तवसाचे गोड तिखट वडे टेस्टी तितके हेल्दी; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो शीर्षक वाचल्यानंतर तुमच्यापैकी बरेच जण तवसाचे वडे म्हणजे काय अशा प्रश्नावर येऊन अडकले असतील. हो ना..? अहो तवस म्हणजे तुमच्या ओळखीतली काकडी. फक्त या काकडीचा आकार साधारण काकडीपेक्षा मोठा असतो. पण हि काकडी साधारण काकडीपेक्षा जास्त पोषण दायी असते. या काकडीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण व्हिटॅमीन्स आणि खनिजांचं प्रमाण साधारण काकडीपेक्षा जास्त असतं.
तवसा काकडीतील पोषण तत्त्वे खालीलप्रमाणे:-
घटक | मात्रा |
कॅलरीज | 45 |
फॅट्स | 0 ग्रॅम |
कार्ब्स | 11 ग्रॅम |
प्रोटीन | 2 ग्रॅम |
फायबर | 2 ग्रॅम |
व्हिटॅमीन सी | RDI 14% |
व्हिटॅमीन K | RDI 62% |
मॅग्नेशिअम | RDI 10% |
पोटॅशिअम | RDI 13% |
मँगनीज | RDI 12% |
तवसा काकडी हि वरील सर्व पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असते. शिवाय काकडीमध्ये पाण्याची मात्राही अधिक असते. काकडीतील जास्तीत जास्त पोषक तत्त्व मिळण्याकरता पिकलेली काकडी खाणं आवश्यक आहे आणि हि पिकलेली काकडी म्हणजेच तवसा. पण लक्षात ठेवा हि काकडी सोलून खाल्ल्यास त्यातील फायबरचं प्रमाण कमी होतं. शिवाय काही व्हिटॅमीन्स आणि खनिजंही कमी होतात. पण या काकडीचा आकार एव्हढा मोठा असतो कि एकावेळी हि काकडी संपणे अशक्य. याशिवाय तवसा चवीला फारशी स्वादिष्ट नसल्यामुळे मुलं खात नाहीत. अशावेळी तवसाचे गोड किंवा तिखट वडे हा अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असा पर्याय सिद्ध होतो. चला तर जाणून घेऊयात हेल्दी तवसाचे टेस्टी वडे कसे बनवायचे आणि त्याचे फायदे काय? खालीलप्रमाणे:-
० साहित्य :-
गोड वडे - २ तवसा काकड्या (किसून), ५० ग्रॅम गूळ, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर वेलची- जायफळ पूड, आवश्यकतेनुसार तांदळाचे पीठ, वडे तळण्यासाठी तेल, प्लॅस्टिक पेपर.
तिखट वडे - २ तवसा काकड्या (किसून), आवश्यकतेनुसार तांदळाचे पीठ, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमुटभर हिंग, १ टीस्पून हळद, १ टीस्पून आलं- हिरवी मिरचीची पेस्ट, वडे तळण्यासाठी तेल, प्लॅस्टिक पेपर.
० कृती :-
एक कढई गरम करून त्यात किसलेली काकडी त्याचं पाणी कमी होईपर्यंत परतून घ्या. आता यात गूळ घालून व्यवस्थित मिसळा. यानंतर वेलचीपूड जायफळ टाका, सारण थंड होऊ द्या त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं तांदुळाचे पीठ टाकून कणीक मळून घ्या. यानंतर पोळपाटावर एक प्लॅस्टिक पेपर घेऊन लहान पिठाचा गोळा घेऊन बोटाने लहान वडा थापून घ्या आणि तेल गरम करून त्यामध्ये वडा मस्त खरपूस तळून घ्या. हे वडे बटाट्याची भाजी, रस्सा भाजी किंवा कुर्मा भाजीसोबत खा.
अशाच पद्धतीने तिखट वडे बनवण्यासाठी सर्व जिन्नस मिसळूस घ्या आणि आवश्यकतेप्रमाणे तांदळाचं पीठ टाकून कणीक मळून घ्या. प्लॅस्टिकच्या कागदावर लहान वडे थापून ते तळून घ्या. मस्त तवसाचे तिखट वडे लोणचं, शेंगदाण्याची चटणी यासोबत किंवा काळ्या वाटाण्याची भाजी, रस्सा भाजीसोबत खा.
० फायदे :-
रोग प्रतिकारक शक्तीवर्धक – तवसा काकडी विशेष अँटीऑक्सीडंट्सयुक्त असते. जी अनेक आजार होण्याची शक्यता कमी करते.
सुलभ पचनासाठी – काकडीतील पेक्टीन नामक विरघळणाऱ्या फायबरमुळे आतड्यांची क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. शिवाय हि काकडी पाण्याचा चांगला स्त्रोत असल्यामुळे बद्धकोष्ठ आणि पचन जलद करण्यासाठी मदत करते.
हृदयमित्र काकडी – काकडीमध्ये पोटॅशिअम असतं. जे लो ब्लडप्रेशरशी निगडीत असतं. आपल्या शरीरातील आणि बाहेरील पोटॅशिअम एक योग्य संतुलन तुमच्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. त्यामुळे तुम्ही काकडीचं सेवन केल्यास तुमचं हृदय निरोगी राहील.
डीहायड्रेशन टाळण्यासाठी – तवसा काकडीमध्ये ९६% पाणी आढळतं. त्यामुळे या काकडीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील पाण्याची गरज पूर्ण होण्यास मदत होईल.
कॅन्सरचा धोका टाळा – काकडीत पॉलीफेनोल आढळतं जे स्तन, गर्भाशय आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करतं. याशिवाय काकडीत फिओनोट्रीयंट्स असतात ज्यामध्ये कॅन्सर दूर करण्याचे गुण असतात.
वजन कमी करते काकडी – तवसा काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात. एक कप काकडीमध्ये फक्त १६ कॅलरीज असतात. त्यामुळे हि काकडी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
तोडांची दुर्गंधी होईल दूर – तवसा काकडी खाल्ल्याने पोटातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत मिळते. या उष्णतेमुळे मुख्यतः तोंडाची दुर्गंधी होते.
तणावावर प्रभावी – तवसा काकडीमध्ये भरपूर व्हिटॅमीन बी असतं. जे मनात चिंता निर्माण करणाऱ्या भावना कमी करतं. यामुळे तणाव दूर होण्यास मदत मिळते.