मोहरीच्या साहाय्याने रुमेटाइड अर्थ्रायटिसवर मात करा; कसे? ते जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। रुमेटाइड अर्थ्रायटिस हा एक वाताचा प्रकार आहे. हा एक असा आजार जो काहीही केल्या लवकर बरा होत नाही. तसेच याची लक्षणे रुग्णाला अकार्यक्षम करण्यास प्रभावी असतात. सर्वसाधारणपणे हा आजार उतार वयातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. या आजारात असह्य सांधेदुखी आणि स्नायूंमधील अस्थिरता यामुळे अगदी साधी सोपी कामे करणेदेखील अवघड वाटू लागतात. काही औषधांनी हा आजार नियंत्रणात राहतो. मात्र घरगुती उपायांपैकी मोहरीच्या वापराने रुमेटाइड अर्थ्रायटिसचा त्रास कमी होण्यास मदत होते. अर्थात कोणत्याही शारीरिक समस्येसाठी पूर्णतः मोहरी उपयोगी पडत नाही. त्यासाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच लागतो. पण ज्या काही शारीरिक समस्यांसाठी आपल्याला मोहरीचा उपयोग करून घेता येतो ते आपण या लेखातून पाहणार आहोत.
यासाठी आपल्याला मोहरीचे तेल आवश्यक आहे. हे तेल मोहरीच्या दाण्यापासुन काढण्यात येते. प्रत्येकाच्या घरात मोहरी हा पदार्थ हमखास सापडतो आणि उत्तरेकडील राहणाऱ्या लोकांकडे मोहरीचे तेल हमखास मिळते. मोहरीचे दाणे हे काळ्या सालीचे आतून पिवळ्या रंगाचे असतात. मशीनच्या मदतीने व लाकडी घाण्याचा सहाय्याने मोहरीचे तेल काढण्यात येते. मोहरीच्या तेलामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुण असतात. मोहरीच्या तेलातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये स्नायूंचे स्वास्थ्य राखणारे गुण असतात. ज्यामुळे रुमेटाइड अर्थ्रायटिसच्या रुग्णांना याचा लाभ होतो.
० रुमेटाइड अर्थ्रायटिसच्या रुग्णांना मोहरी कशी मदत करते ?
– मोहरीमध्ये सिलेनियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील विषारी घटक निघून जाण्यास मदत होते. तसेच मोहरीतील दाहशामक क्षमतेमुळे वेदना कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदात उल्लेख केल्याप्रमाणे, मोहरीमधील उष्णता निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे दुखत्या जागी मोहरी लावल्यास तेथील तापमान वाढण्यास मदत होते. यामुळे दुखत असलेल्या भागातील स्नायू मोकळे होऊन त्या जागी होणाऱ्या वेदना हळू हळू कमी होण्यास मदत होते.
– मोहरीमुळे रुमेटाइड अर्थ्रायटिसचा दोन प्रकारचा त्रास कमी होण्यास मदत होते.
१) सांधेदुखी – यासाठी एका टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात मोहरी टाकावी. या पाण्याने आंघोळ करा किंवा दुखणारे सांधे या पाण्याने हळुवारपणे शेकवावे. यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते.
२) सूज – मोहरीमध्ये थोडे पाणी मिसळून त्याची व्यवस्थित पेस्ट करावी. ही पेस्ट स्नायूंमुळे शरीराच्या भागावर चढलेल्या सूजेवर लावून २०-३० मिनिटांनी धुवावी. हा उपाय सूज कमी होइपर्यंत दिवसातून किमान दोनदा करावा.