औषधी आल्याचा रस प्रत्येक संसर्गावर परिणामकारक; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आलं हा मसाल्यातील अत्यंत महत्वाचा पदार्थ मानला जातो. कारण आल्याचा आहारात वापर केल्याने त्याचा सुगंध आणि चव आहारात आणखी लज्जत आणते. याशिवाय आलं अत्यंत गुणकारी असा औषधी पदार्थ आहे. सर्दी, खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून सर्वात आधी आल्याकडे पाहिले जाते. आल्यामध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यवर्धक आहे. आले बायोएक्टिव युक्त असते. यामुळे आहार आणि आरोग्यासाठी आलं अतिशय उत्तम पर्याय आहे.
० आल्यातील आरोग्यवर्धक गुणधर्म
आल्यात फेनोलिक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह व झिंक(अल्प प्रमाणात) आहेत. तसेच C, B3 व B6 ही जीवनसत्वे आणि फार थोड्या प्रमाणात पिष्टमय पदार्थ असतात. त्यामुळे आले संसर्गजन्य आजारांवर अतिशय परिणामकारक आहे. अगदी सर्दी असो वा खोकला आळायच्या रसाचे सेवन केल्यास असे आजार अगदी काही क्षणात निघून जातात.
० औषधी आल्याच्या रसाचे फायदे:-
1. आल्यामध्ये फेनोलिक असते. यामुळे अपचनापासून आराम मिळतो. याचे कारण म्हणजे आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपे जाते. रक्तातील चरबीची पातळी कमी करण्यासाठी व रक्त पातळ करण्यासाठी आल्याच्या रसाचे दररोज उपाशी पोटी सेवन करावे.
2. आले पाचक, सारक व भूक वाढविणारे असल्यामुळे आल्याचा रस प्यायल्याने पित्त होत नाही. यात पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, शस्त्रक्रियेनंतर उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर व मिठाबरोबर घेतल्यास आराम मिळतो. मात्र ज्यांना पित्ताशयातील खडे त्रास देत असतील त्यांनी आले खाऊ नये.
3. कोणत्याही संसर्गापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा रस गुणकारी आहे. यासाठी आल्याचा चहा किंवा काढा दोन्ही उपयुक्त ठरतो. सर्दी आणि कफावर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून अगदी काही दिवसांतच आराम मिळतो.
4. पोटाशी संबंधित कोणत्याही आजारावर त्वरित आराम मिळवण्यासाठी आल्याचा रस मधात मिसळून सेवन करा. असे केल्यास पोटातील जळजळ शांत होते शिवाय पोटात गॅस झाला असेल तर आल्याचे चाटण चाटावे. यामुळे आतड्याची हालचाल वाढते आणि पोटातील वेदना कमी होतात.
5. अतिसाराच्या त्रासावर आल्याचा रस बेंबीवर लावल्यास लगेच आराम मिळतो. तसेच अजीर्ण झाल्यास आल्याच्या रसात लिंबाचा रस आणि मीठ घालून व्यवस्थित ढवळून हे पाणी प्यावे. यामुळे लाळग्रंथी सक्रिय होतात आणि पोटदुखी थांबण्यास मदत होते.
6. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आले आणि तुळशीचा काढा बनवून प्या. हा काढा सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशा प्रत्येक संसर्गजन्य आजारावर परिणामकारक आहे. यात काळ्या तुळशीची पाने, सुंठ पावडर वा किसलेले आले, जेष्ठमध, भाजून कुटलेली अळशी (जवस) चहाच्या पातीचे तुकडे, घालून पाणी अर्धे आटेपर्यंत उकळा आणि यात गुळ घालून, गाळून हा काढा प्या. यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते.