लाल कांदा, पांढरा कांदा रंग वेगळे आणि गुणधर्म ?; जाणून घ्या दोघांतील फरक
हॅलो आरोग्य ऑनलाईन। व्हेज असो नाहीतर नॉनव्हेज कांदा तर पाहिजेच. आपणा सर्वांनाच कांदा माहित आहे. अगदी लाल कांदा सुद्धा आणि पांढरा कांदासुद्धा आपण आहारात वापरतो. पण किती लोकांना या दोन्ही कांद्याच्या गुणधर्मांमधील फरक माहिती आहे? कारण फार ठराविक भागातच पांढरा कांदा प्रामुख्याने आढळतो. तर लाल कांदा जवळ जवळ सर्व भागांमध्ये आढळतो. त्यामुळे विशेष करून त्याचा वापर जास्त आहे. तर चला आज जाणून घेऊयात लाल आणि पांढऱ्या कांद्यातील फरक कोणते ते खालीलप्रमाणे:-
– कांद्याचा लाल रंग हा त्यात आढळणाऱ्या अंथोसायनीन घटकामुळे येतो आणि हा घटक पांढऱ्या कांद्यात आढळत नाही.
– मुख्य म्हणजे कांद्यात असणारा तिखटपणा अलील प्रोपिल डाय सल्फाईडमुळे असतो आणि याचे प्रमाण लाल कांद्याच्या तुलनेत पांढऱ्या कांद्यात जास्त असल्याने तो अधिक तिखट असतो.
– पांढऱ्या कांद्याच्या तुलनेत लाल कांदा कमी तिखट आणि रंगीत असल्याने त्याचा सलाड, कोशिंबीरमध्ये प्रामुख्याने वापर केला जातो.
– पांढरा कांदा हा घट्ट बांधणीचा असतो. याउलट लाल कांदा सैल बांधणीचा असतो. शिवाय लाल कांदा आतून पोकळ असतो. त्यामुळे त्यात बाष्प साठल्याने तो लवकर सडतो वा खराब होतो. तर पांढरा कांदा घट्ट बांधणीचा असल्यामुळे त्यात बाष्प साठण्याचे प्रमाण कमी असते. यामुळे तो लवकर सडत वा खराब होत नाही.
– लाल कांद्याची साठवण क्षमता फार कमी आहे. तर पांढरा कांदा आपण बराच काळ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवू शकतो.
– प्रक्रिया उद्योगात पांढऱ्या कांद्याची पोच मोठी आहे. आजकाल हॉटेल मध्ये आयते मसाले मोठ्या प्रमाणात वापरले जातात. यामुळे कांदा पावडर, कांद्याची पेस्ट, कांद्याचे वाळलेले काप इ. अनेक पदार्थासाठी पाण्याचे प्रमाण कमी असलेला शिवाय रंगाने पांढरा आणि चवीने तिखट असलेला पांढरा कांदाच फायदेशीर आहे. तसेच पांढऱ्या कांद्याची साठवण क्षमता चांगली असल्यामुळे अश्या पदार्थांसाठी पांढरा कांदाच योग्य ठरतो.
– उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये अधिक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पांढरा कांदा जास्त फायदेशीर आहे. डोके, तळहात, पायाच्या तळव्यांना कांद्याचा रस चोळल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही.
– पांढऱ्या कांद्यात मिथिल सल्फाईड आणि अमिनो ऍसिड संतुलित प्रमाणात असते. यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण मर्यादित राहते. तसेच रक्ताची कमतरता दूर करण्यासाठीही याचा फायदा होतो.
– पावसाळ्याच्या दिवसात सर्दी, कफ खोकल्याच्या समस्या बळावतात. याकरिता कांद्याच्या रसात गूळ व थोडे मध घालून चाटण केल्यास त्वरित गुण मिळतो. यात लाल कांद्याऐवजी पांढरा कांडा वापरणे फायद्याचे ठरते.
– या शिवाय पुरुषांमध्ये वीर्य वाढीसाठी कांद्याची विशेष मदत होते. कांद्यातील सल्फर व इतर फ्लेवोनॉइड्समुळे रक्तातील साखर कमी करण्यास व रक्त पातळ होण्यास मदत होते. शिवाय हे घटक कर्करोगाच्या वाढीस प्रतिबंध करतात.