काश्याच्या वाटीने पायाला मसाज का करावा?; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। दगदगीचे जीवन जणू हाच काय तो दिनक्रम. अश्या पद्धतीची काहीशी दिनचर्या आजकाल प्रत्येकाची पाहायला मिळते. मग काय कधी एकदा काम संपतं ,आपण घरी जातो आणि अंथरुणात पडतो, असे ज्याला त्याला वाटत असते. दिवसभराच्या धावपळीमुळे जणू शरीरातील त्राणच निघून जातो. मग अश्यावेळी शारिरीक थकवा कमी करण्यासाठी आपण स्पा सेंटर किंवा मग मसाज पार्लरमध्ये खर्चिक अपॉईन्टमेंट घेतो आणि वेळेसोबत रग्गड पैसे खर्च करतो. यानंतर पुन्हा काही दिवसांनी तेच. पण जर हि थेरेपी घरच्या घरीच केली तर? अर्थात आयुर्वेदाने दिलेल्या ‘पादाभ्यंग’ या सहज सोप्या उपचार पद्धतीचा वापर करून आपण मानसिक ताण आणि तणावावर मात करू शकतो. पण हि थेरेपी करायची कशी असा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल तर यासाठी पुढे वाचा.
पूर्वी लग्नाच्या आहेरात काश्याची वाटी आवर्जून दिली जायची. यामागे मुख्य कारण म्हणजे आरोग्य. ‘पादाभ्यंग’ याचा मूळ अर्थ आहे पायाला मसाज करणे. यासाठी काश्याच्या वाटीचा वापर केल्यास शारीरिक थकवा आणि मानसिक ताण तणाव दूर होतो. आपल्यापैकी अनेक लोक असे असतील ज्यांना काश्याची वाटी म्हणजे काय हे अद्याप ठाऊक नसेल त्यांच्यासाठी हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. कारण यात आपण जाणून घेणार आहोत, काश्याची वाटी म्हणजे काय? त्याचा कशाप्रकारे वापर करावा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे कोणते. खालीलप्रमाणे :-
० काश्याची वाटी म्हणजे काय?
– कांस्य हा एक मिश्र धातू आहे. जो तांबे आणि जस्त या दोन धातूंच्या मिश्रणापासून तयार होतो. या मिश्रधातूपासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केला जातो. या वाटीला काश्याची वाटी असे म्हणतात. या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
० काश्याच्या वाटीनेच पायांना मसाज का करावा?
– शरीरात उष्णता वाढल्यास आपल्याला अनेको आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळीच उष्णतेवर मात करण्यासाठी काश्याची वाटी फायदेशीर आहे. याशिवाय वाताची समस्या असेल तर त्यासाठी देखील काश्याची वाटी प्रभावी ठरते. मुख्य म्हणजे, वृद्धांनी काश्याच्या वाटीच्या सहाय्याने नियमित पायाला मसाज केल्यास त्यांना वाटपासून त्वरित आराम मिळतो. कारण आयुर्वेदानुसार डोकं, कान आणि पाय या अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते. यावर वेळीच लक्ष न दिल्यास शारीरिक दोष वा इतर आजार बळावण्याची शक्यता असते.
० काश्याच्या वाटीने पायाला मसाज करण्याची योग्य पद्धत तरी काय?
– काश्याच्या वाटीने पायाला मसाज करताना तेल अथवा तूपाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र तूपाऐवजी तीळाच्या कोमट तेलाचा किंवा कोमट खोबरेल तेलाचा वापर केल्यास फायद्याचे ठरते. हे तेल लावताना वाटीचा खालील भाग वापरून एकाच बाजूस गोलाकार फिरवत पायाला मसाज करावा. यामुळे पायाला पडलेल्या भेगा कमी करण्यासाठी मदत होते. शिवाय हा मसाज करण्यासाठी कोकमाचे तेलदेखील फायदेशीर ठरते.
० काश्याच्या वाटीने पायाला मसाज केल्यास कोणते फायदे होतात?
१) काश्याच्या वाटीने पायाला मसाज केल्यास वाताचा त्रास कमी होतो.
२) पायाच्या तळव्याला भेगा पडणे, पायात आग / जळजळ जाणवणे अशा समस्या कमी होतात.
३) शरीरातील रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचे एक टोक पायापाशी असते. तुला,उले काश्याच्या वतीने पायाला मसाज केल्यानंतर शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते आणि शरीरात थंडावा वाढतो.
४) डोळ्यांचे आरोग्य देखील पायांशी संबंधित असते. डोळ्यांच्या स्नायूंना पायाच्या नसांकडून चालना मिळत असते. त्यामुळे पायाला मसाज करणं फायदेशीर ठरत.
५) काश्याच्या वाटीच्या साहाय्याने मसाज केल्यास त्वचेतील शुष्कता कमी होऊन मुलायमपणा वाढतो.
६) पायांना मसाज केल्याने निद्रानाशाची समस्या नियंत्रणात येते आणि शांत झोप लागते.
० महत्वाची टीप – रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास शरीरात थंडावा निर्माण होतो. परिणामी शांत झोप मिळण्यास मदत होते. याशिवाय सकाळी आंघोळीपूर्वी अर्धा तास मसाज केल्यासही फायदेशीर ठरते.