|

(अ) अंगावर नागीण उठणे म्हणजे काय?; जाणून घ्या लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण अनेकदा नागीण या आजाराविषयी ऐकले असेल. पण अजूनही या आजाराविषयी पूर्ण माहिती अनेकांना नाही ज्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यामुळे हा आजार गंभीर होतो आणि जिव्हारी बेतण्याची शक्यता वाढते. आज आपण जाणून घेणार आहोत कि नागीण म्हणजे काय? हा आजार का होतो आणि याची लक्षणे काय?

० नागीण आजार म्हणजे काय? तो का होतो?
– नागीण हा आजार कांजिण्यांच्या विषाणूंमुळे होतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काही रुग्णांच्या शरीरात याचे विषाणू आत खोलपर्यंत लपून राहतात. जेव्हा जेव्हा अश्या व्यक्तीच्या शरीरातील प्रतिकार शक्ती कमकुवत होते तेव्हा तेव्हा हा विषाणू अतिशय प्रभावशाली होत असतो. यामुळे अनेक वर्षांनी हे विषाणू चेतारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर फोड निर्माण करतात. हे फोड एका विशिष्ट आकारात येतात. हे फोड अत्यंत वेदनादायी असतात. यालाच नागीण उठणे असे म्हणतात.

नागिणीची तीव्रता हि वयाबरोबर वाढते. मुख्य म्हणजे उतार वयात नागीणीचा जास्त त्रास होतो. नागीण ही शरीराच्या एकाच बाजूला येते. या विषाणूची एक वा दोन-तीन नसांनाही लागण होऊ शकते. नागीण शरीवरील कोणत्याही भागावर येते. काही लोकांना नागीण डोळ्यांमध्येही होते. अश्याप्रकारे डोळ्यांमध्ये नागीण झाल्यास परिणामी अंधत्व येऊ शकते.

० नागीण आजाराची लक्षणे –

१) शरीरावर कोणत्याही एकाच बाजूस बारीक पुरळ उठणे.

२) शरीरावर उठणारी पुरळ वेगाने वाढणे आणि एका विशिष्ट आकारात तयार होणे.

३) नागीण उठल्यास शरीरावर आलेली पुरळ हि लालसर रंगाची आणि पाणीदार असते.

४) नागीण उठलेल्या जागी प्रचंड असह्य वेदना होतात.

५) नागीण झालेल्या ठिकाणी हात लावल्यास वेदना जास्त जाणवतात.

६) नागीण उठलेल्या ठिकाणी त्वचेची आग होते.

७) नागीण उठलेल्या जागी दोन-तीन दिवसांनंतर लालसर पुरळांचे पुंजके तयार होतात.

८) नागिणीचे पुरळ ५-६ दिवसात फुटून त्यावर खपल्या धरतात. यानंतर हळूहळू फोड जातात. हे फोड गेल्यानंतर वेदना कमी होते.

९) नागीण बरी झाल्यावरही काही व्यक्तींना संबंधित भागात अधूनमधून वेदना होतात.

१०) नागीण येऊन गेल्यास संबंधित भागावर चट्टे दिसतात तसेच काही काळ वेदना राहतात आणि चमक मारणे असा त्रास होऊ शकतो.