बीटरूट हेअर मास्क वापरून केसांचे आरोग्य राखा; जाणून घ्या कृती आणि वापरायची पद्धत
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर, लांब, मजबूत आणि चमकदार केसांसाठी खूप महागडे प्रोडक्ट्स तसेच विविध ब्युटी ट्रीटमेंट्स करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात असे आम्ही म्हणणार नाही. कारण निरोगी केस कुणाला नको असतात..? पण यासाठी इतक्या महागड्या ट्रीटमेंट आणि प्रोडक्ट्सची खरंच गरज आहे का..? अनेकदा केसांचा दर्जा खालावण्याचे कारण याच केमिकल ट्रीटमेंट असतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि अशा गोष्टींपासून लांब राहा. ज्यामुळे तुमचे सौंदर्य धोक्यात येत आहे. मग काय करू..? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचे उत्तर आहे. केसांसाठी घरच्या घरीच रामबाण नैसर्गिक आणि प्रभावी उपायांचा अवलंब करा. यापैकीच एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे बीटरूट.
बीटरूटमध्ये लोह आणि व्हिटॅमिन भरपूर असते. यामुळे केसांना खोलवर पोषण मिळते आणि मुळांसह केस मजबूत होतात. आपल्या केसांना आवश्यक असलेले पोषक घटक मिळाल्याने केस सुंदर, चमकदार आणि मुख्य म्हणजे निरोगी होतात. बीटच्या नैसर्गिक गडद रंगामुळे केसांवरील नैसर्गिक चमक गेली असेल तर पुन्हा येण्यास मदत मिळते. तसेच बीटचा रस हेअर मास्कप्रमाणे वापरल्यास कोरड्या तसेच निर्जीव केसांची समस्या दूर होते. आता हा बीटरूट हेअर मास्क कसा बनवायचा ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
० बीटरूट हेअर मास्क
बीटरूट हेअर मास्क बनविण्यासाठी मध्यम आकाराचे चार बीट स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढून घ्या. यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते जाडसर वाटून त्याची पेस्ट तयार करा. आता तयार झालेली पेस्ट एका भांड्यामध्ये गाळून घ्या आणि त्यात १ चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळा. आता हा मास्क लावण्यापूर्वी केस स्वच्छ धुऊन घ्या. पण त्यावर कंडिशनर लावणे टाळा. साधारण २ ते ३ तासांसाठी हा हेअर मास्क असाच लावून ठेवा. यानंतर केस पुन्हा स्वच्छ धुवा. आता कंडिशनरचा वापर करा. आठवड्यातून एकदा या हेअर मास्कचा वापर करा.
फायदे –
केसांसाठी बीटरूटचा हेअर मास्क वापरणे अत्यंत फायदेशीर आहे. एकतर नैसर्गिक आणि घरगुती उपायामुळे कोणताही अपाय नाही. शिवाय केस मऊ होतील. नैसर्गिकरित्या चमकदार दिसतील. याशिवाय केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर दूर होईल. तसेच केसांमधील निर्जीवपणा दूर होईल.