शरीराच्या उत्तम पोषणासाठी चविष्ट गरमागरम तूप भात खा; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता शीर्षक वाचल्यानंतर अनेकांनी एक साधा तर्क लावला असेल तो म्हणजे शिजवलेल्या गरम गरम भातावर तूपाची धार सोडायची आणि हा भात मस्त वरपायचा. तर माझ्या वाचक मित्रांनो, हा तूप भात करायची पद्धत थोडी वेगळी आहे. पण कठीण नाही हा. त्यामुळे कुणीही अगदी सहज हा चविष्ट पदार्थ बनवून खाऊ शकतो. शिवाय आपल्या भारतीय आहारात तूपाचे एक वेगळे महत्व आहे. वरण भातावर तूप म्हणजे स्वर्गीय आनंद. तसेच एखाद्या गोडाच्या पदार्थाला तूपाचा वास नसेल तर काय मजा? याशिवाय असे कितीतरी पदार्थ आहेत ज्यांना तुपाची फोडणी असेल तर ते पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. यामुळे जेवणाच्या ताटाइतकेच जिभेचे चोचले पुरवल्याचेही समाधान मिळते. पण या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पदार्थ बनवायला सोप्पा आहे. तो खाल्यावर पोट भरत. याशिवाय महत्वाचं म्हणजे शरीराच्या आरोग्याला कोणतेही नुकसान होत नाही. याउलट फायदाच मिळतो.
याचे कारण म्हणजे, भात हा तांदळापासून बनवला जातो. या तांदळामध्ये कॅलरी, प्रथिने, स्नेह पदार्थ, कर्बोदके, तंतुमय पदार्थ, खनिजे, कॅल्शिअम, लोह आणि फॉस्फरस समाविष्ट असते. तर तूपाला आयुर्वेदात औषध मानले जाते. कारण यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये ओमेगा – ३, ओमेगा – ९ फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ए, के, ई इत्यादी घटकांचा समावेश असतो. यामुळे भात आणि तूपाचा हा चविष्ट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण संतुलित प्रमाणात प्राप्त होतं. शिवाय हा भात इतका रुचकर लागतो की एका पेक्षा जास्त वेळा खाल्लात तरीही कंटाळा येत नाही. चला तर जाणून घेऊयात था पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि फायदे खालीलप्रमाणे:-
० साहित्य
साजूक तूप – १ मोठा चमचा
काजू – ८
बेदाणे – २ छोटे चमचे
तमाल पत्रं – १
दालचिनीचा तुकडा – १
हिरवा वेलदोडा – १
लवंगा –
काळी मिरे – ४
कांदा – १ लहान कांदा बारीक चिरलेला
हिरवी मिरची – १
बासमती तांदूळ – १ वाटी
पाणी – २ वाटी
लिंबाचा रस – १ मोठा चमचा
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – आवडीप्रमाणे
० कृती – सर्वप्रथम तांदूळ निवडून स्वच्छ धुवून साधारण २० मिनिटं भिजवा. यानंतर त्यातील पाणी काढून थोडा वेळ निथळत ठेवा. आता कढईमधे साजूक तूप घेऊन त्यात काजू आणि बेदाणे लालसर परतून काढून घ्या. आता तमाल पत्र, दालचिनी, वेलची, लवंगा आणि काळी मिरी परतून घ्या आणि यात कांदा घालून तो सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या. यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. मिरची परतली गेली की, निथळून ठेवलेले तांदूळ घालून ते मिनिटभर परता. यानंतर आता त्यात पाणी, लिंबाचा रस आणि मीठ घालून ते चांगलं ढवळून घ्या. हा भात कुकरमधे करत असाल तर २ शिट्या घेऊन गॅस बंद करा. याशिवाय कढईतच शिजवणार असाल तर २० मिनिट झाकून मंद गॅसवर शिजू द्या. आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून भुरभुरा. आता सर्वात शेवटी तयार भातावर काजू आणि बेदाणे घाला. तुमचा तूप भात रेस्टोरंट स्टाईल तयार.
० फायदे –
१) शाकाहारी लोकांसाठी साजूक तूप आणि भात हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. यामुळे दररोजचे जेवण जेवून कंटाळा आला असेल तर एकदिवस हा पदार्थ नुसत्या वरण वा आमटीसोबत खाल्ला तर संपूर्ण जेवण जेवल्याची भावना निर्माण होते. याशिवाय आवश्यक ते सर्व पोषक घटकही शरीरात प्राप्त होतात.
२) साजूक तूप आणि भात या दोन्ही गोष्टी खाल्ल्याने पचनास त्रास होत नाही. उलट पचनास चालना मिळते. परिणामी बध्दकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
३) केवळ एक अर्धा चमचा तूप खाल्ल्यानेही शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर डीटॉक्स होतं. तर भात प्रोबायोटिकप्रमाणे काम करुन पचनाला मदत करतो. म्हणून तूप भाताचा पर्याय शरीराच्या आरोग्यासाठी नक्कीच उत्तम आहे. शिवाय हा पदार्थ खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारते.
४) तुपामध्ये असणारे फॅटी अँसिड रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय चयापचयाची क्रिया व्यवस्थित होण्यासाठी देखील हे अँसिड मदत करते. तर तुपामधे असणारे लिनोलेनिक अँसिड हदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करते.
५) साजूक तूप आणि भात यांच्याद्वारे प्रथिनं आणि चांगले फॅटस मिळतात. म्हणून तूप भाताचा हा प्रकार कोणत्याही जेवणाच्या ( दुपारच्या / रात्रीच्या ) वेळेस खा. यामुळे पोट लवकर भरतेच. शिवाय शरीराला ऊर्जाही मिळते.