रात्री झोपेत घश्याला कोरड पडून तहान लागते..?; जाणून घ्या कारणे आणि उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे सतत पाणी पिऊ वाटणे फार साहजिक आहे. दरम्यान अनेकदा पाणी पिऊनही तोंड आणि घसा कोरडा पडतो. बहुतेक वेळा संपूर्ण दिवसापेक्षा अधिक रात्री झोपतानाच घशाला कोरड पडल्याचे जाणवते. बहुतांशी हि समस्या वृद्ध व्यक्तींमध्ये दिसून येते. कारण वाढत्या वयाबरोबर इतर आरोग्यविषयक समस्यांमुळे औषधांचे प्रमाण अधिक असते. अनेकदा या औषधांमुळे तोंड कोरडे पडू शकते. पण इतर वयोगटातील व्यक्तींनाही ही समस्या त्रास देत असेल तर याचे कारण आणि त्यावरील उपाय आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
० घशाला कोरड पडण्याची कारणे
तोंडात लाळेची निर्मिती कमी होणे.
तोंडातून श्वास घेणे.
कमी पाणी पिणे.
कॅफिनचे अति सेवन करणे.
औषधांचे दुष्परिणाम.
व्यसने असणे.
० घशाला कोरड पडू नये म्हणून करावयाचे उपाय
१. नियमित भरपूर पाणी प्या –
आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास आपले तोंड आपोआप कोरडे पडू लागते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावे. दरम्यान शरीराला हायड्रेट ठेवल्याने तोंडाच्या कोरडेपणाची समस्यादेखील दूर राहते. त्यामुळे नियमित आपल्या शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे पाणी पिणे आवश्यक आहे.
२. तोंडाने श्वास घेऊ नका –
रात्री झोपताना अनेक लोकांना तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असते. हे मुद्दाम केले जात नाही तर होऊन जाते. यामुळे साहजिकच नाकाऐवजी तोंडातून श्वास घेतला जातो. शिवाय सर्दीमूळे नाक चोंदल्यास तोंडाने श्वास घेतला जातो ज्यामुळे घशाला कोरड पडते. पण असे केल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही असे होईल तेव्हा ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील रहा.
३. कॅफिनयुक्त पदार्थांचे अतिसेवन टाळा –
चहा, कॉफी इत्यादी कॅफिनयुक्त पेयांचे सेवन केल्यामुळे तोंड आणि घसा कोरडा होऊ शकतो. हे पदार्थ शरीराला डिहायड्रेट करतात. परिणामी शरीरातील पाण्याची लेव्हल हळूहळू कमी होत जाते. परिणामी तोंडात कोरडेपणाची तक्रार सुरू होते. त्यामुळे प्रामुख्याने या पदार्थांचे सेवन टाळा आणि इच्छा असेलच तर मर्यादित सेवन करा.
४. निकोटीनयुक्त पदार्थांपासून अंतर ठेवा –
बिडी, सिगारेट, सिगार या गोष्टी निश्चितच शरीरासाठी चांगल्या नसतात. कारण यातील निकोटीन आणि इतर अनेक घटक शरीरासाठी चांगले नाहीत. त्यामुळे तोंडाच्या कोरडेपणापासून सुटका हवी असल्यास अशा निकोटिनयुक्त पदार्थांना स्वतःपासून दूर ठेवा.
५. अल्कोहोलचे सेवन करू नका –
मद्यपान करणे म्हणजे अल्कोहोलचे सेवन करणे. दारूच्या सेवनाने हा घटक शरीरात जातो आणि कोरड्या तोंडाची समस्या वाढवतो. त्यामुळे दारूसारख्या नशिल्या पदार्थांपासून दूर रहा.