|

कोरोनाच्या हायब्रिड व्हेरिएंटचा धोका; WHO’कडून चौथ्या लाटेसाठी अलर्ट जारी

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एकीकडे कोरोना विषाणू सरताना दिसत असल्यामुळे सर्वत्र पूर्ववत परिस्थिती होऊ घातली आहे. पण हा आनंद क्षणिक आहे का काय..? असेच काहीसे वाटू लागले आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाच्या हायब्रिड व्हेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO – World Health Organization) इशारा दिला आहे. WHO ने दिलेल्या अलर्टनुसार हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक सध्य स्थितीतील व्हेरिएंटचा व्हायरस आहे अशी माहिती मिळत आहे. तसेच तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार हा व्हेरिएंट अधिक लोकांना तीव्रतेने संक्रमित करण्याचा धोका आहे. शिवाय ज्यांनी लस घेतली आहे वा ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा व्यक्तींनादेखील या व्हेरियंटचा धोका आहे असेही सांगण्यात आले आहे.

WHO

० काय सांगतात तज्ञ..?

तज्ञांच्या निकषानुसार, या हायब्रिड व्हेरिएंटचे अतिशय बारकाईने निरीक्षण करणे फार गरजेचे आहे. अशा व्हेरिएंटमध्ये धोकादायक मानल्या जाणार्‍या डेल्टा आणि ओमिक्रॉन अशा दोन्ही भयानक व्हेरियंटची प्रमुख लक्षणे आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायल यांसारख्या देशांमध्ये कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आधीच्या व्हेरिएंटच्या रुग्णांप्रमाणेच समोर आले आहेत. मात्र, अजूनपर्यंत भारतात याचं कोणतंही प्रकरण समोर आलेलं नाही.

० या दरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्सेस डॉक्टरांनी आपले मत प्रकट केले आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोनाच्या रुग्णांकडून घेतलेल्या नमुन्यांची जीनोम सिक्वेसिंग केली जात आहे. शिवाय आमच्या व्हायरोलॉजी लॅबमधील जीनोम सिक्वेन्सिंगच्या आलेल्या निकालांवरून जे समोर आलं आहे ते म्हणजे, सध्या संसर्ग होण्यास कारणीभूत असलेले सुमारे ९८% व्हेरिएंट हे BA.2 आहेत. तर उर्वरित बाकी सर्व BA1 अशा प्रकारात आहेत. हे दोन्ही प्रकार ओमायक्रॉनचे व्हेरिएंट आहेत हे आधीच सिद्ध झालं आहे.

० जगभरातील संशोधक, तज्ञ, विषाणू विश्लेषक आणि डॉक्टरांनी म्हटलं आहे की, यावेळी कोणताही बेजबाबदारपणा करू नये. नवीन व्हेरिएंट वेळेवर शोधण्यासाठी त्याची माहिती सतत आणि वेगाने घेत राहणे आवश्यक आहे. कारण यामुळे कोरोनाच्या व्हायरसची चौथी लाट येऊ शकते. परिणामी जगभरात पुन्हा चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झालेले दिसू शकते.