प्रोटिन सप्लिमेंट्स खाणे कितपत योग्य आहे..?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या शारीरिक सौंदर्याबद्दल अत्यंत जागृक असणे हि आजकालच्या तरुण पिढीबाबतची सगळ्यात सामन्य बाब म्हणून ओळखली जाते. खूप वेळ व्यायाम करणे, जिम करणे, नियमित जॉगिंग करणे, मोजकं खाणे, ठरलेल्या वेळेतच खाणे अशा प्रत्येक गोष्टी अगदी काट्याला काटा लावून करणारी हि मंडळी दिसायला एकदम फिट आणि फाईन दिसतात. पण तरीही यांना किमान एक आजार हा असतोच. असं का बरं..? लोक म्हणतात कि, अरे हा तर किती काळजी घेतो स्वतःची तरीही कसा काय आजारी पडतो..? तर याच उत्तर आहे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक.
होय. तुम्ही पाहिलं असाल हि मंडळी आहारापेक्षा जास्त सप्लिमेंट्सवर जगतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या व्यक्ती विविध प्रकारच्या गोळ्या, प्रोटीन शेक आणि फायबरयुक्त आहार घेण्यात व्यस्त असतात. सतत गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेतल्यामुळे या व्यक्तींचे शरीर केवळ प्रोटीनचा साठा करते ज्यामुळे शरीराला आवश्यक इतर तत्त्वांचा साठा खालावतो. परिणामी या व्यक्ती आजारी पडतात. याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे
० प्रोटीनयुक्त ‘सप्लिमेंट्स’ शरीरोपयोगी आहेत का?
तज्ञ सांगतात कि, जगातील २७% टक्के लोक प्रोटीन बार वा प्रोटीन शेक घेतात. जे लोक आठवड्यात २ वेळा जास्त व्यायाम करतात, त्यांची भर घातली, तर हे प्रमाण ३९% वर जाते. विशेष म्हणजे, व्यायामानंतर प्रोटीन शेक घेतल्याने काय फायदा होतो हे फक्त ६०% लोक जाणतात. व्यायाम करायला लागल्यावर सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रथिनंयुक्त आहार लाभदायक असतो. पण त्यानंतरच्या काळात याचा लाभ होतो का याबद्दल खात्रीशीर सांगता येत नाही.
याचे कारण म्हणजे, व्यायामाची सवय झाल्यावर प्रोटीनयुक्त पदार्थांपासून होणारे लाभ कमी होतात. शिवाय, प्रोटीनयुक्त आहार कर्बोदकांच्या सोबत केला जात असेल, तरच तो उपयोगी असतो. त्यामुळे प्रथिनांचे आहारातील प्रमाण शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी सहायक ठरते पण प्रोटीनयुक्त आहाराची सवय लावून घेऊ नका. कारण क्रीडापटूंना वा जिम करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त प्रथिनांचा लाभ होतो.
सर्वसामान्य पातळीवर जगताना अति प्रथिने शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे प्रोटीन सप्लिमेंट्स प्रत्येक व्यक्तीने खाणे गरजेचे नाही. बहुतांश लोकांना त्यांच्या शारीरिक गरजेपेक्षा जास्तच प्रथिनं खायला मिळतात. त्यामुळे त्यांना सप्लिमेंट्सची अशीही गरज नसते. नेहमीच्या जेवणातून आपल्याला पुरेशी प्रथिनं मिळत असतात. त्यामुळे अधिक मात्रेत प्रोटिन्सची मात्रा वाढवण्याची गरज नाही.