बाळाचा जन्म सिझेरियन कि नॉर्मल? ‘हे’ आहेत नॉर्मल प्रसूतीचे विलक्षण फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन : बाळाचा जन्म हि एक निसर्गाची विलक्षण प्रक्रिया आहे. नवीन जीव जन्माला घालणे हि फक्त त्याच्या आईबाबांसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी अत्याधिक आनंदाची गोष्ट असते. बाळाच्या आईला तर अगणित दिव्यातून जावे लागते. मानसिक तसेच शारीरिक ताण ०९ महिने ०९ दिवस ती फक्त बाळाच्या ओढीने सहन करत असते. हॉस्पिटल्स आणि अल्ट्रासाउंड मशिन्स नव्हत्या तरीसुद्धा आई बाळाला जन्म देतच होती. आता तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बाळाच्या आईला बाळाला जन्म देण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध आहे आणि त्यामुळे प्रसूतीची मोठी प्रक्रिया आणि वेदना टाळता येतात. सी-सेक्शन आणि नॉर्मल प्रसूतीची तुलना केल्यास बाळाच्या आई बाबांना बाळाच्या जन्मासाठी पर्याय उपलब्ध होतात. नैसर्गिक प्रसूती किंवा नॉर्मल प्रसूती ही केव्हाही चांगली. ह्या पारंपरिक पद्धतीने प्रसूती झाल्यास त्याचा बाळाच्या आणि आईच्या आरोग्याला खूप फायदा होतो. तुमचा पर्याय निवडण्याआधी इथे काही मुद्धे आहेत जे तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत.
गर्भधारणा झाल्यानंतर प्रत्येक महिलेच्या चिंतेत वाढ होते तो हाच विचार करुन की माझी नॉर्मल डिलिव्हरी होईल की सिझेरियन? अर्थात पहिलीच डिलिव्हरी असलेल्या महिलांना याबाबत जास्त काही माहिती नसल्याने त्या नॉर्मल डिलिव्हरीला घाबरतात. पण तुम्हाला माहित आहे का नॉर्मल डिलिव्हरीमध्ये क्षणिक त्रास जरुर होतो पण डिलिव्हरीनंतर त्याचे अगणित फायदे देखील होतात. कोणत्याही औषधांशिवाय किंवा कोणतीही शारीरिक शस्त्रक्रिया न करता जी डिलिव्हरी होते तिला नॉर्मल डिलिव्हरी म्हणजेच ‘वजायनल बर्थ’असंही म्हणतात. पण आताच्या महिला शारीरिक त्रास वाचवण्यासाठी सिझेरियन डिलिव्हरीला प्राधान्य देऊ लागल्या आहेत. पण नॉर्मल डिलिव्हरीचे अगणित फायदे तुम्ही जाणून घेणं फार आवश्यक आहे.
आजकाल दुखणं किंवा त्रास कमी व्हावा आणि लवकरात लवकरात डिलिव्हरी व्हावी म्हणून लोक औषधांचा वापर करु लागली आहेत. तर नॉर्मल डिलिव्हरी कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाविना अगदी सुरक्षित पार पाडली जाते. पूर्वीच्या काळी वैद्यकीय सुविधांची कमतरता असल्यामुळे सुईनी असं म्हटलं जाणारी व्यक्ती घरच्या घरी नॉर्मल डिलिव्हरी करत असे. पण हल्ली धकाधकीचं जीवन, बदललेली जीवनशैली आणि अत्याधुनिक सोयीसुविधांमुळे डॉक्टर आणि संबंधित महिला किंवा तिच्या घरातील सदस्य सिझेरियन डिलिव्हरी करण्यास प्राधान्य देतात जे की चूक आहे. जर तुम्हाला क्षणिक त्रास भोगून नंतरच्या आयुष्यातील त्रास टाळायचा असेल तर नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी प्रयत्न करा. चला तर जाणून घेऊया नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे!
