हिवाळ्यात धान्य मिश्रित व्हेजिटेबल सूप प्या आणि प्रतिकारशक्ती वाढवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
हॅलो आरोग्य ऑनलाईन। ऋतुचक्रानुसार आता हिवाळा सुरू झाला आहे. हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो. याचे कारणही तसेच आहे. या ऋतूमध्ये आपले शरीर स्वतःहून अधिक कॅलरी बर्न करते. म्हणूनच इतर ऋतूंच्या तुलनेत थंडीत चरबी वाढण्याचा धोकाही कमी असतो. हिवाळ्यात, आपण अन्नाचे प्रमाण थोडेसे वाढवायला हरकत नाही. पण आहार वाढवताना त्यात समावेश करीत असलेल्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने भरड धान्य आणि विविध भाज्यांचा समावेश करावा. यामुळे हिवाळ्यात आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊब आणि संसर्गापासून वाचण्यासाठीची प्रतिकार शक्ती मिळण्यास मदत होते.
हिवाळ्यात असा आहार घ्या ज्याच्या सहाय्याने शरीर उबदार राहते, रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि पोषक तत्वांचीदेखील कमतरता पूर्ण होते. यासाठी जाणून घेऊया काही टिप्स खालीलप्रमाणे:-
– आहारात प्रामुख्याने धान्यमिश्रित व्हेजिटेबल सूप पिणे फायदेशीर आहे. या सूपमध्ये मका, ज्वारी, बाजरी आणि नाचणीचा समावेश करावा. एकतर या धान्यांपासून दलिया, डोसा, इडली असे पदार्थ बनवून खा किंवा भाज्यांसोबत मिसळून मस्त सूप बनवून प्या.
– थंडीच्या दिवसात अनेक भाज्या सहज उपलब्ध होतात. या भाज्या आरोग्यासाठी लाभयदाक असतात. यामुळे मिश्र भाज्यांचे सूप जरूर प्या. यामुळे शरीरातील पाणी आणि पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते. या सूपमध्ये थोडी काळी मिरी पावडर घातल्यास सूप चविष्ट लागते.
– मेथी, पालक, मोहरी, बथुआ यांसारख्या हिरव्या भाज्या हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळतात. यामध्ये जीवनसत्त्वे ए, ई, के, फॉलिक अॅसिड, लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. यामुळे प्रत्येक दोन जेवणांपैकी किमान एक, म्हणजे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी या भाज्या जरुर खा. हे वजन नियंत्रित करण्यासाठी योग्य ठरतं सोबतच कफ दूर करते.
– मेथी, पालक आणि मोहरी या भाज्या एकत्र किंवा स्वतंत्रपणे खाऊ शकता. पण यांचे मिश्र सुप पिणे अधिक लाभदायी आहे. कारण या भाज्यांमुळे शरीर आतून गरम होतेच शिवाय लोहाचे देखील प्रमाण संतुलित राहते. जे हिवाळ्यात आपल्यासाठी आवश्यक असते.
– हिवाळ्यात घाम येत नाही, त्यामुळे पाण्याची कमतरता भासत नाही. म्हणून आपल्या शरीराला पाण्याची गरजच नाही हे समजणे चुकीचे आहे. शरीराला उत्तम कार्य करण्यासाठी ठराविक प्रमाणात पाणी आवश्यक आहे. त्यामुळे रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहेच. शिवाय पाण्याच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यासाठी हिवाळ्यातसुद्धा शरीराच्या गरजेइतके पाणी प्यायला हवे. यासाठी फळांचा रस, भाज्यांचे सूप, धान्यांचे सूप पिणे फायदेशीर आहे.
० धान्यमिश्रित व्हेजिटेबल सूप कसे बनवालं?
– धान्यमिश्रित व्हेजिटेबल सूप बनविणे अतिशय सोप्पे आणि कमी वेळात होते. फक्त यासाठी संबंधित धान्यांची भरड असणे गरजेचे आहे.
साहित्य – ज्वारी आणि बाजरीची १ वाटी भरड, १ वाटी ग्राइंड केलेला मका, १ वाटी धुवून कापलेली मोहरीची भाजी, ७ ते ८ पालकची पाने, काळ मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून काळीमिरी, ४ ग्लास पाणी
कृती – सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. यानंतर पाणी हलके गरम झालयानंतर त्यात एक एक करून भाज्या घाला. एक उकळ येताच या पाण्यात धान्यांची भरड आणि मका घालून सतत ढवळत राहा. यानंतर सूप घट्ट होऊ लागल्यास यात आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा पाणी घालून मीठ आणि काळीमिरी मिसळावी. एक उकळी येताच गॅस बंद करावा आणि एका वाटीत सूप सर्व्ह करावे.