| |

हिवाळ्यात आवर्जून खा डिंकाचे पौष्टिक लाडू; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्याच्या दिवसात शरीरात ऊर्जा टिकवायची असेल तर आहारात डिंक हवाच असे घरातल्या मोठ्यांकडून ऐकायला मिळते. आता मोठे सांगत असतील तर यात काहीतरी तथ्य असेलच ना! मित्रांनो डिंक हा एक असा पदार्थ आहे ज्यामध्ये खूप पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात. हिवाळ्यात शरीरास ऊर्जेची आवश्यकता असते. अशावेळी डिंकाचे लाडू खाणे कधीही फायदेशीर असते. डिंक म्हणजे झाडाचा चिक वा पाणी असते. झाडाच्या खोड़ातून बाहेर येणार पांढरा चिकट द्रव वाळवून डिंक तयार केला जातो. प्रत्येक झाडाचे गुणधर्म त्या त्या झाड़ाच्या डिंकात आलेले असतात. उदा. खैर,धामोडी, साग, पळस, बोरी, बाभळी, कडुलिंब या झाडांच्या डिंका मधे खुप औषधी गुणधर्म असतात. याच डिंकाचा वापर करून बनविले जाणारे लाडू गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी फायदेशीर ठरतात. दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी डिंक आणि डिंकाचे लाडू खाणे उत्तम मानले जाते. चला तर जाणून घेऊयात डिंकाचे लाडू बनविण्याचे साहित्य, कृती आणि फायदे खालीलप्रमाणे:-

० डिंकाचे लाडू बनविण्यासाठी लागणारे साहित्य
चकचकीत स्वच्छ असा वाटाण्यासारखा बारीक डिंक – १/२ किलो
खारीक – १/४ किलो
आळीव – १/४ किलो
खसखस – १/४ किलो
सुकं खोबरे – १ किलो
गूळ – मिश्रणाच्या निम्मा
साजूक तूप – आवडीप्रमाणे
बदाम – १/२ वाटी
वेलची पूड – १ १/२ चमचा
जायफळ पूड – १ चमचा

कृती – सर्वांत आधी डिंक तुपात व्यवस्थित फुलवून घ्या. आता खसखस भाजून घ्या. यानंतर आळीव थोड्या तुपात भाजा. यानंतर खारीक, सुकं खोबरं क्रमाक्रमाने भाजा. आता तळलेला डिंक खलबत्यात थोडासा कुटून घ्या. यानंतर खमंगपणा येण्यासाठी खसखस मिक्सरवर वाटून घ्या आणि खारीकसुध्दा असेच हलके वाटून घ्या. खारीकचे पीठ होणार नाही याची काळजी घ्या. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. यानंतर त्यात बदाम, वेलची व जायफळ पूड घाला. आता हे मिश्रण हाताने बारीक करा.

० लाडू तयार करण्यासाठी पध्दत – लाडू तयार करतेवेळी जेवढं मिश्रण असेल त्याच्यापेक्षा निम्म्या गुळाचा पाक करा. हा पाक कोवळा करू नये. साधारण हातात त्याची गोळी करता आली पाहिजे असा पाक बनवा. यानंतर तयार पाकात मिश्रण ओता आणि चांगलं ढवळा. आता हाताला हलके तूप लावून याचे भरभर लाडू करून घ्या.

फायदे

१) डिंकाचे लाडू आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. हे लाडू खाल्ल्याने शरीरात उष्णतेचा अंश राहतो. परिणामी शारीरिक ऊर्जा कायम राहते.

२) डिंकाचे लाडू खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. परिणामी संसर्गापासून आपल्या शरीराचा बचाव होतो.

३) डिंकाचे लाडू शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी मदत करतात. म्हणून ज्या स्त्रियांना अशक्तपणाचा त्रास असेल त्यांनी डिंकाचे लाडू जरूर खा.

४) डिंकाचे लाडू बद्धकोष्ठतेसारख्या आजारांवर प्रभावीरीत्या काम करते. हे लाडू खाल्ल्याने पोटासंबंधित आजारांपासून सुटका होते.

५) हिवाळ्याच्या हंगामात सांधेदुधी आणि स्नायूमध्ये गोळे येण्याची समस्या होते. यासाठी डिंक लाडू खाणे कधीही फायदेशीर. कारण डिंक खाल्ल्यामुळे सांध्यातील स्नायू मजबूत होतात.

६) डिंकाचे लाडू खाल्ल्याने हाडे ठिसूळ होत नाहीत. त्यामुळे कोमट दुधासोबत डिंकाचे लाडू खा. याचा हाडे आणि स्नायूंवर चांगला परिणाम होतो.