भाग 1 : आरोग्यासाठी लवंग फायदेशीर का मानली जाते?; जाणून घ्या काय सांगते आयुर्वेद
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन आहारात चटकदार भाजी, पुलाव असे पदार्थ बनविताना हमखास खडा मसाला वापरला जातो. यामध्ये लवंग असते. छोटीशी लवंग तिचा सुगंध आणि चव अशी पदार्थांमध्ये सोडते कि बस्स.. पण केवळ आहाराची लज्जत वाढवण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठीही लवंग अतिशय फायदेशीर मानली जाते.
आयुर्वेदात लवंग किती आरोग्यदायी तत्त्वांनी परिपूर्ण आहे हे सांगितलेले आहे. शिवाय अनादी काळापासून लवंगेचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्येही करण्यात आला असल्याचे यात सांगितले आहे. अगदी आजीच्या बटव्यातील औषधींमध्येही लवंग आहेच. याचे कारण म्हणजे तिचे औषधीय गुणधर्म. तर आज आपण भाग १ मध्ये आयुर्वेदानुसार लवंग काय आहे आणि कशी फायदेशीर आहे हे जाणून घेणार आहोत.
० काय आहे लवंग.. ?
आयुर्वेदानुसार लवंग एक अत्यंत फायदेशीर अशी औषधी आहे. याचे झाड नेहमी फुललेले असते. अगदी शतकांपासून लवंगेच्या सुक्या कळ्यांचा उपयोग विविध प्रभावी औषधी तयार करण्यासाठी होत आहे. भारतात आहारामध्ये लवंग वापरण्याचे प्रमाण अधिक असले तरीही आयुर्वेदिक वारस्यानुसार प्रभावी औषधींसाठी लवंग परिणामकारक आहे.
लवंगेचे वैज्ञानिक नाव सिजीजियम अरोमॅटिक आहे. साधारण ९ वर्षाने एका झाडाला लवंगेचे फूल येते. हे फूल सुकवून लवंग तयार होते. जिचा वापर अतिशय औषधीय असून अनेक वर्षांपासून केला जातोय. कारण यामध्ये असलेले अँटिमायक्रोबायल आणि अँटिऑक्सिडंट्सचा विविध रोगांवर अधिक प्रभाव पडतो. याशिवाय लवंगेतील अँटिव्हायरल आणि एनाल्जेसिक घटकांचाही शरीराला चांगला फायदा होतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये याचा जास्त प्रमाणात उपयोग करण्यात येतो.
० आयुर्वेदात सांगितलेले लवंगेचे पोषक तत्व
आयुर्वेदानुसार लवंगमधून शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व मिळतात. यामध्ये पाणी, एनर्जी, फायबर, कार्बोहायड्रेट, ग्लुकोज, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडियम, जिंक, कॉपर, मँगनीज ही मिनरल्स असतातच.
याशिवाय विटामिन सी, विटामिन बी, थियामिन बी, कोलीन, बीटेन, विटामिन ई, विटामिन के या सर्व घटकांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे लवंग ही शरीराला अतिशय उपयुक्त ठरते. लवंगेतील हेच गुणधर्म आपल्याला मोठमोठ्या आजारांपासून दूर ठेवतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये लवंगेचे एक विशेष स्थान आहे.