|

अल्झायमर(स्मृतिभ्रंश) म्हणजे काय? ‘हि’ आहेत कारणे आणि लक्षणे (पूर्वार्ध)

हॅलो आरोग्य ऑनलाईन : स्मृतिभ्रंश म्हणजेच  ‘डिमेन्शिया’ हा वयानुसार येणारा आजार आहे. या आजारात रुग्णाचा जेवढा कस लागतो, तेवढाच कस त्यांचा सांभाळ करणाऱ्यांचा लागतो. डिमेन्शिया आजार बरा होऊ शकतो व तो टाळलाही येऊ शकतो. या आजाराची लक्षणे अन् उपचार पद्धती बरोबरच रुग्णाला कसे हाताळावे हेदेखील समजून घ्यायला हवे.

अल्झायमर म्हणजे काय?

या आजाराविषयी थोडं जाणून घेऊया. अल्झायमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे. साठ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींना अल्झायमर होतो. अल्झायमर हा डिमेंशिया या सिंड्रोमचा एक प्रकार आहे. डिमेंशियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र, या सगळ्या प्रकारांमध्ये व्यक्तीच्या स्मृतीवर (Memory) परिणाम होतो. मराठीतत याला स्मृतीभ्रंश म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर विसरभोळेपणा.

1906 साली डॉक्टर अल्झायमर यांनी सर्वात आधी या आजाराविषयी सांगितलं. त्यामुळे याला अल्झायमर असं नाव देण्यात आलं. बोलणे, ऐकणे, वास घेणे, हात हलवणे, चालणे, जेवण करणे, स्वच्छेतेच्या क्रिया हे सगळं मेंदुतल्या काही पॉईंट्समधून नियंत्रित होत असतं. अशा वेगवेगळ्या पॉईंट्सना जेव्हा इजा होते तेव्हा शरीरातल्या संबंधित अवयवापर्यंत सूचना पोहोचत नाही आणि ती क्रिया बंद पडते किंवा ती क्रिया आपण विसरतो.

उदाहरणार्थ अल्झायमरचा रुग्ण ब्रश करणे, स्वच्छतेच्या क्रिया करणे, हेसुद्धा विसरतो. इतकंच नाहीतर तोंडात घास टाकल्यावर तो गिळायलाही विसरतो. 80 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या 50 टक्के व्यक्तींना डिमेंशिया होण्याची शक्यता असते. सध्या भारतात 43-50 लाख डिमेंशियाचे रुग्‌ण आहेत. सामाजिक, आर्थिक, धार्मिक सांस्कृतिक असं कुठलंही बंधन या आजाराला नाही. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अशा कुणालाही हा आजार होऊ शकतो.

मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट या रोगाचं निदान करतात. आजाराचं निदान करण्यासाठी एक प्रश्नावली असते. त्या प्रश्नाची उत्तरं घेतली जातात. त्यावरून एखाद्याला डिमेंशिया आहे का, हे शोधता येतं. याशिवया, MRI करूनही या आजाराचं निदान करतात.

का होतो अल्झायमर?

अल्झायमरची अनेक कारणं आहे. कुठल्याही एका कारणामुळेच तो होतो, असं नाही. काही कारणं खालीलप्रमाणे आहेत.

  • वय : 60 वर्षांपेक्षा जास्त वय, हे डिमेंशियाचं कारण असू शकतं.
  • समाजापासून दुरावणे : लोकांमधली उठबस, संवाद कमी होणे किंवा इतर निवृत्ती, शहर किंवा देश बदलणे, यासारख्या कारणांमुळे आलेला एकटेपणा यामुळेही अल्झायमर होऊ शकतो.
  • हृदयाशीसंबंधित आजार : मधुमेह, रक्तदाब यासारख्या हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.
  • ब-जीवनसत्त्वाची कमतरता : डॉक्टर सांगतात भारतात बहुतांश शाकाहारी खाद्यसंस्कृती आहे. त्यामुळे आपल्या जेवणात ब जीवनसत्त्वाची कमतरता असते. विशेषत महिलांमध्ये आणि अल्झायमर होण्याचं हेदेखील एक कारण आहे.

