लो शुगरचा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ नेहमी जवळ ठेवा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल अनेक लोक लो शुगरच्या त्रासाने ग्रासलेले आहेत. अशा लोकांनी काय खावे काय खाऊ नये याची एक भली मोठी लिस्टच असते. कारण असे अनेक पदार्थ असतात जे खाल्ल्याने यांच्या शरीरातील साखरेची स्थिती असंतुलित होते. परिणामी त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावते. मुख्य म्हणजे अनेकदा या रुग्णांची शुगर लेव्हल अचानक कमीदेखील होते. याची प्रमुख लक्षणे अचानक अस्वस्थ वाटणे, चक्कर येणे, डोकेदुखी आणि झोप न लागणे हि आहेत. वेळीच हि लक्षणे समजल्यास त्रास होण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. आता ते कसे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. यासाठी फार काही नाही पण आज आम्ही तुम्हाला ज्या पदार्थांविषयी सांगणार आहोत ते पदार्थ नेहमी जवळ ठेवा आणि अशी स्थिती निर्माण झाल्यास खा.
वास्तविक, आपलं शरीर अन्नाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करते आणि त्याचा शरीरात ऊर्जा म्हणून वापर होतो. पण जेव्हा शरीरात ग्लुकोजची कमतरता असते, तेव्हा शरीर अकार्यक्षम होते. यालाच आपण कमी रक्तातील साखरेची लक्षणे म्हणतो. तथापि, ही समस्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सर्वात सामान्य आहे. कारण अनेक वेळा मधुमेहामध्ये साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी इन्सुलिन आणि औषधांची मदत घेतली जाते, ज्यामुळे साखरेची पातळी कमी होऊ शकते. शुगर लेवल लो होते तेव्हा त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. त्यासाठी खाली सांगितलेल्या पदार्थांची मदत घेता येईल.
१. फॅट फ्री दूध –
तज्ञांच्या सल्ल्यानुसार, १ कप कोमट दूध प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास मदत होते. मात्र हे दूध फॅट फ्री असावे. कारण या दुधामध्ये व्हिटॅमिन डी आणि कार्बोहायड्रेट्स असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.
२. कँडी –
अचानक रक्तातील साखर कमी झाली तर डायबिटिसच्या रुग्णांनी रक्तातील साखर वाढवण्यासाठी १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट्सचे सेवन करावे. त्यानंतर १५ मिनिटांनी शुगर लेव्हल तपासावी. चिकट कँडीमध्ये हे कार्बोहायड्रेट्स असतात. यात अत्यंत साधी साखर असते. जी जेवणानंतर रक्तप्रवाहात वेगाने शोषली जाते आणि १५ मिनिटांत रक्तात मिसळते.
३. ग्लुकोज गोळ्या –
रक्तातील साखरेची कमी पूर्ण करण्यासाठी ग्लुकोजच्या गोळ्या फायदेशीर आहेत. पण त्या खरेदी करताना किती ग्रॅम आहेत याकडे लक्ष द्या. कारण रक्तातील साखर संतुलित करण्यासाठी १५- २० ग्रॅम ग्लुकोज पुरेसे असते. म्हणून साखरेची गोळी खाल्ल्यानंतर १० ते २० मिनिटे थांबा, प्रतीक्षा करा आणि मग शुगर लेव्हल तपासा.
४. ताजी फळे –
रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी झाल्यास ताजी फळे खा. यामध्ये पिवळी केळी, हिरवी किंवा काळी द्राक्षे, सफरचंद आणि संत्री यांसारखी कार्बोहायड्रेटयुक्त फळे फायदेशीर ठरतात.
५. ड्राय फ्रुट –
रक्तातील साखर अचानक कमी झाली तर ड्राय फ्रुट खा. यामध्ये २ चमचे मनुके खाणे फायदेशीर. यामुळे रक्तातील साखरेची पातळी त्वरित नियंत्रित होते आणि आराम मिळतो.
६. ज्यूस –
ताज्या फळांचा रस किंवा सील पॅक ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच मधुमेहींना ज्यूस पिण्यास मनाई असते. पण अचानक शुगर लो झाल्यास या ज्युसेसचा साखरेची पातळी वाढविण्यासाठी फायदा होतो. यात सफरचंद, संत्र, अननस आणि क्रॅनबेरी ज्यूस पिऊ शकता. हे ज्यूस प्यायल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी शुगर लेव्हल तपासा.
वरीलपैकी प्रत्येक पदार्थ हा अचानक कमी झालेली रक्तातील साखर वाढवतो. मात्र याचे ठरलेले प्रमाण चुकणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे या पदार्थांचे नियमित सेवन करू नये अन्यथा शुगर लेव्हल नियंत्रणाबाहेर जाऊन आरोग्याला हानी होऊ शकते.