लाईफ स्टाईल | आहार | फिटनेस | बातम्या
थंडीच्या दिवसात गुळमाठ चहा गुणकारी; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन| चहा हे असे पेय आहे जे अनेकांचे आवडते पेय म्हणून ओळखले जाते. कित्येकांची गुड मॉर्निंग चहासोबत होते. तर कित्येकांच्या भेटीची सुरुवात चहापासून होते. पण अनेकदा डॉक्टर सांगतात की, चहा पिणे आरोग्यासाठी घातक असते. मग अशावेळी अनेकदा लोक मन मारतात आणि चहा नको म्हणून टाळाटाळ करतात. पण मित्रांनो थंडी असेल आणि चहा नसेल तर काय मजा? हो की नाही? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुळाच्या चहाची भारी रेसिपी सांगणार आहोत. हा चहा अगदी तुमच्या घरातले पुरुष सुध्दा आरामात बनवू शकतात. मुख्य म्हणजे आज आपण जो चहा शिकणार आहोत त्याला अनेक भागात ‘गुळमाठ चहा’ म्हणून ओळखले जाते. काय मग जाणून घ्यायची का रेसिपी भन्नाट गुळमाठ चहाची…
० गुळमाठ चहा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- १ मातीचे भांडे
- १ कप दूध
- १ कप पाणी
- १ लहान चमचा चहा पावडर
- १ चमचा जायफळ वेलची पूड
- १ चमचा सुंठ पूड
- ४ ते ५ तुळशीची पाने
- ३ छोटे चमचे गुळ पावडर
० गुळापासून चहा तयार करण्याची कृती:-
- सर्वात आधी माठात पाणी गरम करून व्यवस्थित उकळी येऊ द्या.
- यानंतर उकळलेल्या पाण्यामध्ये चहा पावडर टाकून कढवून घ्या.
- आता यामध्ये दूध घालून व्यवस्थित उकळी येऊ द्या.
- एकदा का चहाचा रंग आणि सुगंध बदलला की यात सुंठ पूड, जायफळ वेलची पूड, तुळशीची पाने घाला.
- हे संपूर्ण मिश्रण साधारण ४ ते ५ मिनिटे उकळी येऊ द्या. मंद आचेवर अर्धे झाकण ठेऊन चहा शिजवा.
- असे केल्याने सर्व मसाले व्यवस्थित चहामध्ये एकत्र होतील शिवाय मातीचेही पोषक घटक चहात उतरतील.
- यानंतर माठ चुल्ह्यावरून उतरवून घ्या आणि या उकळत्या चहात गुळाची पावडर हळूहळू टाकून मिसळा.
- आता मस्तपैकी चहा गाळा आणि सुर्रकन प्या.
० फायदे
> आपल्या शरीराचं स्वास्थ्य टिकवून ठेवायचं असेल तर जेवण असो वा चहा ते मातीच्या भांड्यांमध्ये शिजवा. यामुळे मातीच्या भांड्यातून शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्व संबंधित पदार्थातून मिळतात. त्यामुळे या चहातून कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सिलिकॉन, कोबाल्ट आणि अशी अनेक पोषक तत्व मिळतात.
> या चहातील गुळ पाचन शक्तीची ऊर्जा वाढवतो. यामुळे पचन व्यवस्थित होते. त्यामुळे हिवाळ्यात गूळ असाच खाण्यापेक्षा चहाच्या माध्यमातून सेवन करणे कधीही चांगले. कारण त्यावेळी शरीराची पचन क्रिया मंदावते आणि गुळामुळे ती पूर्ववत होण्यास मदत होते.