निरोगी आरोग्यासाठी गोड मानून कडू खा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्यापैकी असे कित्येक लोक आहेत ज्यांना रोजच्या जेवणानंतर स्वीट्स, आईस्क्रीम किंवा गोडं पानं खायची सवय असते. इतकेच काय तर काही लोक एखादा गोडाचा पदार्थ जेवणासारखा खातात. म्हणजे एकंदर काय तर गॉड खाणाऱ्या शौकीन लोकांची या जगात काही कमी नाही. पण यामुळे आपल्या जिभेला गोड खायची सवय जास्त लागते. त्यामुळे जवळजवळ अशा लोकांच्या स्वयंपाक घरातून कडू पदार्थ हद्दपार केले जातात. पण हेच कडू पदार्थ आश्चर्यकारकपणे पौष्टिक असतात आणि तुमचे आरोग्य सुधारू शकतात हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊयात असे कोणते पदार्थ आहेत जे कडू असले तरीही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
१) कारले – कारले ही एक सामान्य भाजी आहे. जी नेहमी कडू आणि सर्वात नापसंत अन्नाच्या यादीत अग्रस्थानी आहे. मात्र कारल्यामध्ये ट्रायटरपेनोइड्स, पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे निरोगी फायटोकेमिकल्स असतात. जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते. मधुमेह प्रकार २ असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कारले हे एक नैसर्गिक औषध आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट घटक फ्री रॅडिकल्समुळे होणारे पेशींचे नुकसान टाळण्यास देखील मदत करू शकतात.
२) क्रूसिफेरस भाज्या – क्रूसीफेरस भाज्यांमध्ये ब्रोकोली, कोबी, मुळा आणि पालक यांसारख्या भाज्या समाविष्ट होतात. ग्लुकोसिनोलेट्स नावाच्या संयुगेच्या उपस्थितीमुळे त्यांना एक स्पष्टपणे मजबूत चव आहे. हि चव भले कडू असेल पण आरोग्य फायद्यांसाठी लाजवाब आहे. जे लोक क्रूसीफेरस भाज्या खातात त्यांना कर्करोगाचा धोका कमी असतो. त्यामुळे आहारात या भाज्यांचा समावेश जरूर करा.
३) डार्क चॉकलेट – कडू डार्क चॉकलेट हे असे चॉकलेट आहे जे सगळ्यांनाच आवडत नाही. परंतु डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण जास्त असल्याने ते खूप आरोग्यदायी असते. कोको पावडर हि कोकाओ वनस्पतीच्या बीन्स अर्थात बियांपासून बनविली जाते. याची चव कडू असते. पॉलिफेनॉल आणि अँटि ऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे डार्क चॉकलेट खाणे आरोग्यदायी आहे. ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि जळजळ फार कमी होते. डार्क चॉकलेट हे जस्त, तांबे, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि लोह यांसारख्या खनिजांनी भरलेले असते.
४) लिंबूवर्गीय फळांची साल – लिंबू आणि संत्री यांसारखी लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीने भरलेली असतात. या लिंबूवर्गीय फळांची साल आरोग्यदायी आणि पौष्टिक असते. फ्लेव्होनॉइड्सच्या उपस्थितीमुळे या सालींना कडू चव येते. मात्र हि फळे कीटकांपासून फळांचे संरक्षण करण्यास सक्षम असतात. खरं तर, फळांच्या इतर भागांपेक्षा त्यामध्ये फ्लेव्होनॉइड्सचे प्रमाण जास्त असते. म्हणून उत्तम आरोग्यासाठी आहारात अशा फळांची साल जरूर समाविष्ट करा.
५) ग्रीन टी – ग्रीन टीचे अनेक आरोग्यदायी फायदे तुम्ही स्वतःदेखील जाणत असाल. जसे कि, वजन कमी करणे, चांगले पचन, प्रतिकारशक्ती आणि सुधारित हृदय व रक्त वाहिन्यासंबंधीत आरोग्यदायी फायदे. कॅटेचिन आणि पॉली फेनॉलच्या उपस्थितीमुळे नैसर्गिकरित्या या चहाची चव हि कडू असते. मात्र तुमच्या नियमित दुधाच्या चहापेक्षा ग्रीन टी पिणे कधीही आरोग्याच्या दृष्टीने उत्तम. त्यामुळे चव नव्हे तर आरोग्य पहा आणि दररोजच्या रुटीनमध्ये ग्रीन टी चा समावेश जरूर करा.