किडनी स्टोन! जाणून घ्या कारणे, लक्षणे ,उपाय आणि औषधोपचार
हॅलो आरोग्य ऑनलाईन : कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते. का होतो मुतखडा, त्याची लक्षणे कोणती आणि उन्हाळ्यात मुतखड्याचा त्रास जास्त का होतो? जाणून घेऊया मुतखड्याविषयी….
मुतखडा हा अतीव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मुतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.
मुतखड्याची कारणे आणि कोणाला होऊ शकतॊ :
- पाणी कमी पिण्याची सवय.
- ८०% रुग्ण पुरुष असतात.
- वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणारे रुग्ण
- २० ते ४९ वर्षांच्या व्यक्ती
- कुटुंबातील लोकांना मुतखडा होण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती
- दीर्घकाळ अंथरुणावर पडून असलेल्या व्यक्ती
- व्हिटॅमिन सी किंवा कॅल्शियम असलेल्या औषधांचे जास्त प्रमाणात सेवन
- ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना युरिक ऍसिडपासून मुतखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते.
- गर्भारपणात प्रोजेस्टेरॉनचा स्राव वाढल्याने लघवीचा वेग कमी होतो, त्याने खडे तयार होतात.
- गर्भारपणात कॅल्शियम मूत्रात उत्सर्जित होण्याने मुतखडे होण्याचे प्रमाण वाढते. मुतखडा तयार होण्याची प्रकिया
- लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
- पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते.
- मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते.
मुतखड्याचे प्रकार
- कॅल्शियमचे- कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात.
- रक्तातील व लघवीतील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक ऍसिडचे मुतखडे तयार होतात.
लक्षणे
- सामान्यतः मुतखडा झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु, जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.
- मुतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहचल्यावर लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते.
- यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास ताप व थंडी वाजून येते.
- लघवीची तपासणी करणे, त्यात लघवीतील रक्तपेशी व जंतूंच्या प्रादुर्भावचे निदान होते.
- सोनोग्राफी केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान समजते. सोनोग्राफीमुळे जंतूंच्या प्रादुर्भावाची लक्षणे, किडनीला त्याचा कितपत त्रास आहे, या सर्वांची उत्तरे मिळतात. रक्त तपासून किडनीचे कार्य कमी झालेले नाहीना, हे तपासावे लागते.
- पोटाच्या क्ष-किरण तपासणीमध्ये मुतखड्याचे आकारमान व घनता जाणता येते.
- मूत्रमार्गाची एन्डोस्कोपी केल्यास मुतखडा तपशिलात समजतो.
- ज्या बाजूस मुतखडा असेल त्या बाजूस तीव्र वेदना होते.
- लघवीत रक्त जाते.
मुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?
- पाणी भरपूर पिणे.
- लघवी तुंबवून न ठेवणे.
- काढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून त्याप्रमाणे पथ्य करावे.
- आहारामधील सोडियम आणि प्राण्यांच्या मांसातून मिळणारी प्रथिने (मांस, अंडी) नियंत्रित ठेवल्यास मुतखड्यांचा त्रास टाळण्यास मदत होऊ शकते. मुतखडा होण्याची प्रवृत्ती टाळण्यासाठी जवाचे पाणी, उसाचा रस, काकवी यांचे सेवन करावे.
- जास्तीत जास्त पाणी पिणे हा निरोगी आयुष्यासाठी आणि मुतखड्यासारख्या विकारावर आळा घालण्यासाठी उत्तम उपाय आहे. मुतखड्यांना रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज पुरेसे पाणी म्हणजेच 8 ते 12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
एक महत्त्वाची गोष्ट. काही मुतखडे निदान झाल्या झाल्या लगेच काढावे लागतात. काही मुतखडे एकाद-दुसरा महिना थांबले तरी त्रास देत नाहीत. पण त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले का? हे अधुनमधून बघावे लागते. तर काहींना काही करावे लागत नाही. या सगळ्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक ठरतो.
औषधोपचार :-
लिथोट्रिप्सी पद्धत : रुग्णाच्या शरीराच्या बाहेरून यंत्राद्वारे खड्याला सूक्ष्म ध्वनी कंपनीने शॉक देऊन त्याचा चुरा करणे. यामध्ये खड्यांचा चुरा लघवीवाटे बाहेर पडतो. त्यामुळे उपचारानंतर रुग्णाला भरपूर पाणी प्यायला सांगितले जाते. या पद्धतीत शस्त्रक्रियेची गरज नाही. शरीरातील कोणत्याही अवयवावर आघात किंवा जखम केली जात नाही.
परक्युटॅनिअस नेफ्रोलिथोटॉमी : या उपचारपद्धतीमध्ये दुर्बिणीच्या साह्याने शस्त्रक्रिया करून खडा शरीरातून बाहेर काढला जातो. दुर्बिणीद्वारे खडा काढण्याची ही उपचार पद्धती मूत्रपिंडातील व वरच्या मूत्र वाहिन्यातील विविध प्रकारच्या मोठ्या खड्यांसाठी जास्त योग्य आहे.
युरेटेरोस्कोपी : मूत्रवाहिनीत असलेले खडे युरेटेरोस्कोपीद्वारे काढता येतात.
मुतखडाच्या वेदना दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय:-
- अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पिण्याने 15 मिनिटात पोटदुखी थांबते.
- सराटा (काटेगोखरू)चा काढा तूप टाकून दिल्यास, मुतखडा पडून जाण्यास व वेदना कमी होण्यास मदत होते.
- कुरडू नावाच्या वनस्पतीची अथवा वायवर्ण्याची साल याचा स्वरस अथवा काढा घेतल्याने वेदना कमी होते.
- कडुलिंबाच्या पाल्याची राख दोन ग्रॅम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडतो.
- खडा लहान असल्यास आणि जुना नसल्यास मेंदीच्या सालीचे बारीक वाटण करून चूर्ण सकाळी अर्धा चमचा पाण्या बरोबर नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी वाटे निघून जातो.