मोलार प्रेग्नेंसी? ते काय असतं? माहित नसेल तर लगेच जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन| प्रेग्नेंसी काय हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे यात वेगळं अस काय सांगणार. पण तुम्ही मोलार प्रेग्नेंसीबद्दल कधी ऐकल आहे का? तुम्हाला माहित आहे का मोलार प्रेग्नेंसी म्हणजे काय? जर तुम्हाला माहित नसेल तर हा लेख पूर्ण वाचा आणि जाणून घ्या. इतकेच नव्हे तर याची लक्षणेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे स्क्रोल काय ओ रोजच करता पण आज स्क्रोल करू नका.
– गर्भधारणेच्या वेळी काही समस्या आली तर ती मोलार प्रेग्नेंसी होते. अर्थात मोलार प्रेग्नेंसी म्हणजेच ‘अॅबनॉर्मल प्रेग्नेंसी’. तर आज जाणून घेऊया मोलार प्रेग्नेंसीबाबत आणखी काही विशेष बाबी आणि लक्षणे.
० मोलार प्रेग्नेंसी म्हणजे नेमकं काय?
– सर्व साधारणपणे सुदृढ गर्भ तयार होण्यासाठी आणि त्याच्या उत्तम वाढीसाठी शुक्राणू बीजांडाला जाऊन चिकटतो. यावेळी वडिलांच्या गुणसूत्राची एक जोडी आणि आईच्या क्रोमोझोम्सची एक जोडी गर्भाला जाऊन मिळते. विशेष असे की, मोलार प्रेग्नेंसीमध्ये गर्भाची सर्वसामान्य वाढ होणे शक्य नाही. यामध्ये एखाद्या मोत्यासारख्या बुडबुड्याप्रमाणे महिलांमध्ये गर्भ तयार होतो. यात २ प्रकार असतात.
१) कंप्लिट मोलार प्रेग्नेंसी – कंप्लिट मोलार प्रेग्नेंसीमध्ये वडिलांचा सुदृढ शुक्राणू आईच्या रिकाम्या बीजांडाला चिकटतो. दरम्यान या बिजांडामध्ये गुणसूत्र नसतात. अथवा २ शुक्राणू रिकाम्या बीजांडाला चिकटतात. अशावेळी तयार होणाऱ्या गर्भामध्ये फक्त आणि फक्त वडिलांचे गुणसूत्र समाविष्ट असतात. आईचे नाही. त्यामुळे याला Complete Molar Pregnancy असे म्हटले जाते.
२) पार्शिअल मोलार प्रेग्नेंसी – पार्शिअल मोलार प्रेग्नेंसीमध्ये वडिलांचे २ शुक्राणू आईच्या सुदृढ बीजांडाला चिकटतात. अशावेळी गुणसूत्राच्या एकूण सलग ३ जोड्या तयार होतात. अशा गर्भधारणेत कधी-कधी गर्भ वाढत असल्याची लक्षणं दिसतात. मात्र, ही गर्भधारणा असामान्य असल्याने वाढीची लक्षणं कितीही योग्य दिसत असली तरीही गर्भाची प्रत्यक्षरित्या योग्य पद्धतीने वाढ होत नसते.
० मोलार प्रेग्नेंसीची लक्षणं –
१) गर्भार अवस्थेमध्ये तिसऱ्या महिन्यात गडद तपकिरी रंगाचा रक्तस्त्राव होणे.
२) वारंवार मळमळ आणि उल्टी होणे किंवा उल्टीसारखे जाणवत राहणे.
३) योनी मार्गातून लहान सिस्ट येणे.
४) वारंवार ओटीपोटात असह्य वेदना जाणवणे.
*महत्वाचे :- वरील लक्षणं दिसल्यास जराही वेळ न घालवता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
० मोलार प्रेग्नेंसीचा धोका कोणाला असतो?
– जवळपास हजारातील एखाद्या महिलेला मोलार प्रेग्नेंसीचा धोका असतो. यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जसे की, तिशी – पस्तिशीपुढे किंवा विशीच्या आत होणारी गर्भधारणा. प्रेग्नेंट असलेल्या महिलांना दुसऱ्या गर्भादरम्यान हा त्रास होण्याचा धोका अधिक असतो. साधारण १००तील एखाद्या महिलेला मोलार प्रेग्नेसीचा त्रास दुसऱ्या वेळेस होतो.