PCOD
| |

(अ) PCOD म्हणजे काय?; जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। चुकीची जीवनशैली आणि सतत धावपळ याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यामुळे विविध आजार आपल्या शरीरात घर करू लागतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात PCOD ची समस्या दिसून येत आहे. हि समस्या एक हार्मोनल समस्या आहे. जी वेळेवर लक्षात न आल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यात या समस्येचे सर्वाधिक प्रमाण तरुण मुलींमध्ये दिसून येत आहे. म्हणूनच आज आपण (अ) भागात PCOD म्हणजे काय? तो का होतो? आणि त्याची लक्षणे काय? हे जाणून घेणार आहोत. तर पुढे (आ) भागात आपण या आजारावरील उपाय जाणून घेऊ

० PCOD म्हणजे काय?
– पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज (PCOD) यालाच पॉली सिस्टीक ओव्हरी डिसीज असे देखील संबोधले जाते. जेव्हा हार्मोन्समध्ये असंतुलन होतं तेव्हा PCOD’ची समस्या पुढे येते. या स्थितीमध्ये अंडाशयाचा आकार खूप मोठा होतो आणि त्यात सिस्ट तयार होऊ लागतात. हा आजार वंधत्व देणारा नाही. मात्र गंभीर आहे. त्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही. PCOD हा एक हार्मोनल आजार आहे. यात मासिक पाळी वेळवर न येणे, शरीरावर अतिरिक्त केसांची वाढ आणि वजनात झपाट्याने वाढ होणे अश्या समस्या उदभवतात. हा आजार १२ ते ४५ या वयोगटातील ५ ते १० टक्के मुलींना वा स्त्रियांना होतो. बर्‍याच स्त्रियांना PCOD हा आजार असल्याचे माहीतच नसते. याचे कारण म्हणजे त्याची लक्षणे वेळीच न समजणे. म्हणून आज आपण PCOD होण्यामागील कारणे आणि लक्षणे जाणून घेणार आहोत.

० PCOD’ची समस्या उद्भवण्याचे कारण काय?
– स्त्रियांच्या शरीरातील अंडाशय फीमेल सेक्‍स हॉर्मोन एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन तयार करत असतं. अनेकदा स्त्रीचे अंडाशय काही प्रमाणात मेल सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन देखील तयार करतात. मात्र जेव्हा एखाद्या महिलेला PCOD असतो तेव्हा तिचे अंडाशय इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनऐवजी इतर मेल हार्मोन एंड्रोजन अधिक प्रमाणात तयार करण्यास सुरवात करते. या स्थितीला ‘हायपर अँड्रोजेनिझम’ म्हणतात. या मेल हार्मोन एंड्रोजेनच्या निर्मितीमुळे ओवेल्युशन होत नाही आणि मासिक पाळी अनियमित होते.
– अनेकदा PCOD ही अनुवांशिक समस्या असल्याचेही निदान होते. आजकाल PCOD’ची समस्या ५०% मुलींमध्ये दिसून येते. या मुलींच्या आई वा बहिणीला ही समस्या असतेच.

० PCOD असण्याची लक्षणे:
– मासिक पाळी अनियमित होणे.
– शरीरावर केसांची मात्रा वाढणे.
– डोक्यावरील केस गळणे.
– चेहऱ्यावर केस, पुरळ आणि मुरूम येणे.
– वजनात झपाट्याने वाढ होणे.

० परिणाम – महिला रोग तज्ञ सांगतात कि, PCODमुळे गरोदरपणात त्रास होतो. कारण स्त्रीचं ओवेल्‍यूशन न झाल्यामुळे स्त्रिया गर्भ धारण करू शकत नाहीत. त्यामुळे वेळीच PCOD’ची लक्षणे ओळखून त्यावर उपचार करणे गरजेचे असते.

० महत्वाचे :- जर तुम्हालाही PCOD असेल, तर कृपया स्वतःहून वा गुगलवर बघून कोणतेही आयुर्वेदिक औषधोपचार करू नका. कारण ही एक हार्मोनल समस्या आहे. त्यामुळे स्वतःहून घेतलेली औषधं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.