मिठाचे अतिसेवन ठरेल इम्युनीटीच्या ऱ्हासाचे कारण; अधिक जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। फक्त खाण्याचे शौकीनच समजू शकतात योग्य पदार्थांचे मूल्य मापन. त्यामुळे जेवणास रुचकर बनविणारे मीठ थोडे कमी किंवा जास्त झाले तर त्यांना लगेच याची भनक लागते. मात्र एक गोष्ट लक्षात आली का? मीठाचे प्रमाण कमी असले तरीही चवं बिघडते आणि जास्त असले तरीही. निश्चितच मीठ आरोग्यासाठी काही प्रमाणात फायदेशीर आहे. मीठामध्ये सोडियम आणि क्लोराइड मिनरल असते. जे शारीरिकदृष्ट्या आवश्यक आहे. मात्र या नादात अधिक मीठाचे सेवन केले असता, ब्लड प्रेशर सारख्या समस्यांना बोलावणे दिल्यासारखे होते. शिवाय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मीठाचे अतिसेवन इम्युनिटीसाठी धोकादायक ठरू शकते, असे समोर आले आहे.
सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीन या सायन्स मॅगझीनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जर्मनीतील यूनिवर्सिटी हॉस्पिटल ऑफ बोनच्या संशोधकांनी एक अभ्यास केला आहे. यातून असे लक्षात आले आहे कि, मानवी आहारात अधिक मीठाचा समावेश असल्याने मनुष्याच्या इम्यून सिस्टीममधील अॅन्टी बॅक्टेरियल प्रक्रिया बिघडू शकते. अर्थात आपली रोगप्रतिकारक क्षमता विरून जाण्याची शक्यता संभवते. ज्यामुळे इम्यूनसिस्टीम धोकादायक बॅक्टेरियाला नष्ट करण्याची शक्ती गमावते. यामुळे कोणताही बॅक्टेरिया सहजरित्या आपल्या शरीरात प्रवेश करून आपली प्रकृती बिघडवू शकतो.
अभ्यासानुसार, जास्त मीठाचे सेवन केल्याने न्यूट्रोफिल नावाच्या रोगप्रतिकारक पेशी हळूहळू कमकुवत होऊ शकतात आणि एका सीमेनंतर नष्ट होऊ शकतात. या पेशी किडनीला बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करत असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, प्रत्येक प्रौढ व्यक्तीने एक चमच्यापेक्षा कमी अर्थात दररोज केवळ ५ ग्रॅम मीठाचेच सेवन करावे अशी निश्चित मात्रा आहे. तर लहान मुलांच्या आहारातील मीठाचे प्रमाण या तुलनेत कमी असायला हवे. शिवाय दररोज आवश्यक असलेल्या मीठाचे प्रमाण आपल्या शारीरिक हालचालींच्या पातळीवर अवलंबून असतं. या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आपण आपल्या कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.