दैनंदिन आहारात करा खपली गव्हाचा वापर; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन आहारात डाळ, भात, भाजी आणि चपाती हे पदार्थ असतातच. यातील चपाती गहू या धान्याच्या पिठापासून तयार होते. अनेक लोक पॉलिश गव्हाचे पीठ वापरतात मात्र त्यापेक्षा खपली गव्हाचे पीठ आरोग्यास अतिशय फायदे देणारे आहे. विशेष म्हणजे खपली गहू ग्लुटेन फ्री असल्यामुळे मधुमेही आणि ग्लुटेनची अॅलर्जी असलेले लोक विना चिंता खाऊ शकतात. काही काळापूर्वी ग्लुटेनमुळे आहारातून गहू कमी केल्याचे दिसून येत असताना पुन्हा एकदा खपली गव्हामुळे अनेकांना गव्हाच्या पोळ्या, खीर, लापशी खाण्याचा आनंद घेता येत आहे.
खपली गव्हाच्या चपात्या आणि पुरणपोळ्या अत्यंत चवीला असतात. मात्र त्या शुभ्र दिसत नाहीत. कारण, खपली गव्हात फायबर्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे, त्या थोड्या काळसर आणि जाड होतात. पण तितक्याच चविष्ट आणि आरोग्यास लाभदायक असतात. म्हणून चला जाणून घेऊयात खपली गहू खाण्याचे फायदे काय आहेत ते.
० खपली गहू खाण्याचे फायदे
१) रोग प्रतिकार शक्तीत वाढ – खपली गव्हातील कार्ब्समुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे वाढत्या वयातील मुले, आजारी व्यक्ती आणि घरातील वृद्धांच्या आहारात खपली गव्हाचा समावेश असावा.
२) ग्लूटेनमूळे होणाऱ्या त्रासाची शक्यता कमी – खपली गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण नगण्य असते. त्यामुळे ज्यांना ग्लुटेनमुळे गहू खाल्यास त्रास होतो, अशा लोकांनी खपली गव्हाचा आहारात समावेश करण्यास काहीच हरकत नाही.
३) रक्तातील साखर पातळीवर नियंत्रण – काही संशोधनानूसार, खपली गहू खाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहींसाठी खपली गहू खाणे नक्कीच फायदेशीर आहे.
४) कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित – खपली गव्हामध्ये मॅग्नेशिअम, लोह आणि इतर पोषक घटक समाविष्ट असतात. त्यामुळे खपली गव्हाचे सेवन कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवते.
५) हृदयरोगाची शक्यता कमी – खपली गव्हामुळे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्ऱॉल कमी होते. त्यामुळे ह्रदयरोग असलेल्या लोकांसाठी खपली गहू खूप लाभदायक ठरू शकतो. शिवाय हृदयरोग होण्याची शक्यताही कमी होते.
६) गर्भवती महिलांसाठी लाभदायक – गरोदर महिला आणि बाळंपणानंतर महिलांच्या आहारात खपली गव्हाचा समावेश असणे अत्यंत फायदेशीर असते त्यामुळे ते गरजेचे आहे. कारण खपली गव्हात अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे गरोदर महिला आणि नवमातांचे योग्यरीतीने पोषण होते.
७) वाढते वजन नियंत्रण – खपली गव्हामध्ये इतर गव्हाच्या तुलनेत दुप्पट प्रोटिन्स आणि दुप्पट फायबर्स असतात. त्यामुळे तुमची भूक भागते आणि लवकर भूक लागत नाही. परिणामी तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.