लस्सा विषाणूच्या तापाचा धोका; जाणून घ्या कारणे आणि लक्षणे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। गेल्या दोन वर्षात संपूर्ण जगाने अत्यंत भीषण अश्या परिस्थितीला तोंड दिले आहे. कोरोना नामक विषाणूने प्रत्येक माणसाला पळता भुई फार केले होते. कित्येकांनी जगण्याची आशा सोडली होती. अत्यंत हलाखीचे आणि महामारीचे दिवस संपूर्ण जगाने पाहिले. यानंतर आता कुठे संपूर्ण जगभरात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोक जगण्याच्या प्रयत्नांत दिसत आहेत. दरम्यान जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता आणखी एका धोक्याची चाहूल लागली आहे. हा धोका आहे लस्सा विषाणूच्या तापाचा. होय. हा एक असा विषाणू आहे ज्याच्या संसर्गाने माणसाचे शरीर तापते आणि त्याला ताप येतो.
० या तापाला ‘लस्सा’ हे नाव कसं पडलं?
नायजेरियात लासा नावाचे एक ठिकाण आहे. तिथेच या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता आणि त्यामुळेच या तापाला ‘लस्सा’ असे नाव पडले.
० लस्सा ताप म्हणजे काय?
लस्सा हा एक विषाणू आहे जो उंदरांद्वारे माणसांमध्ये पसरतो. संक्रमित उंदराच्या मूत्र वा विष्ठेने दूषित झालेले अन्न किंवा घरगुती वस्तूंच्या संपर्कात एखादी व्यक्ती आल्यास या विषाणूचा संसर्ग माणसाला बाधतो. त्यानंतर हा आजार माणसापासून माणसातदेखील पसरू शकतो. या विषाणूच्या संसर्गामुळे माणसाचे शरीर तापते. या स्थितीला लस्सा ताप असे म्हणता येईल.
लस्सा विषाणूने बाधित रुग्णाचे डोळे, नाक वा तोंडातून एक विशिष्ट द्रव पदार्थ बाहेर पडत असतो. या द्रवपदार्थाच्या संपर्कात एखादी व्यक्ती आल्यास त्यालाही हा आजार होऊ शकतो. युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन कंट्रोलच्या मते, या विषाणूची सुमारे ८०% प्रकरणे लक्षणे नसलेली असल्यामुळे याचा शोध लागून उपचार करणे कठीण होते. दरम्यान वेळीच उपचार न केल्यास या विषाणूने ग्रासलेलया रुग्णांना गंभीर मल्टीसिस्टम रोग होण्याचा धोका असतो.
० लस्सा विषाणूच्या तापाची लागण होण्याची कारणे
बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणे, मिठी मारणे, हस्तांदोलन करणे, संक्रमित व्यक्तीच्या वापरातील वस्तू वापरणे.
० लस्सा विषाणूच्या तापाची लक्षणे
- सौम्य लक्षणांमध्ये सौम्य ताप, थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. - गंभीर लक्षणांमध्ये रक्तस्त्राव, श्वास घेण्यात अडचण, उलट्या, चेहरा सूजणे, छाती- पाठ आणि पोटदुखी यांचा समावेश आहे.
० किती दिवसांनी लक्षणे दिसतात?
लस्सा तापाची लक्षणे साधारणतः १ ते ३ आठवड्यांनंतर दिसतात.
० कुठे आढळले रुग्ण?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सिएरा लिओन, लायबेरिया, गिनी आणि नायजेरियासह पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये या विषाणूची प्रकरणे आढळली आहेत. शिवाय लस्सा तापाशी संबंधित मृत्यूचे प्रमाण खूपच कमी म्हणजे सुमारे १% इतके आहे. रिपोर्टनुसार, यूकेमध्ये लस्सा विषाणूच्या तापाचे आतापर्यंत एकूण ३ रुग्ण आढळले असून हा विषाणू सर्वत्र पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या ११ फेब्रुवारी २०२२ रोजी या ३ रुग्णांपैकी १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनानंतर आता लासा हा विषाणू नक्कीच चिंतेची बाब ठरू शकतो असा तज्ञांनी दावा केला आहे. याशिवाय लस्सा तापाची ही प्रकरणे पश्चिम आफ्रिकन देशांच्या प्रवासाशी संबंधित असल्याची माहिती आहे.