सर्दीमुळे चोंदलेलं नाक देतंय त्रास; जाणून घ्या घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाचे दिवस असो किंवा बदलते हवामान. याचा आपल्या आरोग्यावर खोल परिणाम होत असतो. बहुतेकदा अश्या वातावरणामध्ये प्रामुख्याने होणारा आजार म्हणजे सर्दी पडसे. एकदा का सर्दी झाली कि मग नाक जाम किंवा गच्च होणे, श्वास घ्यायला त्रास, छाती भरणे असे त्रास संभवतात. नाक जाम होण्याला आपण नाक चोंदणे असेही म्हणतो. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे, प्रामुख्याने थंडी आणि पावसाच्या दिवसात कुणालाही सर्दी, खोकला आणि व्हायरल इंफेक्शनचा त्रास होतोच. त्यात सर्दी लवकार जात नाही. त्यामुळे जीव अगदी मेताकुटीला यतेतो.
सर्दी झाल्यावर नाकातील टिश्यू आणि रक्तकोशिकांना सूज आल्याने नाक बंद होते. ही समस्या काही दिवसांनी आपोआप ठीक होणारी असली, तरी जो पर्यंत ही समस्या टिकून राहते तो पर्यंत व्यक्ती अस्वस्थ राहते. हवापालट झाल्याने होणारे सर्दी-खोकला, एखादी अॅलर्जी, नाकाच्या आतमध्ये झालेली टिश्यूची अतिरिक्त वाढ, किंवा सायनसचा सातात्याने होणारा त्रास या कारणांमुळे नाक बंद होण्याची समस्या उद्भवते. नाक बंद होण्याच्या जोडीने क्वचित डोके जड होणे, कान दुखणे, घसा खवखवणे, खोकला, छातीमध्ये हलकी वेदना, आणि बारीक ताप याही समस्या पहावयास मिळतात. यामुळे ना शांत झोप लागते ना पुरेसा आराम मिळतो. म्हणूनच आज सर्दीमुळे चोंदलेलं नाक घरच्याघरी सोप्प्या उपायांच्या सहाय्याने कसं मोकळं करायचं हे आपण जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊयात घरगुती उपाय:-
१) गरम पाण्याने अंघोळ – सर्दीमुळे नाक चोंदल्यास गरम पाण्याने अंघोळ करा. यामुळे चोंदलेले नाक मोकळे होण्यास मदत होते व फ्रेशदेखील वाटते.
२) आले – आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्याने नाक मोकळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर आले घालून केलेला चहाही आपण पिऊ शकता.
३) लिंबू रस आणि मध – चमचाभर लिंबाच्या रसात थोडे मध मिसळून हे मिश्रण रोज सकाळी प्यावे. यामुळे चोंदलेले नाक सहज मोकळे होण्यासाठी आपल्याला सहाय्य्य लाभते.
४) तुळशीचा काढा – यासाठी १ कप पाणी उकळून त्यामध्ये तुळशीची ८-१० पाने घालून हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्या. यानंतर हे पाणी गाळून त्यात १चमचा मध आणि लिंबाच्या रसाचे २ थेंब घालून व्यवस्थित ढवळा. हा काढा गरम असताना प्या. यामुळे लगेच आराम मिळेल.
५) पुदिना – गरम पाण्यात पुदिन्याची ५-७ पाने हाताने तोडून टाका आणि त्याची वाफ घ्या. यामुळे सर्दीने जाम झालेले नाक मोकळे होण्यास मदत होते.
६) पेपरमिंट ऑइल – सर्दीमुळे नाक बंद असल्यास गरम पाण्यामध्ये पेपरमिंट ऑईलचे २-३ थेंब टाकून त्याची वाफ नाकावाटे शरीरात ओढा. असे केल्याने लवकर आराम पडतो आणि नाक मोकळे होते.
७) निलगिरीचे तेल – निलगिरीच्या तेलाचे काही थेंब रुमालावर घालून ते सतत हुंगत राहिल्यानेही बंद नाक मोकळे होते.
० आहारात बदल –
८) कांदा – ओला किंवा लालसर कांदा बारीक चिरत राहावे. यामुळे डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहण्यास मदत होईल. परिणामी नाक मोकळे होईल. तसेच, तिखट कांदा खावा. यामुळेही नाकातून पाणी वाहून नाक मोकळे होईल.
९) टोमॅटो ज्यूस – सतत सर्दीमूळे नाक बंद होत असेल तर टोमॅटोचे ज्यूस प्या. यासाठी ४-५ टोमॅटो स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्या. यात १ टे.स्पू. बारीक चिरलेली लसूण व चवीपुरते मीठ घाला. या ज्यूसचे दिवसातून दोनदा सेवन करा. अगदी सायनसमुळे नाक बंद होत असेल तरीही हा ज्यूस पुष्कळ अंशी हि समस्या कमी करेल.
१०) चिकन सूप – मांसाहार करणाऱ्यांनी सर्दी झालेल्या दिवसांमध्ये गरमागरम चिकन सूप घ्यावे. यामुळे नाकही मोकळे होईल आणि शरीराला ऊर्जाही मिळेल.
११) लसूण खा – सर्दी झाल्यास लसूण कच्चा खा आणि हे शक्य नसेल तर रोजच्या भाजी आमटीमध्ये लसूण वापरा. शिवाय नाक बंद असल्यास गरम पाण्यामध्ये लसुणाच्या पाकळ्या घालून त्या पाण्याने वाफ घेतल्याने आराम पडतो.
० महत्वाचे – सर्दी झालेल्या दिवसांमध्ये मटन, केळी, मैद्याचे किंवा अन्य प्रोसेस्ड अन्नपदार्थ टाळावेत.