ग्रीन टी’चा ओव्हरडोस आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या दुष्परिणाम
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक जण वजन कमी करायचं म्हणून ग्रीन टी हे पेय फार आवडीने पितात. इतके कि सकाळी उठल्यावर, नाश्ता करताना, दुपारी जेवल्यावर, संध्याकाळी स्नॅक टाइम, रात्री झोपण्याआधी असे कितीतरी ते ग्रीन ती पितात. एकवेळ जेवण देऊ नका पण ग्रीन ती द्या अशी ह्यांची परिस्थिती असते. पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे ग्रीन टी कितीही आरोग्यदायी घटकांनी समृद्ध असली तरीही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानदायीच असतो. ग्रीन टी च्या बाबतीत देखील असेच आहे. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात कि, अति ग्रीन टी पिण्याची सवय अतिशय घातक आहे. याचे आपल्या शरीरावर अनेको दुष्परिणाम होतात. जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-
१) उलटी होणे – अति ग्रीन टी प्यायल्यास उलट्या होण्याचा त्रास होतो. कारण ग्रीन टीमध्ये टॅनिन असते. या टॅनिनचे शरीरातील अति प्रमाण आतड्यातील प्रथिनांचं प्रमाण कमी करते. यामुळे उलटी, बध्दकोष्ठता हे त्रास संभवतात.
२) चक्कर येणे – ग्रीन टीमध्ये कॅफीन असते आणि हे शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास चक्कर येते. शिवाय कॅफिन मेंदू आणि मज्जातंतूत रक्तप्रवाह कमजोर करते. परिणामी चक्कर येते.
३) कमकुवत हाडे – ग्रीन टीच्या अतिसेवनामूळे ऑस्टियोपोरोसिस हा हाडांचा आजार होण्याचा धोका वाढतो. ग्रीन टी मधील घटक शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात. परिणामी हाडासंबंधी विकार होण्याची शक्यता वाढते.
४) मायग्रेन – ग्रीन टी जास्त प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास होतो. कारण ग्रीन टीमधे कॅफिन असतो. याचे अति सेवन डोकेदुखीला कारणीभूत ठरते. परिणामी मायग्रेनचा त्रास संभवतो.
५) पोटात बिघाड – ग्रीन टीमधे टॅनिन असते. हे पोटात अँसिडचे प्रमाण वाढवते. यामुळे बध्दकोष्ठता, अँसिड रिफ्लक्स या त्रासांसोबतच पचनाच्या समस्या निर्माण होतात. परिणामी पचनक्रियेवर देखील परिणाम होतो आणि पोटात बिघाड निर्माण होतो.
६) अनियमित हदयाचे ठोके – ग्रीन टीच्या अति सेवानामुळे हदयाचे ठोके अनियमित होतात. यामुळे रक्तदाब अती प्रमाणात कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य धोक्यात येते.
७) रक्ताची कमतरता – ग्रीन टीमधे अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण जास्त असतं. यामुळे ग्रीन टीचे अति सेवन केल्यास शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते आणि अँनेमिया होण्याची शक्यता वाढते.
८) यकृताला धोका – ग्रीन टीमध्ये असणारे कॅफीन यकृतावर घातक परिणाम करते. यामुळे ग्रीन टीचे अति सेवन केल्यास यकृतावर दाब निर्माण होतो आणि त्याचे आरोग्य धोक्यात येते.
९) गरोदर महिलांसाठी घातक – टॅनिन, कॅफिन आणि कॅटेचिन हे तिन्ही घटक ग्रीन टीमध्ये आढळतात. जे गरोदरपणात धोका निर्माण करतात. त्यामुळे गर्भवती महिला आणि स्तनपान करणार्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ग्रीन टी प्यावा.
१०) निद्रानाश – ग्रीन टीमधे कॅफीन असते जे आपल्या झोपेवर गंभीर परिणाम करते. ज्या व्यक्ती कॅफिनच्या प्रती संवेदनशील असतात त्यांनी जर ग्रीन टी घेतला तर मात्र त्याचा परिणाम त्यांची झोप विस्कळित होण्यावर होतो. झोपेसाठी मेलाटोनिन नावाचं संप्रेरकं आवश्यक असतं. पण अति प्रमाणात ग्रीन टी घेतल्यास मेलाटोनिन या संप्रेरकात असमतोल निर्माण होतो आणि निद्रानाशाची समस्या उदभवते.