मोबाईलचा अतिवापर अनिद्रेचे मुख्य कारण; जाणून घ्या दुष्परिणाम
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या मूलभूत गरजा कोणत्या..? असे विचारल्यास आधी अन्न, वस्त्र आणि निवारा असे उत्तर दिले जायचे. आता मोबाईल, वायफाय आणि डिजिटल मीडियाचे नाव घेतले जाते. उठताना, बसताना, झोपताना आणि अगदी कुठेही जाताना लोकांना मोबाईलशिवाय करमत नाही. त्यात रात्री झोप येत नाही, म्हणून तासनतास मोबाईल वर वेळ घालवणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही.
पण मित्रांनो तुमची हि मजा आरोग्यासाठी सजा ठरू शकते बरं का… कारण तुम्हाला झोप न येणं यामागे तुमचा मोबाईलच कारणीभूत आहे. ते कसे हे आज आपण जाणून घेणार आहोत. शिवाय यावर काय उपाय करता येतील तेही जाणून घेऊ.
० मोबाईलमूळे झोप येत नाही..?
होय. मोबाईलचा अतिवापर झोप न येण्याचे मुख्य कारण आहे. कारण मोबाईल फोनद्वारे जे ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन’ (ईएमएफआर) निघतात त्याचा शरीरावर दुष्परिणाम होत असतो. हे रेडिएशन आपल्या लहान मुलांच्या मेंदूसाठी आपल्या आरोग्यापेक्षा हि जास्त हानिकारक असतात. त्यामुळे लहान मुलांना अजिबातच फोनचा अतिवापर करून देऊ नका.
० मोबाईलच्या अतिवापरामुळे काय होते..?
मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, तणाव, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो. विशेषत: दर सेकंदाला व्हॉट्सअॅप पाहणाऱ्यांना आणि रात्र जागून वेबसिरीज पाहणाऱ्यांना अनिद्रेचा त्रास होतो. याशिवाय मोबाईलच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव होत आणि शारीरिक तसेच मानसिक ताण पडतो.
याशिवाय मोबाईलच्या अतिवापरामुळे स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्यावरही परिणाम होतो. मोबाईलमुळे सकाळी उशिरा उठण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, लठ्ठपणा वाढला असून त्यामुळे होणारे विविध गंभीर आजार दिसून येत आहे. तसेच मानसिक आजार देखील होऊ शकतात.
० या समस्येचे काय करायचे..?
आपल्या भावनांना आवर घाला आणि रात्री झोपण्याच्या किमान १ तास आधी मोबाईलचा वापर करू नका. मनाशी पक्के करा कि मोबाईल हातात घ्यायचा नाही. कारण मोबाईलमधून निघणाऱ्या नील किरणांमुळे आपल्या झोपेवर खूप मोठा परिणाम होतो.
यानंतर सकाळी उठल्यानंतर एक तासानंतर मोबाईलचा वापर करा. शिवाय जेवताना मोबाईलचा वापर नकोच आणि महत्वाचे म्हणजे रात्री झोपताना फोन डोक्याजवळ ठेवून झोपू नका. यामुळे मेंदूवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
० चांगल्या झोपेसाठी काय कराल..?
- रोज सकाळी ठराविक वेळेवर उठा आणि ठराविक वेळेवरच झोपा.
- नियमित सकाळी तासभर व्यायाम करा.
- भरदिवसा १५ मिनिटाच्या वर झोपू नका.
- बेडवर झोपून वाचणे आणि टीव्ही पाहणे टाळा.
- सायंकाळी ५ वाजून गेल्यावर चहा/ कॉफी पिऊ नका.
- सायंकाळी ५ नंतर धूम्रपान आणि मद्यपान करू नका.
- झोपण्याच्या तासभर आधी डिजिटल स्क्रीनचा वापर नको. (टीव्ही, कॉम्प्युटर, आयपॅड, मोबाईल)
- झोपण्यापूर्वी कोणत्याही विषयाची चिंता करू नका.
- रात्री झोप उघडल्यावर वेळ पाहू नका.