सौंदर्य देणारी मुलतानी मातीसुद्धा करू शकते त्वचेला हानी; अधिक जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सौंदर्य एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला हवीहवीशी असते आणि जेव्हा सुंदर त्वचेचा विषय येतो तेव्हा मुलतानी मातीची आठवण होणे अगदीच साहजिक आहे. अनेकांना आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मुलतानी मातीच्या फेस मास्कचा सल्ला दिला जातो. कारण, मुलतानी माती सौंदर्यासाठी खरोखरच अत्यंत फायदेशीर आहे. शिवाय ती आपली त्वचा निरोगी ठेवण्यासदेखील मदत करते. पण आपल्याला हे ठाऊक आहे का कि, मुलतानी माती प्रत्येक त्वचेकरिता उपयुक्त नसते.
वास्तविक, मुलतानी माती हा नैसर्गिक मातीचा एक शुद्ध प्रकार आहे. निश्चितच ह्या मातीचा प्रकार औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. मात्र काहीच त्वचांकरिता फायदेशीर असणारी मुलतानी माती अन्य त्वचांसाठी नुकसानदायक ठरू शकते. मात्र घाबरण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहेत कि कोणत्या त्वचेकरिता मुलतानी माती अपायकारक आहे आणि कोणत्यावेळी याचा प्रयोग करू नये.
कशी करेल मुलतानी माती आपल्या त्वचेचे नुकसान? जाणून घ्या खालीलप्रमाणे –
१) मुल्तानी माती ही संवेदनशील त्वचेसाठी हानिकारक होऊ शकते. कारण संवेदनशील त्वचेवर मुलतानी मातीचा प्रयोग केला असता त्वचेवर सौम्य पुरळ येऊ शकतात आणि त्वचा निर्जीव व कोरडी होऊ शकते.
२) ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांनी मुलतानी मातीचा प्रयोग अजिबात करू नये. कारण यामुळे त्वचा आहे त्यापेक्षा अधिक कोरडी होऊ शकते. शिवाय डोळ्याच्या भोवतालची त्वचा कोरडेपणामुळे डोळ्यांना नुकसान करू शकते.
३) तसे पाहता मुलतानी मातीची मूळ प्रकृती थंड आहे. त्यामुळे जर आपल्याला सर्दी – पडसे- खोकल्याचा त्रास जाणवत असेल, तर आपण मुलतानी मातीचा वापर कृपया टाळावा. यामुळे सर्दी-पडसे -खोकला जास्त वाढू शकतो व याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
४) जर का आपण नियमितपणे मुलतानी मातीचा चेहऱ्यासाठी वापर करत असाल तर हा वापर लगेच थांबवा. कारण मुलतानी मातीचा गरजेपेक्षा अधिक वापर केल्याने चेहऱ्यावर पुरळ व सुरकुत्या येऊ शकतात. यामुळे चेहरा निस्तेज होऊन म्हातारपण लवकर येते.
५) मुख्य म्हणजे मुलतानी माती तेलकट त्वचेसाठी अत्यंत फलदायी आहे. मात्र तेलकट त्वचेकरितादेखील याचा अतिप्रमाणात वापर केल्याने चेहऱ्यावर पुरळ येण्याची समस्या बळावते.