केसांच्या समस्या करा चुटकीसरशी दूर; कसे? ते लगेच जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। काळेभोर, लांबसडक आणि मुलायम केस हे निरोगी केसांचे लक्षण आहे. तसे पाहता प्रत्येकालाच आपले केस असे असावे वाटत. पण अनेकदा केसांना योग्य पोषण न मिळाल्याने आपले केस निर्जीव, कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. अनेकदा आपण जेव्हा आपले केस धुतो तेव्हा अचानकच ते सुंदर दिसू लागतात. परंतु, एक दोन दिवस गेले कि पुन्हा केस निर्जीव दिसतात. म्हणूनच केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. ज्यामुळे आपले केस दाट आणि नैसर्गिक चमकयुक्त होतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्पे हेअर मास्क सांगणार आहोत. ज्याच्या साहाय्याने तुम्ही घरातल्या घरात आपल्या केसांना योग्य पद्धतीने पोषण देऊ शकता.
- पेरूचा हेअर मास्क
साहित्य
पेरूची पाने – १५ ते २०
पाणी – १ वाटी
अंडे – १ मध्यम
गुलाब पाणी – २ ते ३ चमचे
*हेअर मास्क बनवण्याची कृती – सर्वप्रथम एका भांड्यात पाणी चांगले उकळवा. या पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्यात पेरूची पाने स्वच्छ धुवून घाला. यानंतर हे पाणी साधारण २० मिनिटे पुन्हा एकदा उकळवा. यानंतर, त्या पाण्यामध्ये उकळलेली पेरूची पाने काढून मिक्सर ग्राइंडरच्या भांडयामध्ये घ्या. त्यात गुलाबाचे पाणी आणि अंडे मिसळा. याची व्यवस्थित वाटून जाड पेस्ट तयार करा. शिवाय पाने काढल्यानंतर ते पाणी फेकून न देता तसेच ठेवून द्या.
*हेअर मास्क केसांसाठी वापरण्याची पद्धत – पेरूच्या पानांची पेस्ट हाताने किंवा ब्रशच्या सहाय्याने आपल्या केसांच्या स्काल्पवर तसेच केसांवर व्यवस्थित लावा. यानंतर शॉवर कॅपने केस झाकून ठेवा. ही पेस्ट १० ते १५ मिनिटांसाठी आपल्या केसांवर लावून ठेवा. यानंतर केसांवर बाजूला काढून ठेवलेल्या पेरूच्या पानांच्या पाण्याने अगदी नीट मसाज करा आणि १० मिनिटांनंतर आपले केस पाण्याने धुवून स्वच्छ करा.
- दही हेअर मास्क
* साहित्य
दही – २ चमचे
कोरफड – ३ चमचे
ऑलिव्ह ऑईल – २ चमचे
मध – १ चमचा
* हेअर मास्क बनविण्याची कृती – हा हेअर मास्क तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये दही, कोरफड, ऑलिव्ह ऑइल आणि मध एकत्र घ्या. हि सर्व सामग्री मिक्स करून जाडसर पेस्ट तयार करा.
* हेअर मास्क केसांसाठी वापरण्याची पद्धत – तयार झालेला हेअर मास्क साधारण १५ मिनिटांसाठी आपल्या केसांवर आणि स्काल्पवर व्यवस्थित लावा. यानंतर हा मास्क सुकल्यावर थंड पाण्यानेच केस स्वच्छ धुऊन घ्या आणि ड्रायरचा वापर न करता केस कोरडे करा.
* हेअर मास्कचे फायदे –
१) केसांना नैसर्गिक चमक मिळेल :
– पेरूच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. हे गुणधर्म आपले केस चमकदार बनवण्यास मदत करतात. शिवाय पेरूच्या पानांमध्ये व्हिटामिन बी आणि सी देखील असते. जे स्काल्पचे खोलवर पोषण करते.
– दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीनचा समावेश असतो. त्यामुळे केसांना नैसर्गिक रित्या कंडिशनिंग होते आणि त्यास विशेष चमक प्राप्त होते.
२) स्काल्प मजबूत होते :
– केसांची कोणतीही समस्या दूर करण्यासाठी आधी स्काल्प मजबूत असणे अत्यंत गरजेचे असते आणि पेरूच्या पानांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. यामुळे आपला स्काल्प निरोगी ठेवण्यास मदत होते.
– दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड, फॉस्फोरस, आयर्न, विटामिन ए, विटामिन बी१, विटामिन बी२, विटामिन बी५ आणि विटामिन सी सारख्या अनेक खनिज तत्त्वांची भर असते. हे सर्व विटामिन्स शरीरासह केसाच्या स्काल्पचे आरोग्य राखण्यास अतिशय फायदेशीर असतात.