|

कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाचा शोध घेणारे ‘Genome Sequencing’ आहे तरी काय?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येक व्हायरसची स्वतःची अशी जनुकीय संरचना असते. हि संरचना इतर व्हायरसपेक्षा निश्चितच वेगळी असते. व्हायरसची जनुकीय संरचना कशी आहे याचा नेमका शोध घेणं म्हणजे ‘जिनोम सिक्वेंसिंग’ (Genome Sequencing). तज्ञ सांगतात कि, प्रत्येक व्हायरसचा स्वतःचा असा DNA वा RNA कोड असतो. A, T, G आणि C या न्यूक्लिओ टाइड्सने व्हायरसची संरचना ओळखली जाते आणि यानंतर नमूद केली जाते. व्हायरसच्या संरचनेत कोणताही मोठा बदल झाल्यास संबंधित व्हायरसचा नवा ‘स्ट्रेन’ तयार होतो.

वैद्यकीय भाषेत सांगायचे तर, “व्हायरसचा विशिष्ट एक जनुकीय कोड असतो. दरम्यान व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरताना ही जनुकीय संरचना सतत बदलते. काहीकदा व्हायरसचा व्यवहार बदलतो आणि संसर्ग होण्याची क्षमता कमी-जास्त होते. दरम्यान व्हायरसच्या संरचनेत कोणताही मोठा बदल झाला आहे का नाही हे समजणे गरजेचे असते. याचसाठी ‘जिनोम सिक्वेंसिंग’चा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊयात ‘जिनोम सिक्वेंसिंग’चे फायदे आणि ‘जिनोम सिक्वेंसिंग’ कुणाची करणे आवश्यक आहे? खालीलप्रमाणे:-

० ‘जिनोम सिक्वेंसिंग’चे फायदे काय?
– केंद्र सरकारच्या ‘काउंसिल ऑफ साइंटिफीक आणि इंडस्ट्रीयल रिसर्च’चे (CSIR) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी सांगितल्याप्रमाणे, “व्हायरस म्युटेट झाला आहे का नाही. हे जिनोम सिक्वेंसिंग केल्यानंतर समजते. यामुळे व्हायरस कुठे आणि कसा पसरतोय याची माहिती मिळण्यास मदत होते.” यानुसार तज्ञांनी ‘जिनोम सिक्वेंसिंग’चे फायदे सांगितले आहेत खालीलप्रमाणे:-

१) व्हायरसच्या फैलावाची माहिती मिळते.

२) व्हायरसचा प्रसार कुठून कुठे जातोय हे समजते.

३) व्हायरसवर उपलब्ध असलेली लस प्रभावी आहे का हे शोधण्यासाठी मोलाची मदत होते.

४) नव्या व्हायरसचा ‘स्ट्रेन’ मनुष्याला संसर्ग करू शकतो का? याबद्दल संशोधन करण्यासाठी सहाय्यक ठरते.

५) नवीन व्हायरस ओळखण्यासाठी याचा अतिशय फायदा होतो.

 

० ‘जिनोम सिक्वेंसिंग’ची गरज काय?
– ‘जिनोम सिक्वेंसिंग’ची गरज आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला असता तज्ञ सांगतात कि, जिनोम सर्व्हेलन्सची खूप जास्त गरज आहे. कारण व्हायरसमध्ये म्युटेशन सतत होत असतात. अशावेळी जिनोम सिक्वेंसिंग करून आपल्याला लक्ष ठेवता येत. दरम्यान नवीन स्ट्रेन आला आहे का? तो पसरतोय का? याची माहिती ‘जिनोम सिक्वेंसिंग’च्या माध्यमातून आपल्याला अगदी सहज उपलब्ध होते.

 

कोणाची करणार ‘जिनोम सिक्वेंसिंग’?
– देशात नवा व्हायरस आला आहे का हे ओळखण्यासाठी ‘जिनोम सिक्वेंसिंग’ प्रभावी आहे. सध्या देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची चर्चा असल्यामुळे खालील व्यक्तींची ‘जिनोम सिक्वेंसिंग’ केली जाईल असे तज्ञांनी सांगितले आहे. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमधील ठराविक टक्के रुग्ण.

२) परदेशातून येणारे १००% पॉझिटिव्ह प्रवासी.

३) कोरोनातुन बरे झाल्यानंतर पुन्हा संसर्ग झालेले रुग्ण.

४) लसींच्या चाचणी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या व्यक्ती.