डाळिंब खाणार तर सुदृढ राहणार; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी डाळिंब खाणे फायद्याचे ठरते. कारण यात ओमेगा फाइव्ह कॅल्शिअम, पोटॅशिअम, अँटीऑक्सिडंट, प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, रायबोफ्लेवीन, लोह, फॉलिक अॅसिड, पॉलीअन सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, फॉस्फरस, थायमिन हे पोषक घटक समाविष्ट असतात. यामुळे डाळिबांच्या नियमित सेवनाने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात आरोग्यास फायदे मिळविण्यासाठी डाळिंब कसे खावे आणि ते खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत. खालीलप्रमाणे:-
० डाळिंब कसे खावे?
– डाळिंबाची साले काढून त्याच्या आतील लालसर दिसणारी चिमुकली फळे चावून चावून खा. डाळिंबाच्या पांढऱ्या बिया फेकून न देता त्या चावून खा. साधा खोकला किंवा आवाज बसण्याची समस्या असेल तर जरूर डाळिंब खा. यामुळे लवकर आराम मिळतो. तसेच त्वचा विकारात डाळिंबाचा रस त्वचेवर लावल्याने फायदा होतो. शिवाय लहान मुलांना नियमित डाळिंब खाण्यास देणे त्यांच्या सुदृढतेसाठी आवश्यक असते. मात्र लक्षात ठेवा ताजे रसरशीत डाळिंब खाल्ल्यानेच फायदा होतो. रसायनांचा अतिरेक करुन कृत्रिमरित्या तयार केलेले डाळिंब शरीरास अपायकारक ठरू शकते. याउलट नैसर्गिकरित्या पिकवलेले, ऑरगॅनिक शेती (शेणगत, गांडुळखत) करुन पिकवलेले डाळिंब आरोग्यास अधिक लाभ देतात, असे तज्ज्ञ सांगतात.
० डाळिंब खाण्याचे आरोग्याशी संबंधित फायदे
१) रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.
– डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच सध्या जगभरात कहर केलेल्या कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असण्याची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत दररोज किमान १ डाळिंब खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
२) पचनक्रियेच्या समस्या दूर होतात.
– नियमित डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित विविध समस्यांवर आराम मिळतो. इतकेच नव्हे तर पोटाच्या विकारांपासून सुटका मिळते आणि पचनाच्या समस्या सुटण्यास मदत होते. परिणामी आपली पचनशक्ती सुधारते.
३) हृदय विकारावर लाभकारी.
– डाळिंबाचे नियमित सेवन शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. यामुळे हृदय निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. म्हणून हृदयविकार असणाऱ्या लोकांनी दररोज किमान १ डाळिंब खावे.
४) अशक्तपणावर असरदार.
– सतत आजारपणात असणाऱ्या रुग्णांनी नियमित डाळिंब खाल्ल्यास त्यांची तब्येत लवकर सुधारते. कारण डाळिंबाचे नियमित सेवन शरीरातील रक्ताची गुणवत्ता सुधारण्यास लाभदायी असते. परिणामी शरीरात पुरेश्या प्रमाणात शुद्ध रक्त असल्यामुळे शारीरिक थकवा दूर होऊन उत्साह येतो आणि अशक्तपणा वा कमकुवतपणा हळूहळू कमी होतो.
५) इतर फायदे.
– डाळिंबात अनेक पौष्टीक घटक असतात. जे रक्तदाब (ब्लडप्रेशर), हृदयरोग, कॅन्सर, मधुमेह, उष्णतेचे विकार, सांध्यांचे विकार, वातविकार, त्वचाविकार, स्मृतीदोष, अशक्तपणा या समस्या दूर करण्यास मदत करतात. याच कारणामुळे डाळिंब आरोग्यास लाभदायी असल्याचे सिद्ध होते.