तुमचे केस विरळ असतील तर ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केस कुणाला आवडत नाहीत? अश्या केसांमुळे तर सौंदर्याला चार चाँद लागतात. पूर्वी लोक आपल्या आरोग्याबाबत आणि सौंदर्याबाबत अत्यंत जागरूक असल्यामुळे नैसर्गिक जिन्नसांचा वापर करत असत. ज्यामूळे त्यांचे आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही शाबूत राहत असे. मात्र आजकालची चुकीची जीवनपद्धती, अयोग्य आहार आणि प्रदूषणामुळे केवळ आरोग्य नव्हे तर सौंदर्य देखील अडचणीत आले आहे. यात प्रामुख्याने केसांचे अक्षरशः हाल होत आहेत. परिणामी टक्कल पडणे, केस विरळ होणे, केसांत कोंडा होणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी केसांमुळे एखाद्या व्यक्तीच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते.
अनेकदा केस गळण्याचे कारण ताण तणाव आणि घाम देखील असतो. त्यामुळे केसांचे विरळ होणे लक्षात येताच वेळीच त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. शिवाय बाजारात उपलब्ध असलेले केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरल्याने केसांची गुणवत्ता आणखीच खालावते. म्हणून केसांची योग्य काळजी घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण आपल्याच चुका आपल्या आरोग्याशी खेळत असतात.
तुमचे केस विरळ असतील तर या चुका टाळा :-
केस ओले ठेवू नका
केस ओले राहिल्यानेही तुटतात. परिणामी हळूहळू विरळ होतात. शिवाय विरळ केसांमध्ये ब्लो ड्रायरचा वापर केल्यास केसांमध्ये बाऊन्स निर्माण होतो. म्हणून वारंवार त्याचा वापर करणे टाळा आणि घाई असेल तेव्हा ब्लो ड्रायर वापरण्यापूर्वी केसांवर व्हॉल्यूमिंग स्प्रे’चा उपयोग करावा आणि केस व्यवस्थित कोरडे करावे.
केसांच्या स्कॅल्पकडे दुर्लक्ष नको
केसांची योग्य निगा राखण्यासाठी केसांचा स्कॅल्पदेखील स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. कारण केसांच्या स्कॅल्पवर धूळ, माती आणि घामामुळे बॅक्टेरीया जमा होतात. परिणामी केसांचे नुकसान होते. म्हणून केसांना ऑइल मसाज आणि आठवड्यातून ३ वेळा सौम्य शॅम्पूच्या वापराने वॉश करणे गरजेचे आहे.
केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर टाळा
पातळ केसांचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करू नये. इतकेच नव्हे तर कोणत्याही उत्पादनांचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यास केसांचे नुकसान होते. त्यामुळे शक्यतो केसांच्या आरोग्यासाठी घरगुती आणि सौम्य उत्पादनांचा वापर करा.
नियमित शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर नको
केसांच्या स्टाईल लूकसाठी वारंवार शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करणे केसांचे नुकसान करते. याशिवाय कंडिशनर लावताना तो मुळामध्ये लावू नये. अन्यथा केस गळती तीव्र होते. त्यामुळे एकतर प्रत्येकवेळी शॅम्पू आणि कंडिशनर वापरू नका. दुसरं म्हणजे घरगुती उपायांचा अवलंब करा.