निर्जळी उपवास करणाऱ्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या भारतीय संस्कृतीत विशेष महत्व असणारा श्रावण महिना सुरु आहे. त्यामुळे अनेकांची व्रतवैकल्य सुरु असतील. या महिन्यात केल्या जाणाऱ्या पूजाविधी आणि व्रतांसाठी अनेक लोक निर्जळी उपवास करतात. कारण निर्जळी म्हणजे पाणीदेखील न पिता कडक उपवास केल्याने व्रताचे फळ लाभदायक ठरते अशी फार जुनी मान्यता आहे. मुख्य बाब अशी कि, उपवास करावा का नाही याबाबत प्रत्येक व्यक्तीने त्याच्या त्याच्या समजांनुसार निरनिराळे मत असते. अनेकांचे असे म्हणणे असते कि भगवंताची उपासना करण्यासाठी उपाशी राहण्याची काहीच गरज नसते. हा पण शरीराला आराम म्हणून उपवास करणे नक्कीच चांगले आहे.
निर्जळी उपवास करण्यास अनेक आहार तज्ञांचा पाठिंबा नाही.उपवास करणे ज्याचा त्याचा प्रश्न असला तरीही थोडा सात्त्विक आहार घेणे शरीराची गरज आहे असे आहारतज्ञ सांगतात. मात्र काही जणांची निर्जळी उपवास करण्यावरच जास्त श्रद्धा असते. परंतु यामुळे शारीरिक हानी होण्याची शक्यता दाट असते. जर दिवसभर पाणी न पिता उपवास केला तर, शरीर डिहायड्रेट होऊ शकते. त्यामुळे निर्जळी उपवास करण्याआधी २-३ दिवस आहारात विशेष बदल करायला हवे. ज्यामुळे निर्जळी उपवास केल्याने तुमचे शरीर अशक्त आणि कमजोर होणार नाही. जाणून घ्या यासाठी काय कराल? खालीलप्रमाणे:-
१) निर्जळी उपवासाच्या आदल्या दिवशी भरपूर पाणी प्यावे.
२) आदल्या दिवशी जलयुक्त फळं खावी. उदा. द्राक्षे, कलिंगड, टरबूज, किवी, डाळींब.
३) उपवासादरम्यान रिकाम्या पोटामुळे अॅसिडिटीचा त्रास होत असेल, तर आदल्या दिवशी आवळ्याचा रस कोमट पाण्यातून प्या किंवा जेवणामध्ये आवळ्याचा मुरंबा खा.
४) निर्जळी उपवासाच्या आदल्या दिवशी भिजवलेले बदाम, अक्रोड असे पोषक पदार्थ खा. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती आणि शरीर मजबूत राहते.
५) निर्जळी उपवासाच्या आधी २ ते ३ दिवस सलग लिंबू पाणी पिण्याची सवय ठेवावी. ज्यामुळे एक दिवस पाणी न पिता तुम्ही सहज राहू शकता.
६) नियमित नारळाचे पाणी घेण्याची सवय असेल तर एखाद्या दिवशी बिना पाण्याचे राहणे सोप्पे जाते.
७) आहारात आदल्या दिवशी आवर्जून दही खाल्ल्यास निर्जळी उपवासामुळे शरीरावर गंभीर परिणाम होत नाहीत आणि पोटाच्या समस्या दूर राहतात.
८) निर्जळी उपवासाच्या आदल्या रात्री एक ग्लास जिऱ्याचं पाणी प्यायल्याने रिकाम्या पोटी अॅसिडिटीचा त्रास कमी जाणवतो.