तुमच्या हास्यात दडले आहे तुमच्या आरोग्याचे हित; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। असे म्हणतात की, माणसाचे सौंदर्य त्याचे हास्य फुलवीत असते. मात्र हे हास्य आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे हे फार कमी लोक जाणतात. तसे पाहता आजच्या धावपळीच्या आयुष्यात लोक जणू हसणंच विसरले आहेत. अनेकदा कामाचा ताण, घरगुती समस्या आणि वैयक्तिक बाबींमुळे लोक नैराश्यात जाऊन टोकाचे पाऊल उचलतात. हे असं होऊ नये म्हणून यावर एकच उपाय. हसा आणि हसवा. हास्य हे आनंदाचे प्रतीक असले तरी कित्येक लोक केवळ मोजक्या हास्याच्या आडोश्यात राहणे पसंत करतात. पर ये जिना भी क्या जिना यारों..?
तुम्ही पाहिले असाल, कि सकाळच्यावेळी अनेक बागांमध्ये अनेक लोक व्यायाम करताना जोरजोरात हा हा करीत हसत असतात. अनेकांना हा नजारा थोडा विचित्र वाटू शकतो पण हेच आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. खरतर हसताना अनेक मांसपेशींची हालचाल होते ज्यामूळे शरीराची एक्सरसाइज होते. इतकेच नव्हे तर हास्याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्ल्ड स्माईल डे देखील साजरा केला जातो. तर चला जाणून घेऊयात आपल्या हास्यात दडलेले आपल्या आरोग्याशी संबंधित फायदे पुढीलप्रमाणे :-
१) हसण्याचे पल्स रेट ( हार्ट रेट/ हृदयाचे ठोके ) सुरळीतपणे सुरु राहतात.
२) जे लोक खूप हसतात, त्यांना हृदयरोग होण्याचा धोका फार दुर्मिळ असतो.
३) हसण्याने ब्लड प्रेशरचा ( रक्तदाबाचा त्रास ) त्रास कमी होतो.
४) नेहमी हसत राहिल्याने मानसिक ताण – तणाव कमी होतो. हसण्यामूळे एन्डॉर्फिनची (शरिरातील मार्फिनचा/हार्मोनचा एक प्रकार) निर्मिती होते आणि यामुळे तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचा प्रभाव कमी होतो.
५) हसण्यामुळे शारीरिक थकवा शमतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. परिणामी वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची तुम्हाला शक्ती मिळते.
६) तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार हसण्याने हृदयाशी संबंधीत आजारांचा धोका ४० टक्के कमी होतो. हसण्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होऊन त्यात वाढ होते. यामुळे हृदयासहीत शरीराच्या सर्व अंगांना योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होतो आणि यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
७) हसल्यामुळे मन आनंदीत राहते व शरीरात आनंदाचे हार्मोन्स सेरोटोनिन तयार होतात. यामुळे भूक कमी लागते. परिणामी वजन घटण्यास मदत होते. (इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, १० ते १५ मिनिट सतत हसल्याने किमान ४० कॅलरी बर्न होतात.)
६) हसण्यामुळे चेहऱ्यावरील मांसपेशींची हालचाल होते. याचा परिणाम आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर पडतो आणि चेहरा फ्रेश दिसतो आणि त्यावर चमक येते.
लक्षात ठेवा :- आयुष्य किती जगायचे हे आपल्या हातात नसले तरीही आयुष्य कसे जगायचे हे आपल्या हातात असते. यामुळे मनसोक्त जगा आणि मनमोकळे हसा.