‘केसतोड’ म्हणजे काय?; जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। केसतोड हा शब्द तुम्ही अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकला असेल. पण केसतोड म्हणजे नक्की काय असा सवाल अनेकांच्या मनात आजही घोळत असेल. तर मित्रांनो अनेकदा आपल्या शरीरावर एक असा फोड तयार होतो जो अतिशय वेदनादायी असतो. दिसताना साधी पुळी दिसणारा हा फोड हळूहळू मोठा होतो आणि यात पू अर्थात पांढऱ्या रंगाचे द्रव्य साठू लागते. यालाच आपण ‘केसतोड’ म्हणतो. बऱ्याचदा केसतोड अनेकांना माहित नसतो. यामुळे साधी पुरळ समजून याकडे दुर्लक्ष केला जातो. पण याचे दुखणे वाढले का मग हा उपाय आणि तो उपाय अशी चलबिचल सुरु होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि, केसतोड का होतात आणि यावर नेमके काय उपाय करावे. यामुळे अनेकांना अगदी घरच्या घरी या वेदनेच्या मुळावर तोड काढणे सोप्पे जाईल. चला तर जाणून घेऊयात केसतोड म्हणजे नक्की काय आणि त्यावर कोणते उपाय करावे ते खालीलप्रमाणे:-
० ‘केसतोड’ म्हणजे काय?
– आपल्या शरीरावर अनेक केस असतात. यापैकी एखादा केस मुळापासून बाहेर येताना तुटला वा ओढला जाऊन दुखावला की, केसतोड येतो. मुळात केसांना दुखापत झाल्यामुळे तो भाग लाल होतो आणि केसांच्या ग्रंथीना त्रास झाल्यामुळे त्या ठिकाणी पुळी येते. ही पुळी साधी दिसत असली तरी यामध्ये पू साचतो. त्यामुळे तो भाग दुखू लागतो. शरीराच्या ज्या ज्या भागांवर केस आहेत. त्यासगळ्या ठिकाणी केसतोड होण्याची शक्यता असते आणि याकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते. कारण काही काळ जरी तो फोड लाल रंगाचा आणि लहान वाटत असला तरी नंतर पू साचून तो मोठा आणि त्रासदायक होण्याची शक्यता असते.
० केसतोड होण्याची कारणे
१) अस्वच्छता – केस तुटणे हे केसतोड येण्याचे कारण असले तरीही केसतोड झाल्यानंतर फोड येण्यासाठी आपली शारीरिक अस्वच्छता जबाबदार असते. आपल्या त्वचेवर असणारे बॅक्टेरिया यासाठी कारणीभूत असतात. ‘स्टेफिलियोकोकस ऑरियस’ नावाचा बॅक्टेरीया आपल्या त्वचेवर असतो. आपल्याला एखादी दुखापत झाल्यानंतर हा बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि केसतोड होतो.
२) मधुमेह – मधुमेहींना एखादी जखम झाली की, ती बरी होण्यासाठी बराच वेळ लागतो. यामुळे शेव्हिंग करताना वा शरीरावरील केस काढताना केसांच्या मुळाला दुखापत झालया तेथे फोड येऊ शकतो. मुळात मधुमेहींची जखम लवकर बरी होण्याची शक्यता कमी असते. त्यात केसतोड आल्यास त्याचा त्रास असह्य होतो.
३) केमिकल्सचा अतिवापर – आपल्या शरीरावर अनेक बारीक बारीक छिद्र असतात. यातील केसांची मूळ नाजूक असतात. यांवर सतत केमिकल्सयुक्त प्रसाधनांचा वापर केल्यास फोड येण्याची शक्यता असते. घामाचा वास येऊ नये म्हणून काखेत डिओ स्प्रे मारल्यास तो घामासोबत अनेकदा उघड्या छिद्रांमधून शरीराच्या आत जातो. यातील केमिकल केसांच्या मुळांशी जाऊन संक्रमित होते आणि केसतोड येतात.
४) चुकीचे खाणे – चुकीच्या खाण्यामुळे त्वचेवर पिंपल्स येणे हे अगदीच सामान्य आहे. पण कधी कधी चेहऱ्यावरच नाही तर शरीराच्या इतर भागांवरही आपल्याला पिंपल्स येतात. हा फोड केसांमधूनच येतो. अर्थात त्वचेच्या आत असलेल्या केसांमध्ये असलेल्या तैल ग्रंथीतून याचा स्राव होतो. त्यामुळे चुकीचा आहार, आहार घेण्याच्या चुकीच्या वेळा क्सतोड्यास कारणीभूत आहेत हे सिद्ध होते.
