|

कोरोना काळात  फुफ्फुसांचं आरोग्य तपासण्यासाठीची ‘6 मिनिट वॉक टेस्ट’ काय आहे? काय आहेत तिचे फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन : देशभरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, ‘6 मिनिट वॉक टेस्ट’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. कोव्हिड-19 देशभरात त्सुनामीसारखा पसरतोय. एका दिवसातच 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने, देशभरात हाहा:कार उडालाय. कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंबच्या-कुटुंब बाधित होत आहेत. प्रत्येकाच्या मनात मला कोरोना संसर्ग होईल, किंवा झाला असेल ही भीती घर करून बसलीये. बाजूला जरा कोणी खोकलं किंवा शिंकलं तर, लगेच आपण त्या व्यक्तीकडे संशयानं पहातो. त्या व्यक्तीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना सारखं वाटतं मला दम लागतोय. खोकला नाहीये, पण बेचैन वाटतंय. सतत एक भीती मनात रहाते, मला कोरोनासंसर्ग तर झाला नाही?

तुमच्यासोबत कधी असं घडलंय? हो ना! तुम्ही असा विचार नक्कीच केला असेल. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ‘6 मिनिट वॉक टेस्ट’ ही तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचं सोपं उत्तर आहे.

‘6 मिनिट वॉक टेस्ट’ काय आहे?

कोरोनाव्हायरस फुफ्फुसांवर आघात करतो. ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. कोव्हिड-19 संसर्ग झाल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते, असं तज्ज्ञ सांगतात.

चाचणी कोणी करावी?

  • ताप, सर्दी, खोकला अथवा करोनोची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती
  • ‘होम आयसोलेशन’मधील रुग्ण

आवश्यक साहित्य

  • घड्याळ / स्टॉपवॉच (मोबाइल फोन)
  • पल्स ऑक्सिमीटर

चाचणी कशी करावी?

  • ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावा. त्यावरील ऑक्सिजनची नोंद करा.
  • ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये; तर मध्यम वेगात चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी.

चाचणी कोठे करावी?

  • ही चाचणी कोणत्याही कडक जमिनीवर किंवा पृष्ठभागावरच केली जावी.
  • ज्या जमिनीवर चालणार आहात त्या जमिनीवर चढ उतार नसावेत. पायऱ्यांवर ही चाचणी केली जाऊ शकत नाही.
  • घरातील कडक फरशीवर चालणे कधीही चांगले.
  • चालण्यासाठी जास्तीत जास्त रिकाम्या जागा असलेल्या ठिकाणी ही चाचणी करावी.

असे असल्यास काळजीचे कारण नाही

  • सहा मिनिटे चालूनही रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत नसेल; तर तब्येत उत्तम आहे असे समजावे.
  • समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल; तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का, ते लक्षात येईल.

तर रुग्णालयात दाखल करावे

  • सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी होत असेल तर…
  • चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल तर…
  • सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल, तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे.
  • ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो, त्यांनी ही चाचणी करू नये. ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.

सहा मिनिटे चालण्याच्या चाचणीबाबत अधिक जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल. जेणेकरून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल.