खसखस खा आणि जगा बिंदास्त; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। खसखस हा असा पदार्थ आहे जो बाजारात सहज उपलब्ध असला तरी त्याचे मूल्य अधिक आहे. यामुळे अनेकजण आपल्या आहारात खसखस वगळतात. पण खसखस खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. खरतर खसखस हा असा खाद्यपदार्थ आहे जो पक्वान्नाचा स्वाद वाढवतो. पण याशिवाय खसखसमध्ये औषधीय गुणधर्मदेखील समाविष्ट आहेत. त्यामुळे खसखस खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे आपण जाणून घेणार आहोतच पण त्याआधी खसखस म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि त्यातील पोषण तत्व काय आहेत? हे सर्व काही जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-
० खसखस म्हणजे काय?
– इंग्रजीमध्ये Poppy Seeds आणि बंगालीमध्ये पोस्तो तर तेलुगूमध्ये गसागसालू म्हणून ओळखला जाणारा पदार्थ म्हणजेच खसखस. पॉपी नावाच्या झाडापासून याचे बी मिळते. युरोपीय देशांमध्ये याची वाढ जास्त प्रमाणात होते. तर भारतात पश्चिम बंगालमध्ये हे जास्त आढळते. याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये आणि तेल काढण्यासाठी होतो.
० खसखसचे प्रकार किती व कोणते?
– खसखसचे प्रकार एकूण तीन आहेत.
१) सफेद खसखस – पांढऱ्या रंगाच्या खसखसला भारतीय/आशियाई खसखस म्हणतात. याचा वापर खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.
२) निळे खसखस – या खसखसला युरोपीय खसखस म्हणतात. याचा वापर ब्रेड वा कन्फेक्शनरी अर्थात चॉकलेट/मिठाईमध्ये केला जातो.
३) ओरिएंटल खसखस – या खसखसला ओपियम पॉपी म्हणतात. यामधून अफीम तयार केली जाते.
० खसखसमधील पोषण तत्वे कोणती?
– खसखसमध्ये ऊर्जा, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, जिंक या पोषण तत्त्वांचा समावेश असतो. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
० खसखस खाण्याचे फायदे –
१) उत्तम ऊर्जा स्रोत – शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह वाढविण्यासाठी खसखस मदत करते. कारण यात कार्बोहायड्रेटसारखी पोषक तत्व आहेत, ज्यामुळे ऊर्जेचा आवश्यक स्रोत शरीराला मिळतो. त्यामुळे शरीरातील ऊर्जेची पूर्तता करण्यासाठी व संतुलन राखण्यासाठी खसखसचे फायद्याचे ठरते.
२) रोग प्रतिकारशक्तीत वाढ – आरोग्य चांगले राखण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे असते. खसखसमधील जिंक आणि लोह हे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मदतयुक्त ठरतात. यातील लोह शरीरातील ऑक्सिजन वाढविते आणि प्रतिकारशक्ती सुधारते. तर जिंक शरीरातील कोशिकांच्या वृद्धीसाठी आणि विकासासाठी मदत करते.
३) मेंदूसाठी लाभदायक – मेंदूच्या विकासासाठी खसखसमध्ये असलेले कॅल्शियम, लोह आणि कॉपर उपयुक्त ठरतात. यामधील कॅल्शियम न्युरोनल फंक्शन संतुलित करते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत करते. यामुळे मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत सुरु राहते.
४) हृदयाची काळजी – खसखसमध्ये डाएटरी फायबर असते. यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदय सुरक्षित राहते. शिवाय खसखमध्ये असणारे ओमेगा – 6 फॅटी अॅसिड हृदयाच्या कोणत्याही रोगापासून रक्षण करते. एका संशोधनानुसार, खाद्यपदार्थांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी खसखस तेलामुळे कमी करता येते. त्यामुळे हृदयासंबंधित रोगांना दूर ठेवायचे असेल तर आहारात खसखस तेल जरूर खा.
५) श्वसन स्वास्थ्यासाठी महत्वाची भूमिका – खसखसमधील जिंक श्वसन स्वास्थ्यासंबंधित समस्यांमध्ये मुख्य भूमिका निभावतो. श्वसनलिकेत निर्माण झालेली सूज आणि विषारी पदार्थांच्या विरोधात सायटो प्रोटेक्टिव्ह रूपात खसखस कार्य करते. खसखसमधील जिंक फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पोषक तत्व मानण्यात येते. त्यामुळे दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी याचा चांगला उपयोग होतो.
६) बद्धकोष्ठतेवर परिणामकारक – खसखसमध्ये असलेले फायबर पचनतंत्रासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळेच बद्धकोष्ठतेसाठी हे मुख्य आणि आवश्यक पोषक तत्व समजण्यात येते. फायबर हे स्टूल मुलायम करून पोट स्वच्छ करण्यास आणि मल त्याग करण्यास मदत करते. शिवाय फायबर कोलन कॅन्सरला रोखण्याचे काम करते. त्यामुळे पचनासाठी याची मदत मिळते.
७) हाडांसाठी लाभदायक – खसखसमध्ये असणारे कॅल्शियम, जिंक आणि कॉपर ही सर्व पोषक तत्वे हाडांना मजबूती देतात. एका संशोधनानुसार, कॅल्शियम सप्लिमेंटसह कॉपर आणि जिंक एकत्र करून हाडांचे नुकसान रोखण्यापासून प्रभावी काम करतात. हाडे निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फोरस दोन्ही योग्य प्रमाणात शरीराला आवश्यक असते. खसखस हे फॉस्फरसने समृद्ध असल्यामुळे हाडांसाठी योग्य ठरते.
८) तोंड येण्यावर उत्तम उपाय – तोंड आल्यानंतर जेवताना आणि अगदी पाणी पितानाही त्रास होतो. यात जीभ, ओठ आणि संपूर्ण तोंड जळजळते. यामुळे खाण्यापासून अगदी दात स्वच्छ करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी करताना त्रास होतो. यावर खसखस उत्तम उपाय ठरते. खसखस थंड असल्याने, पोटातील उष्णता कमी करून तोंड येण्यावर उपायकारी ठरते.
९) प्रजननशक्तीमध्ये सुधारणा – खसखस हे विटामिन ई चा चांगला स्रोत असल्यामुळे खसखसचे सेवन हे महिलांमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्याचे काम करते. एका संशोधनानुसार, खसखसच्या तेलाने फॅलोपियन ट्युब फ्लश केल्याने फर्टिलिटीला मदत मिळते. फॅलोपियन ट्युब हा असा मार्ग आहे जिथून अंडी अंडायशापासून गर्भाशयापर्यंत जातात. तर एनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार, विटामिन ई प्रजननशक्तीत सुधारणा आणते. त्यामुळे प्रजनन काळात विटामिन ई युक्त आहार सेवन करण्याचा महिलांना सल्ला देण्यात येतो. यामध्ये खसखसच्या नावाचादेखील समावेश आहे.
१०) आरामदायी झोपेसाठी – अनिद्रा समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी याचा अनादी काळापासून उपयोग केला जातो. मात्र हे अति प्रमाणात घेऊ नका. घरामध्ये वापरण्यात येणारी खसखस ही पूर्णतः स्वच्छ करून बाजारात विकली जाते. यामध्ये अफीमचे प्रमाण नसते. मात्र झोपेसाठी दुधात खसखस मिसळून खा. याव्यतिरिक्त खसखसची खीरही पिऊ शकता.