रात्रभर एसीच्या थंड हवेत झोपत असाल, तर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। खूप गर्मी होत असेल तर साहजिकच अगदी नकोनकोसे वाटते आणि आपला हात पंख्याचे बटण शोधू लागते. पण असह्य उकाडा असेल तर मात्र एअर कंडिशनर अर्थात एसीच्या थंडगार हवेइतके दुसरे कोणतेच सुख नाही असे वाटते. तसे पाहता आजकाल अनेको कार्यालयात एसी असतातच. याशिवाय अनेक लोकांच्या घरातसुद्धा एसी लावल्याचे दिसते. आजकाल अनेक लोकांना दिवस असो नाहीतर रात्र एसीच्या थंड हवेची इतकी सवय लागलेली असते कि दोन मिनिटं जरी एसी बंद केला तरीही त्याना त्रासदायक वाटते. परंतु आपल्याला हे ठाऊक आहे का? आरोग्याच्या दृष्टीने एसीत बराचवेळ घालवणे मग ते बसून राहणे असेल किंवा झोपणे असेल दोन्हीही हानिकारक आहे.
अनेकजण बाराही महिने रात्रभर एसीत झोपतात. मुख्य म्हणजे रात्रीच्या वेळी आपले शरीर आरामाचा अवस्थेत असते. यामुळे शारीरिक प्रक्रिया पूर्णपणे बंद असतात. अश्यावेळी एसीचे थंड वारे आपल्या शरीराचे नुकसान करण्यास करणीभूत ठरतात. त्यामुळे तात्पुरता आल्हाददायी वाटणारा एसी कालांतराने आरोग्याच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण करतो. चला तर जाणून घेऊयात एसीच्या थंड वाऱ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो..?
१) श्वसन विकार – एसीची पुरेशी स्वच्छता न पाळल्यास त्यामध्ये फंगस आणि बॅक्टेरियाची वाढ होते. परिणामी एसीच्या फॅनमधून बाहेर पडणार्या हवेतून निघणारे बॅक्टेरिया श्वसनमार्गात जातात आणि यामुळे श्वसनविकार किंवा श्वास घेताना त्रास होतो. पुढे हि समस्या गंभीर आजाराचे स्वरूप धारण करू शकते.
२) शारीरिक थकवा – एसी चालू असल्यामुळे घराचे दरवाजे, खिडक्या सर्व काही पूर्ण बंद करावे लागते. त्यामुळे घरात कोणत्याही कोपऱ्यात नैसर्गिक आणि फ्रेश हवा खेळती राहण्याचे सारे मार्ग बंद होतात. परिणामी आपल्याला मरगळ जाणवते आणि शारीरक थकवा वाढतो.
३) सर्दीचा त्रास – एसीमुळे वातावरणात थंडावा निर्माण होतो परिणामी सर्दीचा त्रास बळावतो. त्यामुळे एसीचे तापमान कमी होते तेव्हा डोकेदुखी आणि सर्दीचा त्रास होतो. यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि तापसुद्धा येतो. कधी कधी हा ताप मेंदूतसुद्धा जाऊ शकतो.
४) अंगदुखी होते – रात्रभर एसीत झोपल्यामूळे आराम अवस्थेत असणाऱ्या आपल्या शरीराचे तापमान आणि वातावरणातील थंडावा यांमध्ये फरक वाढतो. परिणामी थोड्या वेळाने रूममधील टेम्परेचर अति थंड झाल्याने डोकेदुखी, पाठदुखी, स्नायूदुखी, पोटऱ्या दुखणे, पायात गोळे येणे या समस्या निर्माण होतात.
५) लठ्ठपणा वाढतो – थंड ठिकाणी आपल्या शरीराची ऊर्जा खर्च होत नाही. परिणामी शरीरावरील चरबी वाढते. तसेच एसीमध्ये सतत राहिल्याने शारीरिक थकवा जाणवतो ज्यामुळे थकलेलं शरीर व्यायाम करू शकत नाह. परिणामी शरीरावर चरबीचे थर वाढत जातात आणि लठ्ठपणा वाढत जातो
६) त्वचेचा कोरडेपणा – एसी वातावरणातील हवेप्रमाणे आपल्या शरीरातील मॉईश्चरदेखील खेचून घेते. त्यामुळे रात्रभर एसीत झोपल्याने शरीरातील मॉईश्चर कमी होते आणि परिणामी त्वचा कोरडी होते.