प्रकृतीत लवकर सुधारणा होते:
सी सेक्शन डिलिव्हरी म्हणजेच सिझेरियन डिलिव्हरीनंतर महिलांना शारीरिक प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी कितीतरी आठवडे किंवा महिने लागू शकतात. पण नॉर्मल किंवा वजायनल डिलिव्हरीमध्ये काही तासांतच महिला अगदी ठणठणीत ब-या होतात आणि स्वत:च्या पायाने चालत घरी जाऊ शकतात. खरं म्हणजे प्रसुती दरम्यान महिलांच्या शरीरात एंडोर्फिन नावाचा हार्मोन नव्याने निर्माण होतो. हा हार्मोन दुखणं बरं करण्यास मदत करतो आणि त्यामुळेच नॉर्मल डिलिव्हरीनंतर प्रकृतीत सुधारणा अधिक जलद गतीने दिसून येते.
स्तनपान वेळेत करता येते
नॉर्मल डिलिव्हरीनंतर महिला आपल्या नवजात बाळाला पहिल्यांदा स्तनपान करण्यासाठी सक्षम असतात. अगदी आरामात उठून बसून आणि बाळाला कडेवर घेऊन त्या बाळाला स्तनपान करु शकतात. प्रसुती दरम्यान शरीरात नव्याने निर्माण होणारे हार्मोन्स स्तनपानात देखील लाभदायक ठरतात. तर दुसरीकडे ज्या महिलांची सिझेरियन डिलिव्हरी होते त्यांची भूल उतरायला वेळ तर लागतोच शिवाय शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांच्यात कमजोरी देखील येते. ऑपरेशन नंतर ती स्त्री बराच काळ बेशुद्ध असल्याने बाळाला पहिलं दूध वेळेत मिळणं अशक्य होतं.
बाळ निरोगी राहते
योनी किंवा बर्थ कॅनोलने जन्म झाल्यामुळे जन्मत:च बाळाला काही चांगले बॅक्टेरिया मिळतात. हे सुरक्षात्मक बॅक्टेरिया नवजात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडतात. तसेच नॉर्मल डिलिव्हरीमध्ये गर्भवती स्त्रीला प्रसुती दरम्यान उद्भवणा-या समस्या आणि डिलिव्हरीनंतरच्या गुंतागूतीचा धोका या गोष्टी खूप प्रमाणात कमी होतात. तसेच डिलिव्हरीच्या इतर प्रकारांच्या तुलनेत नॉर्मल डिलिव्हरीमध्ये रक्तस्त्राव आणि टाक्यांमध्ये होणारे इन्फेक्शन अर्थात संक्रमणाचा धोका कमी असतो.
थोडक्यात पण खूप महत्वाचे :
- बाळाला जन्म देण्याच्या प्रक्रियेत आईचा खूप मोठा सहभाग असतो आणि तो अनुभव आईसाठी खूप सकारात्मक आणि सशक्त करणारा अनुभव असतो. ह्या प्रक्रियेदरम्यान एकमेकांचा स्पर्श होत असल्याने आई आणि बाळामध्ये चांगला बंध निर्माण होतो.
- ह्या प्रक्रियेत पुनर्प्राप्ती लवकर होते, कुठल्याही वेदनेशिवाय आई त्याच दिवशी चालू शकते. तर सी-सेक्शन पद्धतीमध्ये आईला निदान एक दिवस आराम करावा लागतो टाक्यांची काळजी घेण्याची गरज नसते. तसेच, रुग्णालयात सारखे जावे लागत नाही.
- नॉर्मल प्रसूतीचा पर्याय निवडल्यावर बाळ सुद्धा गर्भाशयातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असते.
- योनीमार्गातून बाहेर पडत असताना, बाळाच्या फुप्फुसातून गर्भजल बाहेर फेकले जाते आणि त्यामुळे बाळाचा श्वासोच्छवास सुरळीत सुरु राहतो आणि बाळाला श्वसनाच्या समस्या कमी येतात.
- नॉर्मल प्रसूतीने जन्मलेल्या बाळाला आरोग्याच्या कमी समस्या येतात. ऍलर्जी कमी होतात आणि ही बाळे स्तनपान लवकर करतात.
- पोटातून बाहेर येताना बाळ श्वासाद्वारे चांगले जिवाणू आत घेते आणि त्यामुळे प्रतिकारप्रणाली बळकट होण्यास मदत होते.
जर सर्व गोष्टी नॉर्मल असतील आणि बाळाच्या आईची थोडीशी त्रास सहन करायची इच्छा असेल तर नॉर्मल डिलिव्हरी आईला आणि बाळाला मजबूत करण्याची पहिली पायरी आहे. असे समजायला काही हरकत नसावी.