‘हा’ पौष्टिक लाडू करेल वेट कंट्रोल; जाणून घ्या साहित्य आणि कृती
हॅलो आरोग्य ऑनलाईन| आजकाल वजन कमी करणे किंवा वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे जणू अवघड झाले आहे. परंतु आपल्या हे कसे लक्षात येत नाही की, ही बाब अवघड आहे अशक्य नाही. मुळात ज्यांना वजन कमी किंवा वजनावर नियंत्रण मिळवायचे आहे त्यांनी आपल्या दैनंदिन सवयींमध्ये काही विशेष बदल करणे आवश्यक आहे. यात आहारामध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि मिनरल्ससह इतर अनेक पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश असायला हवा. शिवाय नियमित योगा, व्यायाम, हलका आणि सकस आहार या सवयी अंगवळणी लावून घ्यायला हव्या.
याशिवाय वजन कमी करण्यासाठी तुम्ही पौष्टिक तितकाच चविष्ट लाडूदेखील आहारात घेऊ शकता. होय.. तुम्ही अगदी बरोबर वाचताय. आज आम्ही तुम्हाला एका अश्या लाडूच्या कृतीबाबत सांगणार आहोत ज्यात प्रथिने आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात. इतकेच नव्हे तर हा लाडू नुसता पौष्टिक नाहीये हा… तर तितकाच चविष्ट देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया या लाडूसाठी लागणारे साहित्य आणि कृती –
० साहित्य
– चियाच्या बिया १ वाटी
– लाल भोपळ्याच्या बिया १ वाटी
– टरबूजाच्या बिया १ वाटी
– अंबाडीच्या बिया १ वाटी
– साजूक तूप १/२ वाटी
– प्लेन ओट्स २ वाटी
– खारीक १/४ वाटी
– काजू १/४ वाटी
– बदाम १/४ वाटी
– अंजीर १/४ वाटी
– काळे मनुके १/४ वाटी
– हिरवी वेलची पावडर २ चमचे
– जायफळ पावडर १ चमचा
– गूळ पावडर अर्धी वाटी
० कृती
– एका पॅनमध्ये सर्व बिया भाजून घ्या आणि नंतर थंड होऊ द्या. दुसरीकडे तुपात ओट्स आणि सोबत खारीक व अंजिराचे काप फ्राय करून घ्या आणि ते व्यवस्थित परतल्यावर त्यात काजू, बदाम, काळे मनुका आणि गूळ पावडर घालून हे मिश्रण चांगले मिसळून घ्या आणि नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. यानंतर सर्व बीया मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि ओट्सच्या मिश्रणात मिक्स करा. याचसोबत वेलची, जायफळची पूड घालून मिश्रण व्यवस्थित मिसळा. यानंतर आता लाडू तयार करण्यासाठी हाताला थोडे तूप लावून घ्या यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि लाडू वळणे सोप्पे जाईल. हे लाडू तयार झाल्यानंतर हवा बंद डब्ब्यात ठेवा.
० लाडूतील बियांचे फायदे :-
१) चीयाच्या बिया – या बियांमध्ये प्रथिने , कॅल्शियम, लोह मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे या बियांचे सेवन केल्यास शुगर वाढत नाही. परिणामी हृदयाचे विकार होण्याची शक्यता कमी होते.
२) लाल भोपळ्याच्या बिया – या बियांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराची पचनसंस्था सुरक्षित राहते आणि रोग प्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
३) टरबूजाच्या बिया – टरबुजाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, जिंक आणि लोह असते. त्यामुळे यांचे सेवन हृदय आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत देते आणि पचनसंस्थेचे रक्षण करते.
४) अंबाडीच्या बिया – या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड, प्रथिने, आहारातील फायबर, व्हिटॅमिन बी – ६, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे अंबाडीच्या बिया कोलेस्टेरॉल आणि शुगर नियंत्रित करतात.