बर्फाच्या पाण्याने चेहरा धुवाल तर त्वचा राहील टकाटक; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या त्वचेची काळजी घेणे हि आपली जबाबदारी आहे. जसे निरोगी आरोग्यासाठी काय खावे काय प्यावे आणि काय करावे अश्या लहान सहन गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अगदी तसेच त्वचेची काळजी घेण्यासाठीसुद्धा या सर्व बाबींकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागते. आजकाल धुळ, माती, प्रदूषण, मेकअपचा अती वापर, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार या सर्व गोष्टींचा परिणाम सहज आपल्या त्वचेवर होताना दिसतो. यामुळे त्वचेची योग्य निगा राखणं आता अत्यंत गरजेचं होऊ लागलं आहे.
आता त्वचेची काळजी घ्यायची, निगा राखायची म्हणजे नक्की काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काहींना तर असाही प्रश्न पडला असेल कि आता कायतरी महागडं डाएट आणि सौंदर्य उत्पादन खरेदी करायला सांगताय का काय? तर मैत्रिणींनो असं काहीही नाही. अगदी साधा सोप्पा आणि ओळखीतले उपाय घेऊन आज आम्ही आलो आहोत. शिवाय एक छोटीशी टीप सुद्धा देणार आहोत. त्वचा सुंदर आणि डागविरहित ठेवायची असेल तर यासाठी चेहरा वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. पण प्रत्येक वेळी चेहरा धुताना पाणी गरम किंवा कोमट असण्याची गरज नाही. तर बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्यानेसुद्धा भरपूर फायदे होतात. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर लगेच जाणून घ्या.
० बर्फाच्या पाण्याने चेहरा का धुवावा?
– गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होते आणि यामुळे आपली त्वचा शुष्क व कोरडी दिसते. काहीवेळा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करणे लाभदायक असले तरीही नेहमीच याचा फायदा होतो असे नाही. परंतु बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे अनेको लाभ आहेत. यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते. सुरकुत्या नाहीश्या होतात. चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल कायम राहते. शिवाय चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकून राहते. चला तर जाणून घेऊयात बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे खालीलप्रमाणे :-
१) त्वचेचा दाह शमतो – जर आपली त्वचा अतीसंवेदनशील असेल आणि त्वचेवर पुरळ, पिंपल्स येत असतील तर त्वचेत एक प्रकारचा दाह जाणवतो. हा दाह कमी करण्यासाठी बर्फाचे थंड पाणी चेहरा धुण्यासाठी वापरणे लाभदायक असते. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचेची जळजळ काही प्रमाणात कमी होते.
२) त्वचा राहते मऊ आणि मुलायम – गरम पाण्याने चेहरा धुतल्यास अती प्रमाणात कोरडा आणि शुष्क होतो. ज्यामुळे त्वचेतील मऊपणा निघून जातो आणि त्वचा निस्तेज दिसते. पण त्याऐवजी आपला चेहरा थंड पाण्याने धुवाल तर त्वचा मऊ आणि तितकीच मुलायम राहील. शिवाय त्वचेतील नैसर्गिक तेल निघून न गेल्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
३) चेहऱ्यावरील सूज कमी होईल – सकाळी उठल्यावर अनेकदा आपला चेहरा सुजलेला दिसतो. हि सूज कमी करण्यासाठी चेहरा थंड पाण्याने धुवू शकता. यासाठी सकाळी उठल्यावर पाण्यात थोडे बर्फाचे तुकडे टाका आणि या थंड पाण्याचे शिथोडें चेहऱ्यावर शिंपडत चेहरा धुवा. जरी थंड पाण्याने चेहरा धुणे गारव्यामुळे तुम्हाला शक्य नसेल तरी साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि बर्फाचं पाणी फक्त चेहऱ्यावर शिंपडा. यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होईल.
४) त्वचेतील छिद्र बंद होतात – अती क्लिझिंग अथवा अती वाफ घेण्यामुळे त्वचेवरील छिद्रे अर्थात पोअर्स मोठी होतात. असे पोअर्स पु्न्हा पूर्ववत करण्याचा सोपा मार्ग म्हणजे चेहऱ्यावर थंड पाण्याचे थबके देणं. थंड पाणी त्वचेवरील ओपन पोअर्स बंद करतात. यामुळे धुळ, माती, प्रदूषण आणि इतर केमिकल्सपासून त्वचेचं संरक्षण होतं.
टीप :- जर तूम्हाला बर्फाचं पाणी सहन होत नसेल, तर थंड अथवा साधे पाणी चेहरा धुण्यासाठी वापरा. मात्र चुकूनही गरम पाण्याने चेहरा धुवू नका.
– नियमित स्कीन रूटिन फॉलो करा. त्वचा क्लिन, टोन आणि मॉईस्चराईझ करा. मात्र स्कीन रुटिन फॉलो करताना गरम पाणी वापरणे टाळा.