४) केस काढण्याच्या चुकीच्या पद्धती – केसतोडीचे मुख्य कारण म्हणजे केसांचे मुळ दुखावणे. आजकाल शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी लेझर, वॅक्स असे प्रकार त्वचेवर केले जातात. यामुळे अनेकदा केसांच्या मुळांना धक्का बसतो. शिवाय केस काढण्याची पद्धत आपल्या त्वचेस लाभदायक नसेल तर केसतोड येण्याची शक्यता बळावते.
० केसतोड’वर उपाय:-
१) हळद – प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात हमखास सापडणारी हडळ केसतोडीवर परिणामकारक असे औषध आहे. केसतोडीचे दुखणे असह्य असते. अनेकदा केसतोड आल्यास त्या भागावर सूज येते आणि त्रास होऊ लागतो. तर यासाठी हळद गुणकारी आहे. केसतोड आल्यास त्या भागावर चिमूटभर हळदीमध्ये तोडीस पाणी मिसळून त्याच जाडसर पेस्ट लावा. यामुळे सूज उतरते आणि त्रास कमी होतो.
२) कांदा – काही लोक सोडल्यास बहुतेक सगळ्यांच्याच घरात कांदा हा आहारात वापरला जाणारा मुख्य पदार्थ आहे. कारण कांदा बहुगुणीसुद्धा आहे. शिवाय कांदा केसतोडीवर एकदम रामबाण उपाय आहे. कांद्यामध्ये सल्फर, फ्लोवोनाईड्स, अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे केसतोड बरे होण्यास मदत मिळते. यासाठी साधारण अर्धा छोटा कांदा चांगला ठेचून त्याची बारीक पेस्ट करुन घ्या. आता हि पेस्ट केसतोड आलेल्या भागाच्या बाजूने लावाला आणि कपड्याने तो बांधून घ्या. कमीत कमी २ तास हा कांदा कपड्याने असाच केसतोडाच्या ठिकाणी बांधून ठेवा. यामुळे केसतोड हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते आणि आराम मिळतो.
३) लसूण – लसूण जितकी आहारात सर्वश्रेष्ठ तितकीच आयुर्वेदामध्येही बहुगुणी औषधी म्हणून मानली जाते. आपल्या दैनंदिन आहारात लसणाचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून सुटका होते. तसेच केसतोडवर लसूण एक रामबाण उपाय आहे. लसूणमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामध्ये सल्फर असते त्यामुळे तुमचे फोड बरे होण्यास मदत मिळते. केसतोड आल्यास लसूण ठेचून केसतोडवर लावा. असे २ ते ३ दिवस सलग केल्यास केसतोड बरी होते.
४) कडूनिंब – कडूनिंबाच्या पानांपासून अगदी देठांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म समाविष्ट असतात. ज्यामुळे वेगवेगळ्या अॅलर्जी पासून बचाव करण्यासाठी कडुनिंब प्रभावी आहे. कडूनिंब आपल्या शरीरावरील केसतोड मुळातून आणि कुठल्याही प्रादुर्भावाशिवाय काढून टाकण्यास सक्षम आहे. यासाठी आपल्याला मुठभर कडूनिंबाच्या पानाचा लेप केसतोडवर लावायचा आहे आणि तो असाच एका कापडाने बांधून तासभर ठेवायचा आहे. यामुळे निश्चितच फायदा दिसून येईल.
५) मेहंदी – केसतोड आल्यास संबंधित भागात होणारी जळजळ थांबविण्यासाठी मेहंदीची पाने किंवा मेहंदीचा कोण वापरला तरीही चालेल. मेहंदी स्वभावाने थंड असल्याने ती पाण्यात कालवून केसतोडच्या बाजूला लावल्यास त्रास कमी होतो.
६) जास्वंदाची पाने – जास्वंदाची पानेही तुमच्या केसतोडीवर चांगले काम करतात. रक्त पुरवठा सुरळीत करण्यासाठी जास्वंदाची पाने चांगली असतात. जास्वंदाची पाने घेऊन ती छान कुटून घ्या. जास्वंदाची पाने तुम्ही केसतोडीवर लावा. जर तुमच्या केसतोडीमध्ये पू असेल तर तो निघण्यास मदत मिळते.
७) कोरफडीचा गर – कोरफडीचा गर हा अँटिफ्लेमेटरी असतो. तुमच्या केसतोडीची जळजळ त्यामुळे कमी होते. बाजारात मिळणाऱ्या कोरफडीचा गर लावल्यामुळे केसतोडीची जळजळ कमी होते. तुम्हाला थंडावा मिळतो. त्यामुळे तुम्ही अॅलोवेरा जेलचा वापर करायला विसरु नका.