नवजात बाळाचे वजन वाढत नसेल तर काय करावे?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे वजन काहीसे कमी असते. अश्या बाळाला जन्मतः काही आजार असण्याची वा त्यांची रोगप्रतिकार क्षमता कमकुवत असण्याची शक्यता असते. यामुळे नवजात शिशुचे वजन कमी असेल तर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. अनेकदा स्त्रिया बाळाचे वजन कमी भरल्यास घाबरून जातात. तर अशा मातांना आम्ही सांगू इच्छितो कि, बाळाचे वजन वाढविण्यासाठी आईचे दूध हाचं एकमेव आणि सर्वोत्तम असा पर्याय आहे. कारण नवजात बाळ हे पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असते. यामुळे नवजात बाळाचे वजन वाढवण्यासाठी प्रत्येक २ तासांनी आपल्या बाळास मातांनी स्तनपान करावे. यामागे मुख्य कारण असे कि, आईच्या दुधात सर्व पोषक घटक आणि खनिजतत्वे असतात, जी बाळाच्या चांगल्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे बाळाला दूध पाजताना काय काळजी घ्यावी आणि बाळ दूध पित नसेल तर त्याचे वजन कसे वाढवावे हे जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
० बाळाला स्तनपान करताना काय काळजी घ्याल?
– बाळाला दूध पाजताना दोन्ही बाजूच्या स्तनांचे दूध पाजावे.
– एका बाजूचे दूध पाजताना ते संपूर्ण दूध प्यायल्यावरच दुसऱ्या बाजूला दूध पाजावे. याचे कारण असे कि, सुरुवातीस येणारे दूध हे पाण्यासारखे पातळ येते. हे दूध बाळाची तहान भागविते व नंतरचे दूध दाट (हाईड मिल्क) येते. हे दूध बाळाची भूक भागविण्यासोबतच बाळाला योग्य पोषण देते.
– परंतु, आईने बाळाला दूध पाजण्यास सुरुवात केल्यावर एका बाजूकडून लगेचच दुसऱ्या बाजूला बाळाला दूध पाजले तर बाळाला केवळ पाण्यासारखे दूध (फोअर मिल्क) मिळते. या दुधामुळे त्याची तहान भागते. पण भूक भागत नाही. यामुळे बाळ सारखे रडत राहते. तसेच या दुधातून बाळाला आवश्यक असणारे पोषक घटक मिळत नाहीत. परिणामी त्याचे योग्यप्रकारे वजनही वाढत नाही. यासाठी बाळाला दूध पाजताना एकावेळी एका बाजूच्या स्तनानेच दूध पाजले पाहिजे.
० नवजात बाळ आईचे दूध पित नसेल तर काय करावे?
– जर नवजात बाळ वेळेपूर्वी जन्मलेले असेल तर काहीवेळा अशी बालके आईचे दूध पिण्यास असमर्थ असतात. अशावेळी आपण स्तनपंप मशीनद्वारे आपले दूध काढून ते चमच्याच्या सहाय्याने आपल्या बाळास पाजावे.
– तसेच काही कारणांमुळे नवजात बाळांना आईचे दूध मिळत नाही. अशावेळी, डॉक्टर आपल्या बाळासाठी योग्य ते फॉर्म्युला दूध देण्यास सांगू शकतात. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या बाळास दूध पाजा.
– या दोन्ही स्थितींमध्ये बाळास दर २ तासांनी पंपाने काढलेले दूध वा तयार केलेले फॉर्म्युला दूध पाजल्यामुळे बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढण्यास मदत होईल.