प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास आरोग्याला मिळतील ‘हे’ लाभ; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। शेंगदाणा न आवडणाऱ्यांची संख्या जरा कमीच आहे. कारण टाईमपास स्नॅकमध्ये शेंगदाणा हमखास खाल्ला जातो. त्यात शेंगदाण्यातील बरेच गुणधर्म आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहेत. बरेच लोक शेंगदाणे खाण्याचे शौकीन असतात. त्यामुळे मनात येईल तेव्हा आणि वाट्टेल तितके शेंगदाणे ते एकावेळी खातात. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. त्याप्रमाणे शेंगदाण्याचे सेवन प्रमाणात केले असता आरोग्यासाठी लाभदायी ठरते.
शेंगादाण्यामध्ये आरोग्यासाठी लाभदायक ठरणारे अनेक गुणधर्म आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन-E, फॉलेट, नियासिन, मॅगनीझ आणि प्रोटीन अशा अनेक पोषणदायी घटकांचा समावेश आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, १०० ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये १ लिटर दुधाएवढं प्रोटीन असतं. त्यामुळे शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी उत्तम आणि लाभदायी पर्याय मानला जातो. म्हणूनच आज आपण शेंगदाणे खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
> प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास आरोग्याला होणारे फायदे
1. ऊर्जास्रोत - शेंगदाण्यात जीवनसत्त्वे खनिजे, अँटी ऑक्सिडेंट आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शेंगदाणे उर्जेचा एक उत्तम स्रोत मानले जातात.
2. मधुमेहावर नियंत्रण - संशोधनानुसार, शेंगदाणे खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. शिवाय शेंगदाण्यातील मॅगनिझमुळे कार्बोहायड्रेट आणि फॅट नियंत्रणात राहते. परिणामी रक्ताभिसरण आणि साखरेचं प्रमाण संतुलित होतं.
3. पोटाच्या समस्यांवर मात - शेंगदाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यामूळे चयापचय व्यवस्थित होऊन पचनशक्ती सुधारते. याशिवाय भूक न लागण्याची समस्याही दूर होते. तसेच अपचन आणि गॅसची समस्या सोडवण्यासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात. यामुळे पित्तासारखे आजारदेखील कमी होतात.
4. स्मरणशक्ती सुधारते - बदाम आपल्या मेंदूसाठी जितके चांगले असतात अगदी तितकेच पोषक शेंगदाणे असतात. शेंगदाण्यात असलेल्या ‘विटामिन बी ३’ मुळे मेंदूकडे रक्ताचा पुरवठा वाढतो. परिणामी मेंदू शांत आणि संयमी राहिल्यामुळे त्याचे कार्य सुरळीत सुरु राहते. यामुळे स्मरणशक्ती सुधारते.
5. त्वचेचे संरक्षण - कमी वयात सुरकुत्या तसेच वृद्धत्वाची चिन्ह दिसू लागली तर शेंगदाणे जरूर खा. कारण शेंगादाण्यातील विटामिन C आणि विटामिन E मुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. शिवाय शेंगदाण्यातील ओमेगा- ६ फॅट त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
6. नैराश्यापासून सुटका - शेंगदाण्यात असलेल्या अमिनो अॅसिडमुळे सेरोटोनीन स्त्रावण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी नैराश्य कमी होत जाते. सेरोटोनीन स्वभाव बदल नियंत्रणाचे काम करते. काही कारणाने प्रमाणाबाहेर सेरोटोनीन स्त्रवले जाते आणि यामुळे माणूस नैराश्येकडे ओढला जातो.
7. गर्भवती स्त्रियांसाठी फायदेशीर - शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी आणि त्यांच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या विकासासाठी फायदेशीर मानले जाते. शेंगदाण्यातील 'फॉलीक अॅसिड' बाळ निरोगी जन्माला येते.