|

(अ) डेंग्यू म्हणजे काय आणि त्याचा प्रसार कसा होतो?; जाणून घ्या लक्षणे 

हॅलो आरोग्य ऑनलाईन। डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चाव्यामुळे हा रोग प्रसारित होतो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५ ते ६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. सर्वसाधारणपणे या रोगाचे दोन प्रकार आहेत.

१) डेंग्यू ताप

२) डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असू शकते. यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

डेंग्यू हा विषाणूजन्य रोग उष्णकटिबंधीय आणि अर्ध- उष्णकटिबंधीय वातावरण असलेल्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो. विशेषतः शहरी आणि निमशहरी भागांत हा रोग मोठ्या प्रमाणावर पसरतो. डेंग्यूच्या संसर्गामुळे सौम्य आजारपण येतं आणि याची लक्षणं अगदी फ्लूसारखी असतात. मात्र काही वेळा या आजाराचे स्वरूप गंभीर झाल्यास मृत्यूही होऊ शकतो. त्याला सीव्हिअर डेंग्यू असं म्हणतात. यावर योग्य वैद्यकीय उपचार झाल्याशिवाय तो नियंत्रणात येत नाही. महत्वाचं म्हणजे डेंग्यू वा सीव्हिअर डेंग्यूसाठी नेमकी अशी ट्रीटमेंट अस्तित्वात नाही. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले कि, डेंग्यूचा संसर्ग झाल्यानंतर त्याची वाटचाल गंभीर अर्थात सीव्हिअर डेंग्यूकडे होत असल्याचे निदान झाल्यास योग्य वैद्यकीय मदत मिळाली, तर मृत्युदर १% खाली येऊ शकतो.

 

० डेंग्यू कसा पसरतो?

– डेंग्यू आजराचा विषाणू हा इडिस एजिप्ती जातीच्या मादी डासाच्या माध्यमातून पसरतो. शिवाय एडिस अल्बोपिक्टस या जातीचे डासदेखील कांही अंशी हा संसर्ग पसरवू शकतात. डासांच्या या प्रजाती चिकनगुनिया, येलो फीव्हर आणि झिका विषाणूदेखील पसरविण्यास सक्षम आहेत.

डेंग्यूच्या विषाणूचे प्रकार आहेत.

DENV-1 

DENV-2 

DENV-3 

DENV-4 

यापैकी कोणत्याही प्रकारचा संसर्ग एखाद्या व्यक्तीला झाला आणि ती व्यक्ती यातून बरी झाली तर पुन्हा संबंधित व्यक्तीस आयुष्यभर  त्याचा संसर्ग होत नाही. मात्र त्या प्रकाराव्यक्तिरिक्त अन्य प्रकारचा संसर्ग होऊ शकतो.

– याशिवाय संसर्ग झालेल्या व्यक्तीला डास चावल्यानंतर दुसऱ्या व्यक्तींना चावले तर डेंग्यूच्या विषाणूचा संसर्ग अगदी सहज होतो. कारण, विषाणूंचं डासाच्या शरीरात पुनरुत्पादन होत असतं. यामुळे डेंग्यू झालेल्या व्यक्तीला लक्षणं दिसून येण्याच्या २ दिवस आधी डास चावले तर त्या डासांच्या शरीरात विषाणूचा प्रवेश होतो.

 

० डेंग्यू तापाची सामान्य लक्षणे:-

१) तीव्र ताप येणे.

२) कपाळाचा पुढील भाग आणि मध्य अतिशय दुखणे.

३) डोळ्यांमध्ये वेदना जाणवणे.

४) डोळ्यांच्या हालचालीसोबत वेदनांची तीव्रता वाढणे.

५) स्नायू आणि सांध्यांमधे असह्य वेदना होणे.

६) जिभेची चव जाणे.

७) भूक न लागणे.

८) अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे. विशेषतः छाती.

९) मळमळणे. खाल्लेले अन्न न पचणे.

१०) उलट्या होणे.

 

० डेंग्यू रक्तस्त्रावात्मक तापाची (डीएचएफ) लक्षणे

– साधारण डेंग्यू तापाप्रमाणेच लक्षणे असतात. मात्र काही लक्षणे तीव्र असतात.

१) तीव्र आणि सतत पोटात कळ येणे. असह्य पोटदुखी.

२) त्वचा फिकट, थंड वा चिकट होणे.

३) त्वचेवर पुरळ उठणे.

४) नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे.

५) रक्तासह वा रक्ताविना वारंवार उलट्या होणे.

६) सतत झोप येणे.

७) अस्वस्थता जाणवणे. चलबिचल होणे. घाबरल्यासारखे वाटणे.

८) सतत घशाला कोरड पडणे. तहान लागणे.

९) नाडी कमकुवत होणे.

१०) श्वास घेण्यास त्रास होणे.

 

महत्वाचे – डेंग्यूवर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्यामुळे वरीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. शिवाय घरगुती उपाय आपण (आ) भागात जाणून घेऊ.