हरिद्रा म्हणजे निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदिक पर्याय; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। औषधी गुणधर्मामुळे काही मसाल्यांना आयुर्वेदामध्ये विशेष स्थान आहे. यापैकीच एक म्हणजे हळद. मुळात आयुर्वेदात हळदीला हरिद्रा म्हणून ओळखले जाते. हळद ही एक अशी औषधी वनस्पती आहे, जिच्यामुळे अनेको आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक लाभ मिळतात. मुळात हळदीमध्ये कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडेंटचा समावेश असतो ज्याचा पुरेपूर लाभ आपल्या आरोग्याला होतो.
हरिद्रा म्हणजे कांती वाढविणारा व सोन्यासारखी लकाकी देणारा म्हणुन हळदीला कांचनी असेही संबोधले जाते. हळद, त्वचेची निगा राखण्यासही मदत करते. त्वचा विकारात हळद नैसर्गिक दाहशामक व व्रणरोपक म्हणुन वापरली जाते. व्रणाचे शोधन करून जखम भरून काढण्यात हळद प्रभावी असते. चला तर जाणून घेऊयात हळदीचे फायदे.
१) रोगप्रतिकारकशक्ती चांगली राखण्यात व शरीराची झीज भरून काढण्यासाठी हळदीतील कर्क्युमिन उपयोगी पडते. हे कर्क्युमीन ऍन्टीसेप्टीक, ऍन्टीइनफ्लेमेटरी दाहशमक, तसेच जैवप्रतिरोधक म्हणून काम करते.
२) सायनस व श्वसन संस्थेच्या विकारातही हळदीचा खुप उपयोग होतो. छातीत साठलेला कफ मोकळा करण्यासाठी हळद व सूंठ यांचे मिश्रण मधातून चाटण म्हणून दिल्यास चांगला फरक पडतो.
३) कोणत्याही व्हायरल संसर्गानंतर होणाऱ्या रक्तातील गुठळ्या कमी करण्यासाठी हळदीमधील कर्क्युमीन उपयोगी ठरते. इन्फेक्शननंतर येणारा थकवा व तणाव घालवण्यासाठी हळदीचे दूध पीबीने फायद्याचे ठरते.
४) हळदीतील ऍन्टीऑक्सीडंट घटक ताण कमी करण्यात व मेंदूची ताकद वाढविण्यास मदत करतात.
५) हरिद्रा वारंवार होणारे सर्दी व पडसे कमी करते. जीर्ण सर्दी व पडसे यासाठी हळद आणि पिंपळी उगाळून गरम पाण्यातून घेतल्यास श्वसनमार्ग मोकळा करून श्वसन संस्थेला बळ मिळते.
६) हळद जखमांमधून कोणताही संसर्ग होऊ देत नाही. त्यामुळे ऍन्टीसेप्टीक म्हणून हळदीचा उपयोग केला जातो. त्वचेवरील डाग, पुरळ, डोळयाखाली काळे वर्तुळ, त्वचेवर मुरूमे यावर हळद अत्यंत उपयोगी आहे. मुरमे व सुरकुत्या घालवण्यासाठी हळद व मध एकत्र करून लावणे फायद्याचे ठरते.
७) हळद कृमिघ्न म्हणून पण वापरली जाते. त्यामुळे जंत वा अन्य जंतु संसर्ग झाल्यास हळद पोटातून दिली जाते.
८) मधुमेही रूग्णांमध्ये हळद रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी उपयोगी पडते. मधुमेही रूग्णांमधील जखमा लवकर भरून येण्यास मदत करते.
९) रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी हळदीचा उपयोग होतो. हळद रक्तातील गाठी होण्याचे प्रमाण कमी करून रक्त पातळ होण्यास मदत करते. पक्षाघात किंवा हृदयविकार यासारख्या आजारात रक्तातील गाठी होण्यापासून रोखण्यात हळद उपयोगी आहे. रक्तशुध्दीकरण करणे हे हळदीच्या प्रमुख कार्य आहे.
१०) अपचन, पोट साफ न होणे, ऍसिडीटी, मळमळ पोटाचे विकार यांमध्ये हळद दाह व दुखणे कमी करते. शिवाय पचनक्रिया सुधारून पाचक स्त्राव चांगल्या प्रकारे निर्माण करते.
११) हळद यकृत विकारात दाह कमी करणे, पचन चांगले करणे व यकृतातील पाचक स्त्राव निर्माण करण्यास उपयोगी पडते. कडु व तिखट रसामुळे तसेच उष्ण वीर्य व रूक्ष गुणामुळे यकृतावर चांगले काम करते व रक्त चांगल्या प्रकारे निर्माण होण्यास मदत करते. रक्ताचे प्रमाण व दर्जा चांगला बनविण्यासाठी मदत करते.
१२) प्रसुतीनंतर गर्भाशयाची शुध्दी करण्यासाठी व संसर्ग टाळण्यासाठी हळद दिली जाते. यात हळद गर्भाशयावरची सुज कमी करते व दुखण्यापासून आराम देत कोणतेही व्रण राहु देत नाहीत. तसेच स्तन्य म्हणुन पण दुध उर्त्सजन होण्यास हळद उपयोगी पडते.
१३) हळदीमधील काही घटक हे कॅन्सर पेशींना अटकाव घालण्यासाठी उपयोगी पडतात. तसेच कॅन्सर पेशींना नष्ट करण्यासाठी हळदीचा उपयोग होतो. रोजच्या जेवणात हळदीचे सेवन केल्यास निरोगी व उत्साही जगता येते.