डाएटचार्टमधून भात केला बाद, तर पर्याय म्हणून ‘हे’ पदार्थ खा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता बारीक व्हायचं आहे किंवा मग सुदृढ राहायचं आहे तर मग डाएट चार्ट हा हवाच. असा अनेकांचा अट्टाहास असतो. मग काय दैनंदिन आहारात सगळ्यात आधी हकालपट्टी होते ती भाताची. याचं कारण भात आरोग्याला हानिकारक आहे म्हणून नाही. तर काही आरोग्यविषयक समस्यांमुळे डॉक्टरांनी आहारातील कर्बोदकं कमी करायला सांगितलेले असतात. तर काहींना आपल्या रोजच्या आहारातून उष्मांक कमी करायचे असतात. शिवाय काहींना भाताची अँलर्जी असते म्हणून भाताला पर्याय हवे असतात. मग अश्यावेळी ज्या लोकांना भाताशिवाय आहार अपूर्ण वाटतो ते इतर पर्याय शोधू लागतात. तर आजचा हा लेख अश्या प्रत्येक राईस लव्हरला समर्पित. कारण आम्ही तुम्हाला भातासाठी अश्या तोडीचे पदार्थ सांगणार आहोत . जे खाल्ल्यानंतर तुम्हाला भाताची आठवणसुद्धा येणार नाही. शेवटी कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है। चला तर जाणून घेऊयात भाताला उत्तम आणि पौष्टिक पर्याय खालीलप्रमाणे:-
१) दलिया – दलिया म्हणजे भरड स्वरुपातील गहू. प्रामुख्याने मध्य पूर्वेकडील देशात दलिया हे अन्नाच्या स्वरुपात खाल्ले जाते. कोंडायुक्त दलिया आरोग्यासाठी फायदेशीरदेखील असतो. ड्युरम प्रकारच्या गव्हापासून हा पदार्थ तयार केला जातो. कोंड्यामुळे दलिया पौष्टिक तर होतोच शिवाय पोटदेखील समाधानकारक भरते. मुख्य म्हणजे, दलियामुळे आतड्यातील आरोग्यदायी जिवाणुंची वाढ होते. त्यामुळे पचन चांगलं होते आणि बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही. दलियामधे फोलेट, बी६ जीवनसत्त्वं, नियासिन, तांबे, मॅग्नीज, मॅग्नेशिअम आणि लोह हे महत्त्वाचे घटक असतात.
२) फ्लॉवर भात – हिवाळ्याच्या दिवसात बाजारात फ्लॉवर मोठ्या प्रमाणात मिळतो. यातील क्रुसीफेरस वर्गीय फ्लॉवरचा आहारात भातस्वरुपी समावेश केला तर आरोग्यास फायदेशीर ठरते. कारण या फ्लॉवरमधे उत्तम पोषणमूल्यं समाविष्ट असतात. शिवाय फोलेट, के जीवनसत्त्व, फायबर आणि आरोग्यास फायदेशीर असे गुणधर्मदेखील फ्लॉवरमधे असतात. यासाठी फ्लॉवर स्वच्छ धुवून तो किसून घ्या आणि तो उकडून केवळ मीठ, मिरे पूड घालून खा. याशिवाय विविध भाज्या आणि मसाले घालूनही तो चवीला उत्तम लागतो. या फ्लॉवर भातात अगदी कमी उष्मांक असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.
३) किसलेला कोबी – फ्लॉवर वर्गातील कोबीदेखील भाताला पर्याय आहे. कारण यात कमी उष्मांक आणि कर्बोदकं समाविष्ट असतात. यासाठी कोबी स्वच्छ धुवून किसून घ्या आणि यात चवीपुरत मीठ, मिरची, गरम मसाला, चाट मसाला, पास्ता मसाला आवडीनुसार घालून खा. यासाठी अगदी साधा कोबी, रंगीत कोबी किसून खाल्ल्यास भाताची गरज तर पूर्ण होतेच पण पोटही लवकर भरतं. कोबीमध्ये क, के ही जीवनसत्त्वं आणि फोलेट, पोटॅशिअम, मॅग्नेशियम हे मुख्य गुणधर्म असतात.
४) किनोआ – किनोआ म्हणजे बिया. दक्षिण अमेरिकेतलं हे प्रमुख अन्न आहे. यातील गुणधर्म वजन कमी करण्यास फायदेशीर असतात आणि आरोग्यास पोषकही असतात. अगदी बारीक बिया स्वरुपात असलेला किनोआ ग्लूटेन फ्री असून यात भातापेक्षा प्रथिन जास्त असतात. वनस्पतीजन्य अन्नामधील क्विनोआ हा असा पदार्थ आहे ज्यात प्रथिनांची साखळी पूर्ण करणारे सर्व नऊ अमिनो अँसिड उपलब्ध आहेत. शिवाय यात तांब आणि मॅग्नेशिअम ही दोन प्रमुख खनिजंही आहेत.
५) मिलेट – बाजरी, नागली, ज्वारी हि धान्य म्हणजे मिलेट. हे धान्य सध्या भरड स्वरुपातही उपलब्ध होतात. जे विविध भाज्या आणि मसाले घालून उपम्याप्रमाणे करता येते. तसेच बाजारात विविध स्वरुपात मिलेटस उपलब्ध आहेत. नुसत्या भातालाच नाही तर ज्यांना गव्हातील ग्लुटेनची अँलर्जी आहे त्यांनादेखील पोळीला पर्याय म्हणून मिलेट खाण्याचा सल्ला डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ देतात. यात मिलेट उपमा, खिचडी, मिलेट डोसा, मिलेट इडली असे पोषणयुक्त पदार्थ बनवले जातात.