अल्झायमरचे टप्पे

अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण, काही औषधं आणि उपचारांच्या माध्यमातून आजार स्थिर ठेवता येतो. म्हणजे तो वाढत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजमध्येच रुग्णाला योग्य उपचार मिळाले तर रुग्णाला 10-15 वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ सामान्य आयुष्य घालवता येतं. अल्झायमरमध्ये जसजसं वय वाढतं तसा मेंदूचा आकार लहान होत जातो. मेंदुतल्या वळ्या कमी होत जातात. यामुळे विसरभोळेपणा येतो. अल्झायमर झालेल्या व्यक्तींना काही तासांपूर्वी घडलेल्या गोष्टींचा विसर पडतो. या आजाराच्याही काही स्टेजेस असतात.

मात्र, काही रुग्णांमध्ये याआधीही काही लक्षणं दिसतात. विनाकारण चिडचिडण होणे, गाढ आणि शांत झोप न लागणे, कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटणे, नैराश्य येणे, अतीविचार करणे हीदेखील अल्झायमर किंवा डिमेंशियाची अतिशय सुरुवातीची लक्षणं असू शकतात. मात्र, ही प्रत्येकच रुग्णामध्ये दिसतीलच असं नाही.

गाडी चालवणे, कपडे घालणे यासारख्या गोष्टी ज्यात एकानंतर दुसरी क्रिया एका विशिष्ट क्रमाने कराव्या लागतात, त्या त्यांना जमत नाही. या पुढचा टप्पा म्हणजे रुग्ण घराच्याच व्यक्तींना ओळखत नाही किंवा ओळखलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ओळखतात. चेहरा बघून आपण या व्यक्तीला ओळखतो असं त्यांना वाटतं. पण नाव आठवत नाही. घरचा पत्ता आठवत नाही. पाठ असलेले मोबाईल नंबर आठवत नाही. या स्टेजपर्यंत उपचार मिळाले नाही तर रुग्णांना दिवस आहे की रात्र, तारीख, महिना, वर्ष हेसुद्धा लक्षात राहत नाही.

डिमेंशियाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णाची चिडचिड वाढते, तो कपडे घालायला विसरतो आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तो पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहतो. म्हणजे घरचा पत्ता आठवत नाही, त्यामुळे एकट्याने घराबाहेर पडता येत नाही. आंघोळ कशी करायची, आधी साबण लावायचा की पाणी हेही विसरतो. त्यामुळे आंघोळ घालावी लागते. आता टॉयलेटला जायचं आहे, याची सूचना मेंदूकडून मिळत नाही. त्यामुळे कुठेही सू-शी होते. अशावेळी डायपर वापरावे लागतात. स्मृतीभ्रंशाच्या या स्टेजेस असल्या तरी याच क्रमाने प्रत्येक रुग्णाला त्रास होतो, असं नाही. अनेक रुग्ण कित्येक वर्ष पहिल्या स्टेजमध्येच असतात. तर काही रुग्णांमध्ये चार महिन्यातच त्रास वाढतो.

डॉक्टरांकडे कधी जायचं?

याआधी सांगितल्याप्रमाणे हा ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आहे. तेव्हा डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकाना दर सहा महिन्यांनी ब्लड टेस्ट करायला हवी. रुटीन चेकअप करायला हवं. यात लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी यांची टेस्ट करायला हवी. मात्र, काही गोष्टी अशा आहेत की ज्या जाणवल्यावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे.

  • लहान-लहान गोष्टींचा विसर पडत असेल. उदाहरणार्थ 1000 लिहिताना एकावर किती शून्य लिहायचे ते विसरणे. लोकांची नावं विसरणे. कुलुपाची नेमकी किल्ली कोणती, ते विसरणे, गाडीची चावी फ्रिजमध्ये ठेवणे.
  • कारण नसताना सारखी चिडचिड होत असेल.
  • कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटता नैराश्य येत असेल. कुठल्याही कामात सहभागी होण्याची इच्छा होत नसेल.

अशी काही लक्षणं असल्यावर डॉक्टरांची मदत नक्की घ्यावी. यापैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणं असल्यावर तो डिमेंशिया किंवा अल्झायमर असेलच असं नाही.कदाचित काही मानसिक ताण किंवा इतरही आजार असू शकतात. मात्र, त्याच योग्य निदान डॉक्टरांकडे गेल्यावरच होऊ शकतं. त्यामुळे एखादी गोष्ट क्षुल्लक आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.