गुलाबी गाल हवेत..? तर घरच्या घरी बनवा चीक टींट; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। मेकअप करताना जसा आय शॅडो महत्वाचा तसा चीक टींट पण तितकाच महत्वाचा आहे. कारण लाल गुळाची गाल कुणाला नको असतात..? आता गुलाबी गाल महिलांच्या सौंदर्यात किती आणि कशी भर घालतात ते काही वेगळं सांगायला नको. म्हणून तर मेकअप करताना ब्लश १००% वापरला जातो. पण जर विना मेकअप तुमचे गाल नैसर्गिकरित्या गुलाबी दिसू लागले तर.. असं होऊ शकत..? तर याच उत्तर आहे हो.
गाल गुलाबी दिसण्यासाठी आता ब्लशची गरज नाही. याऐवजी घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांनी बनवलेले चीक टिंट वापरून तुमचे गाल गुलाबी होऊ शकतात. टेन्शन घेऊ नका. घरीच लीप आणि चीक टिंट बनवणे सोपे आहे आणि त्यासाठी आजचा हा खास लेख. चला तर जाणून घेऊया कोणत्या पदार्थांपासून कसे चीक आणि लीप टींट बनवता येईल ते खालीलप्रमाणे:-
१) गुलाब आणि बदाम टिंट –
बदामाचे तेल व्हिटॅमिन ए’ने समृद्ध असते. यामुळे त्वचा मऊ आणि मॉश्चराइज्ड राहते. तसेच गुलाबी रंगाचे गुलाब सुगंध आणि सुंदरता देणारे असते.
टिंट बनवण्यासाठी २ चमचे अस्सल बदाम तेल घेऊन त्यात थोडे पाणी मिसळा. गुलाबी रंगाच्या किंवा लाल रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्या सुकवून त्यांची पूड करून ती १ टेबलस्पून बदामाचे तेल व पाण्याच्या मिश्रणात घालून ढवळून घ्या. तुमचे नैसर्गिक गुलाब आणि बदाम टिंट तयार.
२) डाळिंब टिंट –
डाळिंबाचा नैसर्गिक गुलाबी रंग गालावर आणि अगदी ओठांवर सुंदर गुलाबी टिंट देते.
यासाठी डाळींबाचे ताजे दाणे मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून घ्या. आता यात ऑलिव्ह ऑईल वा खोबरेल तेलाचे काही थेंब घालून घट्ट पेस्ट तयार करा. आता हवाबंद डबीत साठवा आणि नियमित वापर करा.
३) बीट टिंट –
बीटमध्ये बेटानिन्स असल्यामुळे त्याचा नैसर्गिक रंग गुलाबी असतो. हा रंग त्वचेसाठी आणि ओठांसाठी फायदेशीर ठरतो.
यासाठी ताज्या बीटरूटचा रस थोड्या ग्लिसरीनमध्ये मिसळा. यात १ चमचा पाणी मिसळून हे मिश्रण एका काचेच्या कंटेनरमध्ये ठेवा. साधारण २ ते ३ तास थंड करून घ्या. तुमचे बीटरूट टिंट तयार.
४) नैसर्गिक फूड कलर टिंट –
नैसर्गिक फूड कलर वापरून टिंट बनवता येतो.
यासाठी एका लहान भांड्यात १ चमचा पाणी आणि बदामाचे तेल घाला. आता त्यात रेड फूड कलरचे २ ते ३ थेंब टाका. या सर्व गोष्टी नीट मिसळून त्याची घट्ट पेस्ट बनवा. हे मिश्रण छोट्या डबीत भरून २ तास फ्रीजमध्ये ठेवा. तुमचे चीक टिंट तयार.