| |

जागतिक मधुमेह दिन विशेष – मधुमेहाने बिघडते मनस्वास्थ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मधुमेह हि एक अशी समस्या आहे ज्यात आपल्या शरीरातील रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. अनेकांना अनुवंशिकता नसतानादेखील मधुमेह होतो. याचं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव, अति प्रमाणात साखरयुक्त व स्निग्ध पदार्थांचं सेवन आणि वाढलेला ताणतणाव अर्थातच महत्वाचे म्हणजे हरवलेले मानसिक स्वास्थ. होय. म्हणून जागतिक मधुमेह दिन विशेष या लेखात आपण मधुमेहामुळे मनस्वास्थ कसे बिघडते हे वैद्य अविनाश काशीद यांच्यामार्फत जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात काय सांगतात तज्ञ खालीलप्रमाणे:-

दरवर्षी १४ नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन पाळण्यात येतो. जगात मधुमेहींचा संख्या झपाट्याने वाढतेय. यामुळे मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका वाढला आहे. सुखासीन जीवनशैली, बैठे काम,व्यायामाचा अभाव, जंक फूड, हरवलेले मानसिक स्वास्थ यासारख्या सवयी मधुमेहाला निमंत्रण देतात. यामुळे मधुमेहाची लक्षणे ओळखून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे कोणताही रोग मनशांती घालवतो व मानसिक स्वास्थ बिघडवतो.

 

० मनःशांती कशासाठी ?
– मन व मधुमेह यांचा फार जवळचा संबंध असतो. मन विचलित असेल व त्यावरचा ताण दीर्घकाळ चालु राहिला तर सुप्तावस्थेतील मधुमेह व्यक्त होतो. तसेच नियंत्रणात असलेला मधुमेह अनियंत्रित होतो. कोणत्याही कारणामुळे अचानक मनावर तीव्र ताण आला तर उपाशी पोटी साखरेचे प्रमाण एकदम खाली जाते तर जेवणानंतर साखर वाढलेली आढळते. अशा अस्थिर साखरेवर नियंत्रण आणणे डॉक्टरांना फार अवघड जाते. मनाची अस्वस्थता रक्तातील साखरेची अस्थिरता निर्माण करते. शरीरातील अंतःस्त्रावी ग्रंथींचा समतोल ढासळल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते.

 

० मनःशांती ढळण्याची प्रमुख कारणे
– मधुमेहामुळे निरनिराळ्या वयात अनेक कारणामुळे मनस्वास्थ बिघडले जाते. बाल, तरुण वा वृध्द मधुमेहींना एखादवेळी भुक आवरत नाही, गोड खाण्याची तीव्र इच्छा होते यामुळे आहारावर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीशी वारंवार वाद निर्माण होतात, बंडखोरी करावी वाटते, बेजबाबदारपणा वाढतो, चोरुन गोड खाण्याची इच्छा बळावते याचा परिणाम मनस्वास्थ बिघडण्यात होतो.

 

० मन स्वास्थासाठी काही प्रमुख उपाय

१) मधुमेह ही आपत्ती न समजता त्याकडे सामंजस्याने पहा.

२) मधुमेहाचे पथ्य पाळणे जाचक वाटत असेल तर तज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्याने त्यात बदल करा.

३) कुटुंबांतील परस्पर सामंजस्य मधुमेह नियंत्रणातील महत्वपूर्ण दुवा आहे. यामुळे मधुमेहींकडून पथ्य पाळले गेले नाही तर, कुटुंबातल्या व्यक्तींनी न रागावता प्रेमाने समजुत घालुन त्यापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करा.

४) डाॅक्टरांनी अनियंत्रित मधुमेहाचे मुळ शोधताना मधुमेहींशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजावुन घ्या.

५) ध्यान धारणा, श्रध्दा, विरंगुळा, छंद, निसर्गाशी जवळीक हे मनशांती मिळवण्यासाठी प्रभावी उपाय आहेत.

६) मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी मनशांतीला आहार, विहार, व्यायाम हे औषधांइतकेच महत्वाचे आहेत.

 

० महत्वाचे –

१) मनः शांती एकट्या मधुमेही रुग्णाने मिळवण्याची गोष्ट नाही त्यामूळे कुटुंब, मित्र, डाॅक्टर यांचाही सहभाग महत्वपूर्ण आहे.

२) आहार, विहार, व्यायाम, व्यवहार, विश्रांती व जागरण यांचे योग्य नियमन केल्यास निश्चितच ताणतणाव कमी होतो. त्याद्वारे उत्तम मानसिक स्वास्थ लाभते.