत आणि हीच ती चुक व आमच्या मुख्य चिंतेचे कारण होऊन बसले आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून ओमिक्रॉन विषाणूला कमी न समजण्याचे आवाहन लोकांना केले आहे.