नवमातांमध्ये अपुऱ्या दुधाची समस्या; जाणून घ्या कारणे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। नवजात बाळासाठी आईचे दूध हाच आहार असतो. कारण आईच्या दुधामध्ये बाळाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याची क्षमता असते. मात्र बाळाला जर आवश्यकतेइतकं पुरेसं दूध मिळत नसेल तर बाळाचे पोषण अपूर्ण राहते. शिवाय बाळाची रोग प्रतिकारक शक्ती देखील कमकुवत राहते आणि याचा बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासावर परिणाम होतो.
दूध प्यायल्यानंतरही बाळ रडत असेल तर समजून जा कि,आईचे दूध त्याला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे बाळाच्या भुकेइतके आईचे दूध योग्य प्रमाणात तयार होणे गरजेचे असते. मात्र आजकालची जीवनपद्धती पाहता नवमातांमध्ये अपुऱ्या दुधाची समस्या अधिक बळावलेली आहे. याची अनेक विविध कारणे आहेत.
चला तर जाणून घेऊयात अपुऱ्या दुधाची कारणे :-
१) असंतुलित हार्मोन्स – महिलांच्या शरीरात अनेक कारणांमुळे हार्मोन्स असंतुलित होत असतात. विशेषत: गर्भावस्थेत, प्रसूतीनंतर, मासिक पाळी या दरम्यान हार्मोन्स असंतुलित होण्याचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीतही स्तनात दूध कमी तयार होते. बर्याच वेळा हार्मोन्सचे संतुलन नसल्यामुळे, गर्भधारणेच्या वेळी आणि नंतरही बर्याच समस्या उद्भवतात. या असंतुलनामुळे जर दूध कमी तयार होत असेल किंवा तयारच होत नसेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
२) ब्रेस्ट टिश्यूंना सूज येणे – बाळाचा जन्म होताच आईचे दूध तयार होण्यास सुरवात होते. अशा परिस्थितीत लहान बाळाला काही अंतराने दूध पाजावे लागते हे त्याच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. बाळाला दूध न पाजल्याने स्तनांच्या टिश्यूंमध्ये सूज येते. या सूजेमुळेदेखील आईचे दूध तयार होण्यास अढथळा येतो.
३) गर्भनिरोधक औषधांचे सेवन – गर्भनिरोधक औषधांच्या सेवनानेही दुधाचे उत्पादन कमी होते. गर्भनिरोधक गोळ्या किंवा संबंधित औषधे हार्मोन्सचे उत्सर्जन रोखतात. त्याचे मातेच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे बाळ ६ महिन्याचे होईपर्यंत गर्भनिरोधक गोळ्या घेणे हानिकारक असते.
४) रात्री बाळाला दूध न पाजणे – जर रात्री बाळाला दूध पाजले नाही तर दुधाचे उत्पादन कमी होण्यास सुरुवात होते. मुळात, रात्री शरीरात प्रोलॅक्टिनची पातळी वाढते. प्रोलॅक्टिन दूध तयार करण्यासाठी मदतयुक्त असते. त्यामुळे रात्री बाळाला दूध पाजणे आवश्यक आहे. जरी बाळ झोपेत किंवा झोपले असेल तरीही किमान मिनिटभर तरी त्याला दूध पाजावे.